उद्धव ठाकरे: 'पुढचं सरकार आपलं आणि पुढचा मुख्यमंत्री? काय ते समजून घ्या...’ - #5मोठ्याबातम्या

उद्धव ठाकरे Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उद्धव ठाकरे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'पुढचा मुख्यमंत्री? काय ते समजून घ्या...' - उद्धव ठाकरे

"पुढचं सरकार आपलं असेल आणि पुढचा मुख्यमंत्री? काय ते समजून घ्या..."असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

एसटी महामंळामध्ये विद्युत बस दाखल होत असून देशातील अशा पहिल्या बसचं उद्घाटन गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी कधीच त्यासंदर्भात थेट वक्तव्य केलेलं नाही.

"जनतेच्या मनात असेल तर आपण मुख्यमंत्री व्हायला तयार आहोत," अशी प्रतिक्रियाही आदित्य यांनी दिली होती, असं बातमीत म्हटलं आहे.

2. किरण नगरकर यांचे निधन

ज्येष्ठ कादंबरीकार किरण नगरकर यांचं गुरुवारी मुंबईत निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.

2 दिवसांपूर्वी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मेंदूतील रक्तस्त्रावानं त्यांचा मृत्यू झाला.

मराठी चाळ संस्कृतीला जागतिक पटलावर नेणाऱ्या 'रावण अ‍ॅण्ड एडी', 'द एक्स्ट्रॉज' आणि 'रेस्ट इन पीस' या त्यांच्या कादंबरीमधून त्यांनी मुंबईचा गेल्या सहा दशकातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक आढावा घेतला.

3. 'नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भीती आवश्यक'

"वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना भीती आवश्यक आहे," असं मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Facebook / Nitin Gadkari
प्रतिमा मथळा नितीन गडकरी

ते म्हणाले, "कायद्याप्रती आदर आणि भीती नसणे ही स्थिती चांगली नाही. रस्त्यांवरील अपघातात दर वर्षी दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि त्यात 18 ते 35 वयोगटातील तरुणांच्या मृत्यूंची संख्या 65 टक्के आहे."

"सरकारनं पैसा कमावण्यासाठी किंवा लोभापोटी मोटर वाहन नियमांचे उल्लंघनादाखल दंडांची रक्कम वाढवली नाही," असंही ते म्हणाले.

4. युतीच्या 235-240 जागा येतील : आठवले

शिवसेना आणि भाजप एकत्र लढले तर राज्यात 288 पैकी 235 ते 240 जागा निवडून येतील. त्यामध्ये RPIचे 4 ते 5 आमदार असतील, असं वक्तव्य RPIचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहेय टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रामदास आठवले

मुंबईतल्या वरळी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

या सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पुन्हा एकदा राज्यात युतीचीच सत्ता येणार आहे. महायुतीचं सरकार येणार याचा विश्वास आहे आणि यावेळी विधानसभेत RPIचेही आमदार असतील."

5. राज्यातील 20 हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर

राज्यभरातील जवळपास 20 हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

अंशदायी पेन्शन योजनेऐवजी जुनीच पेन्शन योजना कायम ठेवणे, महसूल सहाय्यक पदनाम करणे, लोकसेवा भरतीत 5 टक्के जागा राखीव ठेवणे, या प्रमुख मागण्यांसह इतर 16 मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केली. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने गुरुवारपासून (05 सप्टेंबर) राज्यातील सर्वच तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)