राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के.सी. पाडवींवर का भडकले? - मंत्रिमंडळ विस्तार

भगत सिंह कोश्यारी Image copyright Getty Images

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे काँग्रेसचे आमदार के.सी. पाडवी यांच्या शपथविधीवेळी नाराज झाले आहेत.

महाराष्ट्र मंत्रीमंडळातील सदस्यांच्या शपथविधीवर नाराज होण्याची कोश्यारी यांची ही पहिलीच वेळ नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सात सदस्यांनी शपथ घेतली तेव्हा राज्यपाल कोश्यारी नाराज असल्याची चर्चा रंगली होती.

त्यावेळी आमदारांनी राज्यपालांनी शपथ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आपापाले शीर्षस्थ नेते, देवदेवता यांचं स्मरण केलं. त्यावेळी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं तर कोणी बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांचं नाव घेतलं.

शपथविधीच्या पुढील कार्यक्रमांमध्ये असं न करण्याची सूचना राज्यपालांनी केली होती. राज्यपालांच्या सूचनेनंतरही के.सी.पाडवी यांनी ठरवलेल्या वाक्यांव्यतिरिक्त अन्य वाक्यं उच्चारली. यामुळे राज्यपाल कोश्यारी नाराज झाले आणि त्यांनी पाडवी यांनी नव्याने शपथ दिली. के. सी. पाडवी यांच्या शपथविधीदरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भडकले.

काँग्रेसचे अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार के.सी.पाडवी यांच्या शपथविधीदरम्यान राज्यपालांनी त्यांना हटकलं. शपथ घेण्यासाठी जी वाक्यं देण्यात आली आहेत तीच वाचा असं राज्यपालांनी पाडवी यांना सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी पाडवी यांनी पुन्हा शपथ दिली.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सकाळी शपथ दिल्यापासून कोश्यारी चर्चेत आहेत.

सी. विद्यासागर राव यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारींची नियुक्ती केली.

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन या महाराष्ट्राच्या आगामी राज्यपाल असतील, अशी चर्चा होती. मात्र, कोशियारांची नाव जाहीर झाल्यानं या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला.

कोण आहेत कोश्यारी?

उत्तराखंडच्या बगेश्वर जिल्ह्यात भगत सिंह कोश्यारी यांचा 17 जून 1942 रोजी जन्म झाला. उत्तराखंड हे स्वतंत्र राज्य होण्याआधी उत्तर प्रदेशचा भाग होता. त्यामुळं कोशियारींचं बालपण, शिक्षण आणि सार्वजनिक आयुष्याचा प्रारंभही उत्तर प्रदेशातच झाली. अलमोडा कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी विषयात एमएचं शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती. 1961-62 या काळात ते अलमोडा कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेत कार्यरत होते.

Image copyright Twitter/@drdhansinghuk

पेशानं शिक्षक आणि पत्रकार असलेल्या कोश्यारींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सामाजिक कामास सुरुवात केली. त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात आले.

भगत सिंह कोशियारी यांच्याबद्दल नऊ महत्त्वाच्या गोष्टी :

 • कोश्यारी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरूवात संघातूनच झाली.
 • इंग्रजी विषयात एमएची पदवी मिळवलेल्या कोश्यारींनी शिक्षक म्हणूनही काम केलं. ते उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील राजा इंटर कॉलेजमध्ये काही वर्षे व्याख्याते (लेक्चरर) होते.
 • कोश्यारींनी पत्रकारितेतही योगदान दिलंय. 1975 पासून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पियुष' या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखही लिहिले आहेत.
 • समाजकारण, राजकारण यांसह साहित्य हाही कोश्यारींच्या आवडीचा प्रांत आहे. 'उत्तरांचल प्रदेश क्यों?' आणि 'उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान' ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
 • आणीबाणीविरोधात कोश्यारी यांनी आवाज उठवला होता. परिणामी त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. 3 जुलै 1975 ते 23 मार्च 1977 असे तीन वर्षे ते तुरुंगात होते.
Image copyright Getty Images
 • उत्तराखंडमधील शिक्षण क्षेत्रात कोश्यारींनी काम केलंय. पिथोरोगड येथील 'सरस्वती शिशू मंदिर', 'विवेकानंद विद्या मंदिर इंटर कॉलेज' आणि 'नैनिताल येथील सरस्वती विहार उच्च माध्यमिक शाळा' या संस्थांचीही स्थापना भगत सिंह कोशियारींनी केली.
 • अविवाहित असलेल्या भगत सिंह कोश्यारींनी अवघं आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कामासाठी घालवलं आहे.
 • कोश्यारींनी ट्रेकिंग करायला आवडतं. तत्त्वज्ञान, इतिहास आणि शिक्षण या विषयांची पुस्तकं त्यांना वाचायला आवडतात.
 • उत्तर प्रदेशपासून 2000 साली वेगळं झालेल्या उत्तराखंड राज्यात भाजपची धुरा कोश्यारींच्या हाती देण्यात आली. ते उत्तराखंडचे पहिले भाजप प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर उत्तराखंड राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होण्याच मानही त्यांना मिळाला.

भगत सिंह कोश्यारी यांनी आतापर्यंत भूषवलेली महत्त्वाची राजकीय पदं :

 • मे 1997 साली ते उत्तर प्रदेशच्या विधा परिषदेत सदस्य म्हणून निवडून गेले.
 • उत्तर प्रदेश सरकारमधील महत्त्वाच्या समित्यांच्या माध्यमातून कोश्यारींनी महत्वाची भूमिका बजावली. 1999-2000 या काळात ते विकास आणि नियोजन समितीच्या सल्लागार समितीतही होते.
 • उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतरच्या पहिल्या सरकारमध्ये कोश्यारी हे ऊर्जा आणि जलसिंचन मंत्री होते. 2000 ते 2001 एवढाच त्यांना कालावधी कामासाठी मिळाला.
Image copyright Twitter/@BSKoshyari
 • 29 ऑक्टोबर 2001 ते 1 मार्च 2002 या कालावधीत कोश्यारींनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली.
 • मार्च 2002 ते नोव्हेंबर 2008 ही जवळपास सहा वर्षे ते उत्तराखंडच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
 • नोव्हेंबर 2008 साली कोश्यारी भाजपच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य झाले. राज्यसभेत असताना त्यांनी केंद्र सरकारच्या विविध समित्यांमध्ये काम केलं. फेब्रुवारी 2009 ते मे 2009 या कालावधीत कोशियारी हे केंद्राच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. तर ऑगस्ट 2009 पासून ते ऊर्जा समितीचेही सदस्य होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)