वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती तुटण्याचे काय होणार परिणाम?

लोकसभा निवडणुकीत एक तिसरी ताकद म्हणून पुढे आलेली प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि ओवेसींची एमआयएम यांची युती अखेर तुटली आहे.

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केल्यानंतर आता पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही इम्तियाज जलील यांनी जाहीर केलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं स्पष्ट केलं आहे.

एकीकडे ही युती तुटलेली असताना इम्तियाज जलील यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या संबंधांचा आरोप केला आहे.

त्यांनी औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांबाबत माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "मला तर असं वाटतं की काही आरएसएसचे लोकं त्यामध्ये घुसलेले आहेत का? आरएसएसच्या लोकांनी त्यांच्या कानात सांगितले आहे का की, एमआयएमसोबत आपण युती करायला नको?"

Image copyright Getty Images

काय आहे इम्तियाज जलील यांचं म्हणणं?

बीबीसीशी याचसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "वंचित बहुजन आघाडीचं उद्दिष्ट होतं की ज्या वंचित घटकांना इतक्या वर्षांपासून सत्तेत वाटा मिळाला नाही, त्या सर्वांना एकत्रित करायचं होतं. आता आम्ही पाहतो की प्रकाश आंबेडकरांच्या आजूबाजूला असे काही लोक आहेत ज्यांना कोणी ओळखत नाही आणि हेच लोक वंचितच्या वतीने निर्णय घेत आहेत. आमचं हे म्हणणं आहे की हे लोक आरएसएसकडून तर पाठवले गेले नाहीत ना? हेच लोक तर प्रकाश आंबेडकरांना सल्ले देत नाहीत ना की एमआयएमसोबत आघाडी करू नका? आम्हाला माहीत आहे की प्रकाश आंबेडकर आरएसएसचे कट्टर विरोधक आहेत, पण आत्ता होणारे निर्णय पाहता अशी शंका येतीय की काही षडयंत्र तर नाही ना?"

एमआयएमसोबत जागावाटपाची चर्चा असदुद्दीन ओवेसींशी सुरू असून इतर कोणाशीही चर्चा सुरू नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. पण इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे की आंबेडकरांनी ओवेसींशीही चर्चा केलेली नाही.

Image copyright Facebook / Official Prakash Ambedkar

"तुम्ही वारंवार सांगताय की आमची चर्चा सुरू आहे, तर तुमची कोणाशी चर्चा सुरू आहे. एमआयएममध्ये दोनच लोक आहेत जे यावर निर्णय घेऊ शकतात. एक आहेत असदुद्दीन ओवेसी आणि दुसरा म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी. जर आम्हाला दोघांनाही काही फोन आलेला नाही तर ही चर्चा झालेली नाही. जर ओवेसी सांगतायेत की माझ्यासोबत काहीही चर्चा सुरू नाहीये, मलाही चर्चेसाठी कुठला फोन आलेला नाहीये, तर चर्चा कुणासोबत सुरू आहे? मला असे वाटते की ही सर्व दिशाभूल आहे. त्यांना एमआयएमला सोबत घेण्यात कुठलाही रस नाहीये," जलील पुढे सांगतात.

वंचित बहुजन आघाडीचं काय आहे म्हणणं?

यावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सचिन माळी यांनी म्हटलंय की एमआयएमसोबत युती कायम ठेवण्याचाच आमचा प्रयत्न आहे. बीबीसीशी बोलताना सचिन माळी म्हणाले, "आम्ही आमच्याबाजूने काडीमोड घेत नाहीत. शेवटच्या तासापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचाच प्रयत्न करतोय ही आमची आजची भूमिका आहे."

इम्तियाज जलील यांच्यावर मात्र सचिन माळी यांनी टीका केली आहे.

