प्रकाश आंबेडकरांचा अकोल्याबाहेर एकही आमदार निवडून येणार नाही - रामदास आठवले

'वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता महाराष्ट्रात होऊ शकतो' या मुख्यमंत्र्यांच्या मताशी मी सहमत नाही असं स्पष्टपणे म्हणत या वेळेस वंचित आघाडीला यश मिळणार नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि 'महायुती'तले भाजपाचे सहयोगी रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

राज्यातल्या विरोधी पक्षांच्या अवस्थेवर बोट ठेवतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वंचित बहुजन आघाडीविषयी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं होतं.

"प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला लोकसभेमध्ये चांगली मतं मिळाली आहेत. पण विधानसभेला ते चित्र काही पहायला मिळणार नाही. नेतेच नाही तर खालच्या पातळीवर बरेचसे कार्यकर्ते त्यांच्याकडे वळले होते तेही आता आमच्या पक्षात परत आले आहेत. अकोल्यामध्ये त्यांचे एक-दोन आमदार निवडून येतात, पण बाहेर त्यांचा एकही आमदार निवडून येणार नाही. त्यामुळे त्यांचा विरोधी पक्षनेता होईल असं मला अजिबात वाटत नाही," असं रामदास आठवले यांनी 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलं आहे.

Image copyright BBC/SharadBadhe

आठवले यांच्या 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)' ने महायुतीमध्ये किमान १० जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे.

"मी चंद्रकांत पाटील यांना २३ जागांची यादी दिलेली आहे आणि त्यापैकी १० जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. पण जोपर्यंत भाजप-शिवसेनेच्या जागांचं वाटप होत नाही तोपर्यंत आमचा निर्णय होणार नाही. त्यामुळे आमची भाजपा-सेनेला सूचना अशी आहे की लवकरात लवकर आपला वाद मिटवावा, त्यांच्यामध्ये एकमत करावं आणि मित्रपक्षांना ज्या १८ जागा सोडायच्या आहेत ते ठरवावं," असं आठवले यांनी म्हटलं आहे.

आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासोबतच महादेव जानकर यांचा 'राष्ट्रीय समाज पक्ष', सदाभाऊ खोत यांच्यासोबत असलेली रयत क्रांती संघटना यांनाही महायुतीतल्या जागांची अपेक्षा आहे.

Image copyright BBC/SharadBadhe

"एक दोन जागा कमी जास्त होऊ शकतात, पण रिपब्लिकन पक्षाला प्रत्येक विभागात एक तरी जागा मिळायलाच पाहिजे. यावेळेस 'आरपीआय' चे ५-६ तरी आमदार निवडून आणूच असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्यामुळे आम्हाला निवडून येणारेच मतदारसंघ द्यावेत, पडणारे देऊ नयेत. जे मतदारसंघ दिले जातील तिथे दोन्ही पक्षांची मत आम्हाला मिळाली पाहिजेत," अशी मागणीही आठवले यांनी या मुलाखतीत केली आहे.

सध्या सेना-भाजपतले इतर पक्षांतून जे नेत्यांचं आणि इच्छुकांचं इनकमिंग आहे त्यामुळे 'आरपीआय' सारख्या छोट्या घटकपक्षांना हव्या त्या जागा न मिळण्याची भीती वाटते का असं विचारल्यावर आठवले म्हणाले की,"ते काही आम्हाला अडचणीचं ठरेल असं वाटत नाही. ते मतदारसंघ आमचे नाहीत. जे विद्यमान आमदार आहेत तेच बहुतांशानं बाहेरून आले आहेत. त्यामुळे आमच्या ज्या जागा आहेत त्या कोणी मागितल्या नाही आहेत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)