चांद्रयान 2 मोहीम सर्वसामान्यांच्या दृष्टीने का महत्त्वाची आहे?

चांद्रयान 2 Image copyright ISRO.GOV.IN

आयुष्यात विज्ञानातलं कधीही काहीही न वाचलेल्या गरिबीच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्य माणासाच्या दृष्टीने ही चांद्र मोहीम एका परिकथेसारखी आहे. रॉकेट, उपग्रह, ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरसारख्या शब्दांशी सामान्यांचा कधीच संबंध येत नाही.

पण ज्या देशाची संपत्ती ब्रिटीश साम्राज्याने ओरबाडून घेतली होती त्या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाने त्यावेळी अंतराळ विज्ञानावर पैसे खर्च करायचं. असं का ठरवलं, हे सगळ्यांत आधी आपण समजून घ्यायला हवं.


भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. 7 सप्टेंबरच्या रात्री 1.55 वाजता भारताचं मून लॅंडर 'विक्रम' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.

त्याचं थेट लाईव्ह तुम्ही बीबीसी मराठीच्या फेसबुक आणि यूट्यूबवर पाहू शकणार आहात.


याच्याशी संबंधित विक्रम साराभाई आणि इतर सर्व वैज्ञानिकांना सुरुवातीच्या काळामध्ये टीकेचा सामना करावा लागला होता. पुन्हा पुन्हा त्यांना हा प्रश्न विचारला जाईल.

'मनुष्य आणि समाजाच्या मूळ समस्या सोडवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात आपण कोणापेक्षा मागे पडून चालणार नाही' हे त्यावेळच्या राजकीय नेतृत्त्वाला समजवण्यात विक्रम साराभाईंना यश आलं होतं. चंद्र किंवा इतर ग्रहांसाठीच्या शोध मोहीमा किंवा मग मानवयुक्त अंतराळ मोहीमा आखून आर्थिक दृष्ट्या संपन्न देशांसोबत स्पर्धा करणं हे भारतीय अंतराळ मोहीमांचं उद्दिष्टं नाही, याबद्दलही ते ठाम होते.

भारतीय अंतराळ मोहीमेचं वेगळेपण म्हणजे या देशाची अंतराळ मोहीम युद्धामुळे सुरू झाली नाही. अमेरिका, युरोप आणि सोव्हिएत संघाचं अंतराळ संशोधन हे शीत युद्धामुळे सुरू झालं होतं.

हेतू बदलला का?

मग आता प्रश्न असा उभा राहतो की भारताच्या अंतराळ मोहीमेचा हेतू आता बदललाय का? चंद्र आणि इतर ग्रहांवरील शोधमोहीमांनी मनुष्य आणि समाजातल्या कोणत्या मूळ समस्या सोडवल्या जाऊ शकतात?

या सगळ्याचं उत्तर 'वैज्ञानिक शोधाच्या' मुळापाशीच आहे. आजपर्यंत जे कोणीही केलं नाही तिथे शोध घेऊन माहिती मिळवणं, मनुष्याच्या उगमाचा आणि विकासाचा अर्थ त्याच्याशी लावणं असा साधारणपणे विज्ञान आणि विशेषतः अंतराळ संशोधनाचा हेतू असतो.

आर्थिक दृष्ट्या विकसित देशांची नक्कल केल्याबद्दल किंवा त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी साराभाईंना विरोध झाला होता हे सर्वांनाच माहीत आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डॉक्टर विक्रम साराभाई

पण जर १९६०च्या दशकामध्ये ती खेळण्यांसारखी रॉकेट्स बनवली नसती आणि केरळमधल्या थुंबाजवळच्या एका चर्चजवळून ती लाँच करण्यात आली नसती तर आज भारत चंद्र आणि मंगळावर मोहीमा पाठवण्यासाठी स्वयंपूर्ण झाला नसता, हे विसरून चालणार नाही.

