चेरापुंजी नव्हे तर महाराष्ट्रातलं पाथरपूंज आहे यंदा सर्वाधिक पावसाचं ठिकाण

पाथरपूंज

यंदा देशातील सर्वाधिक पाऊस सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातल्या पाथरपूंज या गावात झाला. कोयनेच्या जंगलात चांदोली अभयारण्यात दुर्गम ठिकाणी हे गावं वसलेलं आहे. याच गावात वारणा नदीचा उगम होतो.

मेघालयात असलेलं चेरापुंजी हे तसं भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे, यंदा तिथे 5938 मिमी पाऊस झाला तर पाथरपूंजमध्ये 7359 मिमी इतका पाऊस झालाय. (जून ते ऑगस्टपर्यंतचा आकडा)

सर्वाधिक पावसाचं ठिकाण ठरलेल्या पाथरपूंज गावात पोहोचणंही अवघड आहे. वारणेच्या पुरामुळे जनजीवन विस्कळित झालं आहे. गावात कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नाहीत. कोयनानगरपासून या गावात पोहोचायला किमान 3 तास लागतात. हे अंतर तसं फक्त 20 किलोमीटर आहे.

कुठं किती पाऊस पडला (जून ते 4 सप्टेंबर पर्यंत)
पाथरपूंज 8,134 मिमी
नवजा 6,999 मिमी
वाळवण 6,775 मिमी
महाबळेश्वर 6,189 मिमी

घनदाट जंगल, अत्यंत कच्चा रस्ता, मुसळधार पाऊस , प्रचंड धुकं, जंगल सुरू होताच वाटेत दुथडी भरून वाहणारे ओढे... कुठे कुठे अख्खा रस्ताच वाहून गेलेला, जगापासून अलिप्त असलेल्या पाथरपूंज या गावात आम्ही पोहोचलो. पावसाने सगळीकडे ओल होती, गावातील बायाबापड्या घरात विस्तव करून ऊब घेत होत्या.

गुडघ्यापर्यंत साडी गुंडाळलेल्या 70 वर्षांच्या बनाबाई म्हणाल्या, "यंदा पावसाने मरायची बारी आली होती, जगू की मरू अशी स्थिती होती. सगळेजण गटाने बसलो होतो, गाव सोडून जाणं पण शक्य नव्हतं, सगळीकडे पाणी, घनदाट जंगल, रस्ता नाही. कसं जाणार? रस्ता नसल्याने भीतीत सगळे गावात राहिले, रस्ता नाही, गावात एक वडाप जीप ती पण मुसळधार पावसात जाण शक्य नसतं."

कळत्या वयापासून पहिल्यांदा इतका पाऊस पाहिल्याचं त्या सांगत होत्या. वारणा नदीचं पाणी गावात कधीच येत नाही. यंदा मात्र संपूर्ण घरातून पाणी वाहत होतं. त्यामुळे घरातील धान्य, जनावरं वाहून गेली. भातशेतीचं नुकसान झालं.

"यंदा इतका पाऊस झाला की जगणार की मरणार अशी स्थिती होती, जगू किंवा मरू, पण सर्वांनी एकत्र जमून मरायच असं आम्ही ठरवलं होतं. कोणताही पर्याय नव्हता, आम्ही गावातून बाहेर पडू शकत नव्हतो," गावातल्या संगीता चाळके सांगत होत्या.

श्रमदानातून तयार होतो रस्ता

गावातील दुर्दशा बघून भरत चाळके यांनी जीपची व्यवस्था केली. जेणेकरून कोणाला उपचाराची गरज पडली तर पोहोचवता येईल. मात्र डांबरी रस्ता नसल्याने मुख्य रस्त्याला जाण्यासाठी असलेलं 9 किलोमीटरच अंतर कापण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात.

रस्त्यावर दगड - गोटे, चिखल, माती यामुळे दोन महिन्यात गाडीचे टायर बदलावे लागत असल्याचं ड्रायव्हर विठ्ठल कदम यांनी सांगितलं.

"अनेकदा निवेदन देऊनही रस्ता होत नाही. दरवर्षी मळे, कोळने आणि पाथरपुंज या गावांमधले सर्व गावकरी श्रमदानातून रस्ता बांधतात," भरत चाळके यांनी माहिती दिली.

