उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देण्याचं नेमकं कारण काय?

उर्मिला Image copyright Getty Images

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात उत्तर मुंबईतून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.

पक्षात त्यांचं म्हणण ऐकलं जात नसल्यानं नाराज होत त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या स्वीय साहायकानं पत्रकारांना एक संदेश पाठवून याची घोषणा केली आहे.

उर्मिला यांनी पत्रात काय म्हटलंय?

काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्यामागची कारणं स्पष्ट करणारं पत्रक उर्मिला यांनी प्रसिद्ध केलं आहे. 

"मुंबई काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना मी 16 मे रोजी एक पत्र लिहिलं होतं. त्यासंदर्भात सातत्यानं पाठपुरावा करून कोणतीही कारवाई न झाल्यानं माझ्या मनात पहिल्यांदा राजीनाम्याचा विचार आला. त्यानंतर अत्यंत गोपनीय असा मजकूर असलेलं हे पत्र माध्यमांपर्यंत पोहोचल्यानं माझी प्रचंड निराशा झाली. माझ्यादृष्टीनं ही कृती म्हणजे विश्वासघात होता," असं उर्मिला यांनी आपल्या राजीनाम्यामागची भूमिका स्पष्ट करणाऱ्या पत्रात लिहिलं आहे. 

"माझं पत्र माध्यमांमध्ये फुटल्यानंतर मी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, मात्र पक्षातील कोणीही त्याची दखल घेतली नाही," असा आरोपही उर्मिला यांनी केला आहे.

Image copyright CONGRESS/TWITTER

"मी माझ्या पत्रात उत्तर मुंबई मतदारसंघातील काही व्यक्तींचा उल्लेख केला होता. त्यांच्या कृत्याबद्दल जबाबदार धरण्याऐवजी त्यांना नवीन पदं दिली गेली. याचाच अर्थ मुंबई काँग्रेसमधील पदाधिकारी हे पक्षाच्या हितासाठी संघटनेमध्ये कोणताही बदल करु शकत नाहीत किंवा त्यांची तशी इच्छा नाहीये," असंही उर्मिला यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे. क्षुल्लक पक्षांतर्गत राजकारणासाठी माझा वापर होऊ नये असं वाटत असल्याचं उर्मिला यांनी म्हटलंय.

मिलिंद देवरा यांना लिहिलेल्या पत्रात उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कसं त्यांचं काम केलं नाही, त्यांची प्रचारयंत्रणा कशी प्रभावहीन केली, पार्टी फंड पुरेसा नसल्याचं कारण कसं देण्यात आलं, अशा तक्रारींचा मोठा पाढा वाचला होता.

स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांना काम न करायला लावता प्रचारात कसे अडथळे आणले, हेही त्यांनी या पत्रात सविस्तर लिहिलं होतं. उर्मिला मातोंडकर यांनी कोणत्याही मोठ्या नेत्याचं नाव पत्रामध्ये घेतलं नव्हतं, पण त्यांच्या अगोदर उत्तर मुंबई हा संजय निरुपम यांचा मतदारसंघ होता.

ज्या स्थानिक कार्यकर्त्यांची नावं त्यांनी या पत्रात लिहिली ते निरुपम यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांचा तक्रारीचा रोख त्यांच्याकडेच होता असा कयास लावला गेला.

मिलिंद देवरा-संजय निरुपम यांचे ट्वीट

उर्मिला यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते मिलिंद देवरा तसंच संजय निरुपम यांनी ट्वीट करत काँग्रेसमधील दुफळीवर बोट ठेवलं आहे.

"उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मी त्यांना पूर्णपणे सहकार्य दिलं. त्यांना पक्षात घेऊन आलेल्या नेत्यांनी त्यांची साथ सोडली तरी मी त्यांच्यासोबत उभा राहिलो. खरंच यासाठी उत्तर मुंबईमधील नेत्यांनाच जबाबदार धरायला हवं," असं मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अंतर्गत मतभेद हा कोणत्याही संघटनेचा अविभाज्य घटक असतो, असं संजय निरुपम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

'हताश होण्याऐवजी आपण त्याविरोधात लढायला हवं. मी उर्मिला मातोंडकरांनाही याबद्दल बोललो होतो तसंच संयम राखण्याची सूचना केली होती. त्यांनी राजीनामा देणं हे खरंच खूप दुर्दैवी आहे,' असंही संजय निरुपमांनी म्हटलं आहे.

काँग्रेसमध्ये राजकीय भविष्य नसल्यानं राजीनामा?