एक दिवस असा येईल जेव्हा भारताचे स्वतःचे उपग्रह असतील जे धोक्याचा इशारा देत लाखो आयुष्य वाचवू शकतील, किंवा उपग्रहांच्या मदतीने जंगलं व्यवस्थापन आणि देशातली संपर्क व्यवस्था मजबूत करता येईल, हे त्याकाळच्या टीकाकारांना कसं समजणार होतं?

असं केलं नसतं तर इतर बहुतांश देशांप्रमाणे आपल्यालाही सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी विकसित देशांच्या कृपादृष्टीवर अवलंबून रहावं लागलं असतं.

इस्रो, सीएसआयआर (CSIR), आयएआरआय (IARI), अणु ऊर्जा आणि डीआरडीओ (DRDO)ने गेल्या ७० वर्षांमध्ये जे काही साध्य केलंय ते १९५० आणि६०च्या दशकांमध्ये एखाद्या विज्ञानकथेसारखं वाटलं असतं.

वादळाविषयी उपग्रहाकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे किनारपट्टीलगतच्या जवळपास ८ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवून गरीब विकसनशील देशामध्येही माणसाचा जीव वाचवता येईल, असा विचार कोणी केला असता का?

एक दिवस देशामध्ये १००० पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स असतील आणि त्यातली बहुतेक स्वदेशी तंत्रज्ञान वापरतील हे कल्पनातीत होतं.

या फायद्यांची ही यादी जरा मोठी आहे.

चांद्रयानाबद्दल जाणून घेणं का महत्त्वाचं?

पुन्हा आपल्या मूलभूत प्रश्नाकडे वळूयात. एका सामान्य माणसाने विज्ञानाशी संबंध ठेवावा का? चांद्रयान२ मध्ये त्याला का रस असावा?

खरंतर तसं पाहिलं तर ही चर्चा न संपणार आहे. पण मी काही कारणं सांगेन.

सगळ्यांत आधी म्हणजे विज्ञानाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणं पहायला मिळतात जिथे एका शोध किंवा निर्मितीमुळे ब्रम्हांड, सौरमाला आणि मानवजातीबद्दलचे आपले समज पूर्णपणे बदलले.

Image copyright TWITTER/ISRO

आपल्या आयुष्यावर आणि सामाजिक संबंधांवर वैज्ञानिक माहितीचा नेहमीच परिणाम होत आला आहे. पण जगामध्ये समाजाच्या मदतीने कोणताही वैज्ञानिक शोध लावता येत नाही.

आता बहुतकेदा विज्ञान प्रसाराचं काम एकांतात आणि लोकांच्या दृष्टीआड केलं जातं. पण जेव्हा अशा प्रकारच्या मोठ्या संशोधन कार्यक्रमांबद्दल राष्ट्रीय चर्चा होते तेव्हा लोकांची विज्ञानाविषयीची माहिती वाढते. यामुळे वैज्ञानिक समुदाय आणि सामान्य नागरिक यांच्यादरम्यान विश्वास निर्माण होतो.

आपल्या देशातले वैज्ञानिक काय करत आहेत हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे. आणि गरज पडल्यास जनता वैज्ञानिकांना 'मनुष्य आणि समाजाच्या मूळ अडचणी' सोडवण्याचे आदेशही देऊ शकते.

चांद्रयान २ सारखी मोहीम पूर्ण झाली तर ते वैज्ञानिकांचं प्रगतीपुस्तक मानलं जाईल. कारण देशाची वैज्ञानिक प्रगती कोणत्या पातळीवर आहे, कोणत्या परिस्थितीत आहे हे यावरून समजतं.

सॉफ्ट लँडिंग मोठी गोष्ट का?

चंद्रावरचं सॉफ्ट लँडिंग हे देशासाठी गौरवाचं का आहे किंवा मग यासाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची निवड का करण्यात आली, हे सगळ्यांना माहित असायला हवं.

चंद्रावरची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि वातावरण पृथ्वीपेक्षा अगदी वेगळं आहे. पृथ्वीवर सॉफ्ट लँडिंग करण्याचं तंत्र आपण याआधीच आत्मसात केलेलं आहे. लँडरचा वेग कसा वाढवायचा, कसा कमी करायचा, ते कसं वळवायचं यासाठी आपण हवेचा वापर करतो.

