दिल्ली गणपती उत्सव: कसा असतो युपीएससीच्या विद्यार्थ्यांचा गणेशोत्सव?

गणेशोत्सव Image copyright Getty Images

"घरात गणेशोत्सव साजरा होत असताना आपण बाहेर असतो, घरची आठवण तर येणारच, घरी जायची इच्छाही होते. हे सगळं कठीण आहे. पण सध्याचे दिवसच आयुष्याची दिशा ठरवतात. त्यामुळे एखादं दुसरं वर्ष गेलो नाही तरी काही हरकत नाही. आज जे करू शकलो नाही ते परीक्षा पास झाल्यानंतर मोठ्या धुमधडाक्यात करू शकतो. त्यामुळेच अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलंय."

हे उद्गार आहेत सांगलीच्या स्वप्निल जाधव याचे. स्वप्निलचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून तो दिल्लीमध्ये युपीएससी परीक्षेची तयारी करत आहे.

दिल्लीतल्या करोलबाग, राजेंद्र नगर, मुखर्जीनगर भागात युपीएससी परीक्षेचे अनेक खासगी क्लासेस आहेत. याठिकाणी शिकण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी येतात. स्वप्निलसारखेच अनेकजण तीन महिन्यांपासून ते चार-पाच वर्षं परीक्षेची तयारी करत आहेत. या कालावधीत अनेकजण जीव ओतून अभ्यास करताना दिसतात. पण यादरम्यान अनेकांना विविध कार्यक्रम, सण-उत्सव आपल्या घरच्यांसोबत साजरा करण्याच्या आनंदाला मुकावं लागतं, असं देखील ते सांगतात.

Image copyright Getty Images

दिल्लीतला गणेशोत्सव

दिल्लीमध्ये अनेक मराठी कुटुंब राहतात त्यामुळे इथं गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. करोलबाग भागातसुद्धा अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. युपीएससीची तयारी करणारे अनेक विद्यार्थी या भागात राहतात. गणेशोत्सव दिल्लीत साजरा होत असताना घरच्यांची आठवण येत नाही का? असं विचारलं असता अक्षय गुजरे या विद्यार्थ्याने सांगितलं, "घरच्यांसोबत नसलो तरी गणेशोत्सवाचा आनंद घेण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतात."

Image copyright Hundustan times/getty

अक्षय गुजरे हा मूळचा अकोल्याच्या मूर्तिजापूरमधला आहे. विशेष म्हणजे तो मूर्तीकार कुटुंबातील आहे. त्याचे भाऊ आणि वडील गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं काम करतात. तो सांगतो, "चार वर्षे अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात होतो. पण गणपती येण्याच्या चार पाच दिवस आधी गावी जाणं हे ठरलेलं होतं. गणेश मूर्तींना शेवटचा टचअप करणं, मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणपती दाखवणं अशी मदत मी घरच्यांना करायचो. पण यावर्षी मला घरी जाता आलं नाही."

"खरं तर मी फक्त दोन महिन्यांपूर्वीच दिल्लीत आलो. दिल्लीमध्ये महाराष्ट्रासोबतच इतर राज्यातली मुलं आहेत. त्यामुळे क्लासला सुट्टी नव्हती. एक दोन दिवस जाऊन येणंही परवडणारं नाही," असं अक्षय सांगतो.

युपीएससीची मुख्य परीक्षा याच कालावधीत

दिल्लीतल्या करोलबाग परिसरातच युनिक अॅकेडमीचा क्लास चालतो. दीपकिरण उबाळे या ठिकाणचं व्यवस्थापन पाहतात. ते सांगतात, "सध्या या परिसरात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थी जास्त संख्येने आहेत. अनेकांना गणेशोत्सवासाठी घरी जायचं असतं. ज्यांना शक्य आहे ते काहीजण जातात पण युपीएससीची मुख्य परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीतच होत असल्यामुळे अनेक जण जाऊ शकत नाहीत. यावर्षीसुद्धा मुख्य परीक्षा 18 सप्टेंबरपासून 28 सप्टेंबरपर्यंत होणार आहे."

Image copyright Getty Images

"एखाद्या वर्षी आपल्या आवडीनिवडींचा त्याग करावा, असा विचार विद्यार्थी करतात. आठ ते बारा तास अभ्यास करणारे विद्यार्थी वेळेच्या योग्य वापराबाबत सजग असतात. त्यामुळे शक्यतो परीक्षेनंतर किंवा दिवाळीदरम्यान जाण्यावर त्यांचा भर असतो," असं दीपकिरण सांगतात.

सोशल मीडियाचा आधार

घरच्या गणपतीचा आनंद मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग होतो असं स्वप्निलने सांगितलं. तो सांगतो, "युपीएससीत यश मिळवण्यासाठी दिवसभर लायब्ररीत अभ्यास करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अभ्यास करताना मोबाईलचा वापर आम्ही शक्यतो टाळतो. पण सण उत्सवांच्या वेळी कधी कधी एकटेपणा जाणवू लागतो. त्यामुळे गणेशोत्सवच नाही तर इतर कार्यक्रमांच्या वेळी व्हीडिओ कॉलच्या मदतीने घरच्यांसोबत असल्याचं फील घेता येतं."

दिपकिरण उबाळे पुढे सांगतात, "दिल्लीत फक्त मराठी विद्यार्थीच नव्हे तर कामासाठी स्थायिक झालेले, विविध कारणांसाठी दिल्लीत राहणारी अनेक मराठी माणसं आहेत. त्यांनी मराठी मंडळं स्थापन केली आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात असतात. मराठी सण उत्सव मिळून साजरे करतात. घरी गणपती आणून इतरांना सहभागी करून घेतलं जातं. त्यामुळे घरापासून दूर असले तरी इथेसुद्धा आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो."

श्रद्धा महत्त्वाची

अक्षय सांगतो, "गणेश चतुर्थीच्या दिवशी सुट्टी नव्हती. करंट अफेअर्सचा क्लास अटेंड केला आणि घरी गेलो. संध्याकाळी रूमवर गेलो. जवळच एका ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत होता. ते पाहिलं. घरचा गणेशोत्सव आणि परराज्यात होणारा गणेशोत्सव यात फरक असतो हे जाणवलं. जगात सगळ्याच ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत असेल. प्रत्येकाची परंपरा पद्धत वेगळी आहे. ठिकाण कोणतंही किंवा उत्सवाचं स्वरूप कोणतंही असो, तुमच्या मनात श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल, तुमच्या मनात श्रद्धा असेल तर तुमच्यावर देवाचा आशीर्वाद कायमच असेल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)