भारतीय अर्थव्यवस्था: वाहन उद्योगाची अवस्था इतकी बिकट का झाली आहे?

वाहन उद्योग Image copyright NARINDER NANU/getty
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक छायाचित्र

"मंदी नव्हती तोपर्यंत आमचं रोजचं आयुष्य सुरळीत चाललं होतं. आता दोन वेळचं जेवण मिळवणं कठीण झालंय. माझ्या मुलांना शाळेत पाठवणंही बंद केलंय. माझ्या आईची प्रकृती बरी नाहीय आणि त्यात जर मीही आजारी पडलो, तर मग आम्ही जगायचं कसं?" राम विचारत होते.

राम हे झारखंडच्या जमशेदपूरमधील एका कंपनीत मजुरी करतात पण सध्या ते घरीच आहेत. या कंपनीत कार आणि अवजड वाहनांचे सुटे भाग बनवले जातात.

राम यांनी गेल्या महिन्यात केवळ 14 दिवसच काम केलंय. मागणीत घट झाल्यानं कंपनीला प्रत्येक आठवड्यातले काही दिवस काम बंद करणं भाग पडलंय.

ग्राहकांकडून होणारी मागणी प्रचंड खालावल्यानं मंदीचे संकेत मिळत आहेत.

देशातल्या कार उद्योगाची स्थिती तर अत्यंत बिकट बनली आहे. या स्थितीमुळे उत्पादन काही काळ बंद करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. नोकऱ्यांमध्येही त्यांना कपात करावी लागत आहे.

जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 30 टक्क्यांची घट झाली. गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी घट आहे.

बँकिंग क्षेत्रातील संकटामुळं वाहन विक्रेते आणि संभाव्य कार खरेदीदार आपली पत राखण्यासाठी धडपडताना दिसतायेत.

मोठ्या उत्पादकांना पुरवठा करणारे व्यवसायाच्या दृष्टीनं लहान आणि मध्यम स्वरूपाच्या व्यापाऱ्यांवर सर्वांत मोठा परिणाम पाहायला मिळतोय.

पेशानं इंजिनिअर असलेले समीर सिंग जमशेदपूर या त्यांच्या मूळगावी परतले होते. त्यांच्या परतण्याला दोन कारणं होती. एक म्हणजे त्यांचे वडील आजारी होते आणि दुसरं म्हणजे, गाड्यांचे सुटे भाग बनवण्याचं त्यांचा कौटुंबिक व्यवसाय अत्यंत बिकट अवस्थेत होतं.

Image copyright Maruti
प्रतिमा मथळा मारुती

गेल्या दोन दशकात समीर सिंग यांनी कौटुंबिक व्यवसाय रुळावर आणला होता. केवळ उत्पादनच वाढवलं नव्हतं, तर दुकानांची संख्याही वाढवली होती. अवजड वाहनं बनवणाऱ्यांना ते सुटे भाग पुरवत असत.

"सुटे भाग बनवण्याचं हे युनिट चालवण्यासाठी एवढा त्रास मला कधीच झाला नव्हता" असं समीर सांगतात.

ते पुढे म्हणतात, "व्यवसाय चालू ठेवण्यासाठी पैशांची गरज असते आणि एखाद्या उद्योगासाठी कणखर इच्छाशक्तीही हवी असते. माझ्यासारख्या लघुउद्योजकांनी त्यांचे पैसे, सेव्हिंग आणि कर्ज सगळं या व्यवसायात घातलं. कुणालाही दिवाळखोर बनायचं नसतं. माझ्या कामगारांना तर काही आठवडे बेरोजगार राहावं लागतंय आणि त्यांच्याबद्दल मला खूप वाईटही वाटतंय.

"हे असंच सुरू राहिल्यास त्यांना काम सोडून द्यावं लागेल आणि दुसरी नोकरी शोधावी लागेल. पण मी नोकरीसाठी दुसरीकडं पाहूही शकत नाही. कारण माझं आयुष्य सुरूही इथं होतं आणि संपतंही इथंच," समीर सांगतात.

भारतातील वाहन क्षेत्रातील विक्रीतील घट ही गेल्या दोन दशकातील सर्वांत मोठी घट आहे. वाहन उद्योग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जवळपास साडेतीन कोटी लोकांना रोजगार देतं. यावरूनच याच्या परिणामांचा अंदाज येऊ शकतो.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा ऑटो इंड्रस्टीला घरघर लागली आहे.

आतापर्यंत लाखाहून अधिक लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्याचं म्हटलं जातंय.

जमेशदपूरसारख्या औद्योगिक शहराची स्थिती पाहता, लोकांना या मंदीचा थेट फटका बसल्याचंच दिसून येतंय.