"उर्मिला मातोंडकर या रुढार्थानं राजकारणी नाहीयेत. त्या निवडणूक लढविण्यापुरत्या पक्षात आल्या होत्या. उर्मिला निवडून आल्या असत्या तर कदाचित त्या पक्षात राहिल्या असत्या. पण सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसची अवस्था पाहता पक्षात आपल्याला भवितव्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं असेल. शिवाय मूळ पिंड राजकारणातला नसल्यानं गटातटाचं राजकारणही उर्मिला यांना झेपणारं नव्हतं. त्यातूनच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा," असं मत पत्रकार किरण तारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांनी केलेलं ट्वीट

उर्मिला यांच्या राजकारण प्रवेशाबद्दल बोलताना किरण तारे यांनी म्हटलं, की उर्मिला यांचे वडील राष्ट्रीय सेवादलात होते. ही कौटुंबिक पार्श्वभूमी सोडली तर उर्मिला यांनी कधी कोणत्याही विषयावर राजकीय भाष्य केलं नव्हतं किंवा कोणत्याही राजकीय-सामाजिक विषयावर त्या सक्रीय नव्हत्या. पण उत्तर मुंबईमध्ये काँग्रेसकडे चेहराच नव्हता. उर्मिला यांचं मराठी असणं आणि ग्लॅमर या भांडवलावर काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली. ज्याप्रमाणे गोविंदाचं नाव वापरुन भाजपच्या राम नाईक यांचा पराभव केला गेला, त्याप्रमाणेच उर्मिलाच्या लोकप्रियतेच्या आधारे गोपाळ शेट्टींना हरवता येईल असं काँग्रेसला वाटलं. एक जागा निवडून आणणे हाच उर्मिलांना पक्षात आणण्यामागचा पक्षाचा उद्देश होता. पण तो सफल झाला नाही.

उर्मिला मातोंडकर यांनी राजीनामा देत जे पत्रक प्रसिद्ध केलं ते पाहता मुंबई काँग्रेसमधील गटबाजीबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

"मुंबई काँग्रेसमध्ये गटतट आहेत. ते पूर्वीपासूनच होते. मिलिंद देवरांचा गट, संजय निरुपमांचा गट, एकनाथ गायकवाडांचा वेगळा गट आहेत. या सर्वांना एकत्र बांधून ठेवेल असा कोणताही फोर्स किंवा नेतृत्व सध्या मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाहीये. ज्या राहुल गांधींच्या नेतृत्वाकडे पाहून उर्मिला पक्षात आल्या, ते राहुल गांधी आता पक्षाचे अध्यक्ष नाहीयेत. मिलिंद देवरांनीही मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या परिस्थितीत पक्षात आपल्याला भविष्य काय असा प्रश्न उर्मिला यांना पडणं स्वाभाविक आहे," असं किरण तारे यांनी म्हटलं.

उर्मिला यांचा राजीनामा हे काँग्रेसचं दुर्दैव

काँग्रेस सध्या अडचणीच्या परिस्थितीत आहे. अशावेळी ग्लॅमर आणि राजकारणाची समज असलेली उर्मिला मातोंडकर यांच्याासारखी व्यक्ती पक्षात टिकवता न येणं हे काँग्रेसचं दुर्दैव आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केलं.

Image copyright Getty Images

उर्मिला या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये आल्या होत्या. ज्या गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात त्या निवडणूक लढवत होत्या, त्यांचा मतदारसंघ हा अतिशय बांधीव होता. त्या मतदारसंघात भाजपला मेहनत घ्यायला लावणं हे उर्मिला यांचं यश होतं. त्या केवळ ग्लॅमर डॉल नव्हत्या, त्यांची वैचारिक जडणघडणही सेवादलाच्या मुशीतून झाली होती. खरं तर राजकारणात येणारे तारे-तारका जिकडे हवा आहे, तिकडे जातात. पण उर्मिला या वेगळ्या होत्या. त्यामुळेच ज्यापद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं डॉ. अमोल कोल्हेंना पक्षात स्थान दिलं आहे, त्याप्रमाणे काँग्रेसनंही उर्मिलांचा वापर करून घ्यायला हवा होता. मात्र मुंबई काँग्रेसमध्ये मिलिंद देवरा, संजय निरुपम, एकनाथ गायकवाड यांच्या गटातटाच्या राजकारणामुळे उर्मिलांना पक्षात यथोचित स्थान देता आलं नसल्य़ाचं नानिवडेकर यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)