रस्त्यातच होतो गरोदर स्त्रिया, वृद्धांचा मृत्यू

पाथरपूंज गावात दवाखाना नाही. पुरानंतर गावात अनेकजण आजारी होते. पण 15 किलोमीटर अंतरापर्यंत कोणतच उपचार केंद्र नाही. "अचानक कोणाला उपचाराची गरज पडली तर दवाखान्यात पोहोचायला अडीच ते तीन तास लागतात. तोपर्यंत प्रयत्न करून पोहोचलं तर पोहोचलं, नाहीतर निम्म्या रस्त्यातच जीव जातो.

संगीता चाळके सांगत होत्या, "रस्ता नसल्याने सगळ्यांचे हाल होतात. गावात गरोदर बाईला कळा आल्या तर माझी सासू सोडवती त्यांना नाही जमल तर दवाखान्यात घेऊन जावं लागतं, पण तीन तास लागत असल्याने तोपर्यंत रस्त्यात डिलीव्हरी होती, गावातल्या दोघीजणी वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावल्या होत्या. तेव्हापासून गावात तरूण पोरं, सुना राहत नाहीत."

गावातील सर्व मुली, सुना मुंबईत घरकाम करतात, तर तरुण मुलं कंपनीत कामगार आहेत. पाथरपूंज या गावात बालवाडी ते आठवीपर्यंतची शाळा आहे. गावातील एकूण 18 विद्यार्थी इथे शिकतात. त्यापुढे मात्र मुलींचं शिक्षण बंद होतं. मुलांना नातेवाईकांकडे पाठवलं जातं. जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर सगळे मुंबईत कामासाठी जातात.

मुंबईत मुलं कंपनीत कामगार म्हणून काम करतात. तर अनेकांच्या मुली-सूना धुण्या-भांड्यांची काम करतात. भाड्याने खोली घेऊन राहतात. गावात रोजगार नसल्याने सर्व तरुण मुंबईत काम करतात. यामुळे गावात केवळ वृध्द मंडळी, लहान मुलं उरली आहेत. दोन-तीन तरुण गावात असतात.

अडीच महिन्यांपासून वीज नाही

गावात पावसाळ्यात तीन महिने वीज नसते. आम्ही गेलो तेव्हाही गावात वीज नव्हती.

"गावात सिलिंडर आणेपर्यंत एक हजार रुपये लागतात तेवढे आमच्याकडे नसतात, आमचं रॉकेलपण बंद आहे, लाकडांचा विस्तव करून आम्ही ऊब करतो त्याच्या उजेडावर दिसेल तेवढं दिसेल. यावेळच्या पावसाने सगळी लहान मुलं घाबरली होती, विस्तव करून सगळे बसलो होतो जगतोय का मरतोय या भीतीत," काजल चाळके अतिशय उद्विग्न होऊन बोलत होत्या.

पाथरपूंज गावची 30 वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी

"गेल्या 30 वर्षांपासून पाथरपूंज गावाचं पुनर्वसनाची मागणी करण्यात येतेय. आमची अख्खी पिढी इथे गेली, शेती, जमिनी गेल्या. पुढच्या पिढीच इथे भविष्य नाही. तरी सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. एकतर सर्व सुविधा द्यायला पाहिजे, नाहीतर सरकारने आमचं पुनर्वसन तरी केलं पाहिजे," ज्ञानू चाळके हे वृद्ध बोलत होते.

अनेकदा दाखवल्या गेलेल्या जागा या राहण्यास अयोग्य होत्या, शेती करता येईल आणि पाणी असेल अशी जागा सरकारने द्यावी, अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करत आहेत.

"मतदानापुरते नेते आमच्या गावात येतात. त्यानंतर कोणी फिरकत नाही. रस्ता, शाळा, वीज, रोजगार, पुनर्वसन असे अनेक प्रश्न आहेत. एवढा पाऊस झाला तरी आम्हाला विचारायला, परिस्थिती बघायला गावात आतापर्यंत कोणीच आलं नाही. तुम्हीच पहिल्यांदा आलात," भरत चाळके बीबीसी मराठीशी बोलत होते.

पाथरपूंज हे गाव चांदोली व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये वसलेलं आहे. त्यामुळे पाथरपूंज गावाचं पुनर्वसन केलं जाणार आहे. पण ज्या गावात पुनर्वसन केलं जाणार आहे, त्या गावानं अजून मान्यता दिली नाही. त्यांच्याकडून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहेत, असं व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते यांनी बीबीसीला सांगितलं.

सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनीही आपण या विषयाचा पाठपुरावा करणार असल्याचं बीबीसी मराठीला सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)