आदित्यपूर औद्योगिक क्षेत्राच्या मध्यवर्ती भागातील इमली चौक अत्यंत गर्दीचं ठिकाण आहे. इथेच वाहनांचे सुटे भाग बनवण्याचे अनेक युनिट्स आहेत. रोजंदारीवर काम करणारे शेकडो कामगार रोज सकाळी इथे जमतात आणि स्थानिक कंत्राटदार त्यांना कामासाठी युनिट्समध्ये घेऊन जातात.

आम्हाला इमली चौकात जे दिसलं, ते मात्र अगदी उलट होतं. रोजंदारीवर कामासाठी कुणी कंत्राटदार आपल्याला घेऊन जाईल, यासाठी वेगवेगळ्या वयातील महिला आणि पुरूष कामगार बेचैन होऊन वाट पाहत होते. यातले काही कामगार आम्हालाच कंत्राटदार समजले.

तीन मुलांची आई असलेल्या लक्ष्मी जवळपास 15 किलोमीटरवहून एका दिवसाच्या कामासाठी इथं येतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तिच्या निराशेत सातत्यानं वाढ होतेय.

Image copyright PTI
प्रतिमा मथळा गाड्या

"दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत जातेय. नशीबवान असलेल्या काही जणांनाच काम मिळतो आणि बहुतांश जण रिकाम्या हातानं माघारी जातात. अनेकदा तर आम्हाला घरी तासन् तास चालत जावं लागतं. आम्ही दररोज 400 ते 450 रूपये कमवायचो. आता तेही नाहीत. आता आम्ही 100-1500 रूपयांपर्यंत कुठलंही काम करण्यास तयार आहोत, मग ते शौचालय स्वच्छ करण्याचं असो वा रस्ते स्वच्छ करण्याचं, मात्र तेही मिळत नाहीये," असं लक्ष्मी म्हणतात.

आर्थिक मंदीपेक्षा वाहन उद्योगासाठी वाईट बातमी काय असेल? पण याहून मोठं संकट समोर उभं आहे. आणखी नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मी संजय सभेरवाल यांना भेटलो. सभेरवाल हे वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादक आहेच, सोबत ऑटोमेटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (ACMA) सरचिटणसही आहेत.

"या वर्षातली घट अत्यंत नाट्यमय आहे. व्यावसायिक गाड्या, कार, दुचाकी यांसारख्या प्रत्येक उत्पादनावर त्याचा परिणाम झालाय. आधीच्या मंदीच्या काळात असं झालं नव्हतं. व्यावसायिक वाहनं किंवा अवजड वाहनांची विक्री होत होती. आता सगळंच खाडकन आपटलंय," असं सभेरवाल म्हणतात.

हजारो लोकांचं जगणं इथल्या कारखान्यांवर अवलंबून आहे. मात्र, यापुढे त्यांच्यासमोर अनेक संकटं येऊ शकतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गाड्या

इथले रूपेश कट्रियर सुद्धा असेच एक उत्पादक आहेत, ज्यांचं वाहनांचे सुटे भाग बनवण्याचं युनिट गेल्या महिन्याभरात कसंतरी आठवडाभर चालू शकलंय.

ते म्हणतात, "व्यवसाय अचानक इतक्या अडचणी आल्यात, यापेक्षा त्रासदायक काय असेल? अपेक्षित आर्थिक वाढीपेक्षा अवजड वाहनांच्या विक्रीत मोठी घट झालीय, याच्याशी मी सहमत होऊ शकतो. पण मग दुचाकीसारख्या स्वस्त प्रवासी वाहनांचं काय? त्यांची तर किंमत जास्त नाही. म्हणजेच, बाजारात नकारात्मकता आहे आणि त्यात सुधारणा व्हायला वेळ लागेल."

वाहन उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी करांमध्ये कपात करावी आणि वाहन खरेदीदार, वाहन विक्रेते यांना वित्तपुरवठा अधिक सुलभ करावा, या अनेक दिवसांपासूनच्या मागण्या आहेत.

काहीजण असेही म्हणतात की, सरकारनं पुढील काही वर्षांत हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे अधिक लक्ष द्यायला हवं.

वाहन उद्योगा क्षेत्रातील अत्यंत बिकट स्थिती पाहता आणि आर्थिक वाढीसाठी भारत सरकारनं काही दिवसांपूर्वीच काही उपाय जाहीर केले होते. त्यामध्ये वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी पॅकेज जाहीर करणं असो, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 70 हजार कोटी रूपये देणं असो किंवा हाऊसिंग व वाहनांच्या कर्जावरील व्याजदरात घट, यांचा समावेश आहे.

पण परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकारच्या या उपाययोजना पुरेशा ठरतील का?

आर्थिक सुस्थिती बऱ्याचदा वाहन उद्योगातील स्थितीवरून ठरवली जाते.

भारतातला वाहन उद्योग सध्या अत्यंत बिकट स्थितीला सामोरा जातोय, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. देशातील अर्थव्यवस्थेबद्दलही चिंता व्यक्त केली जातेय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)