"जलील हे ओवेसींवर दबाव आणत असून महाराष्ट्रात पक्ष फुटण्याची भीती ओवेसींना आहे. इम्तियाज जलील गेले तर पक्षाची मान्यताही जाईल याचीही त्यांना भीती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधान परिषदेच्या जालना-औरंगाबाद मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी भाजप-शिवसेनेला अनुकूल भूमिका घेतली असा आमचा आरोप आहे. इम्तियाज जलील जे राजकारण करत आहेत हे घातक राजकारण आहे आणि आम्हाला हे मान्य नाही. मुस्लीम आणि बहुजनांची जी युती तयार झाली होती, त्या युतीला वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी नख लावण्याचे काम इम्तियाज जलील करत आहेत."

Image copyright Facebook / Imtiyaz Jalil

एमआयएमने विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडे 288 पैकी 74 जागा मागितल्या होत्या. एमआयएमचं म्हणणं आहे की वंचितनं त्यांना केवळ आठ जागांची ऑफर दिली असून आठ जागा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे की त्यांनी 17 जागा मागितल्या होत्या आणि त्या अनुषंगाने चर्चा सुरू होती.

काय होणार परिणाम?

दैनिक 'सकाळ'च्या औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड यांनी म्हटलंय की ही युती तुटल्यानं या दोन पक्षांचं तर नुकसान होणारच मात्र याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

"विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम स्वतंत्रपणे लढल्यास अर्थातच त्यांना दोघांना त्याचा फटका बसेलच. सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही फटका बसून भाजप-शिवसेनेला त्याचा फायदा होईल."

"आपण देऊ त्याच जागा एमआयएमनं घ्याव्यात आणि ते जर शक्य नसेल तर एमआयएम वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडली तरी चालेल असा एकूण प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत 'वंचित'ला एमआयएमचा हवा तसा फायदा झाला नाही अशी आंबेडकरांची भावना आहे. त्यामुळे ते आघाडीबाबत विशेष आग्रही दिसत नाहीत," असंही वरकड यांचं म्हणणं आहे.

संघाशी संबंधाबाबत जलील यांनी केलेल्या आरोपाबाबत त्यांनी म्हटलंय की, "वंचित बहुजन आघाडी भाजपची 'बी टीम' असल्याची टीका लोकसभा निवडणुकीदरम्यान झालीच होती. आता दोन्ही बाजूंमध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळे एमआयएमकडून थेट संघाशी संबंधाचा आरोप होत आहे. मतभेद टोकाला गेले असल्याचं यातून दिसलं आहे."

लोकसत्ताचे सहसंपादक मधु कांबळे विश्लेषण करताना सांगतात की, "लोकसभा निवडणुकीदरम्यान सबंध महाराष्ट्रभर सभा घेतल्या आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसला आणि एका वेगळ्या प्रकारचं ध्रुवीकरण झालं होतं. बहुजन समाजातील घटक -अल्पसंख्याक समाज असे एकत्र येताना दिसले आणि त्यातून एक जागाही निवडून आली. आता मात्र लोकसभा निवडणुका झाल्यानंतर, विधानसभा लगेच आहे माहिती असताना वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांचा एकही एकत्रित कार्यक्रम पाहायला मिळाला नाही. दोघांच्यामधील विसंवाद प्रकर्षानं जाणवत होता."

Image copyright Shashi K

मतभेदासाठी जागावाटप हे कारण सांगितलं जात असलं तरी आणखीही काही कारणं यामागे असू शकतात. प्रकाश आंबेडकरांना काँग्रेससोबत जाण्याबाबत रस दिसत नसून त्यांना एमआयएमसोबत आघाडी टिकवण्यात रस आहे असे सध्या तरी दिसतंय. हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढल्यास अर्थातच दोघांचेही नुकसान होणार हे स्पष्ट आहे.

लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला 40 लाखांहून अधिक मतं मिळाली होती. औरंगाबादमधून एमआयएमकडून इम्तियाज जलील निवडून आले. तर सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलडाणा, हातकणंगले या लोकसभेच्या सात जागांवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना लाखांहून अधिक मतं मिळाली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)