Image copyright AFP/GETTY IMAGES

हीच पद्धत वापरून विमान, हेलिकॉप्टर, हॉवरक्राफ्ट आणि ड्रोन पृथ्वीवर क्रॅश न होता अलगद लँड होतात. पण चंद्रावर हवा नाही. म्हणूनच तिथे सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी इंधन लागतं. वेग वाढवणं, कमी करणं आणि लँडर योग्य जागेवर उतरावं यासाठीदेखील इंधनाची गरज असते.

या संपूर्ण प्रक्रियेसाठी अतिशय वेग आणि अचूकता लागते. हे साध्य करणारा भारत चौथा देश असेल.

दक्षिण ध्रुव का ?

लँडिंगसाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची निवड करण्यामागे दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे यामुळे आपल्याला समजेल की तिथली जमीन किंवा माती ही उत्तरेप्रमाणे आहे वा नाही. यामुळे आपल्या सौरमालेच्या उत्पत्तीविषयी काही महत्त्वाची माहिती मिळेल.

दुसरं कारण म्हणजे की या भागामध्ये पाणी आहे वा नाही आणि असल्यास ते वापरण्याइतक्या प्रमाणात आहे का हे आपल्याला समजेल.

हा प्रश्न गेल्या अनेक काळापासून वैज्ञानिकांना पडलेला आहे. कारण जर चंद्रावर पाणी असेल तर त्यामुळे चंद्रावर वसाहत करण्याचा मार्ग खुला होईल आणि मग अंतराळमधल्या पुढच्या शोध मोहिमांसाठी चंद्राचा वापर स्वस्त लाँच पॅडसारखा करता येईल.

Image copyright Getty Images

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जर आपल्याला पाण्याचा एकतरी साठा जर मिळाला तर यामुळे चंद्राबद्दलचे आपले सगळेच समज बदलतील. कारण चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या अणुंचं अस्तित्तव असल्याचे पुरावे जरी मिळालेले असले तरी चंद्र पूर्णपणे शुष्क असल्याचं अजूनही मानलं जातं.

चांद्रयान २ मोहीम हा एका बदलाचा स्षष्ट संकेत आहे. आतापर्यंत इस्रोचं लक्ष अंतराळ संबंधित तंत्रज्ञानात निष्णात होण्यावर होतं. पण आता इस्रो आपल्या चार भिंतींबाहेर पडून महाविद्यालयासारख्या इतर संस्थांनाही यात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेईल.

साराभाईं एकदा म्हणाले होते, "सरकारचं सगळ्यात चांगलं रूप कोणतं? जे 'शासन' कमी करून त्याऐवजी जनतेची ऊर्जा एकवटून ती वापरण्याचे नवीन मार्ग शोधतं, ते खरं सरकार."

साराभाईंच्या या स्वप्नानुसार वागण्यासाठी आता लोकांची ऊर्जा मोठ्या वैज्ञानिक गटात समाविष्ट करण्यात येणार आहे.

Image copyright ISRO

शेवटी सगळ्यांत महत्त्वाची एक गोष्ट. अशा प्रकारच्या मोहीमा या सामान्य जनतेच्या पैशांच्या मदतीने राबवल्या जातात. म्हणूनच मग आपल्या पैसा हा येणाऱ्या पिढ्यांसाठी फायद्याचा ठरणार की नाही, हे जाणून घ्यायचा हक्क जनतेला आहे.

ज्या बद्दल आपण कधीही विचार केला नाही अशी नवी क्षितिजं गाठण्यासाठी चांद्रयान २ येत्या पिढ्यांना प्रेरित करेल याची मला खात्री आहे.

चंद्र किंवा मंगळावर पहिली मनुष्यवस्ती भारतातर्फे स्थापन करण्याचं स्वप्न कदाचित आपली पुढची पिढी पाहील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)