बिपिन रावत: 'पाकव्याप्त काश्मीरबाबत सरकारनं निर्णय घेतला तर सैन्य सज्ज आहे' #5मोठ्याबातम्या

बिपिन रावत Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बिपिन रावत

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. PoK बाबत रकारनं निर्णय घ्यावा, सैन्य तयार आहे - लष्करप्रमुख बिपिन रावत

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं होतं की "कलम 370 हटवलं. आता आमचं पुढचं उद्दिष्ट आहे पाकव्याप्त काश्मीर भारतात घेणं." त्यांच्या या विधानावर लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"PoK बाबत निर्णय घेण्याचं काम सरकारचं आहे. अशा कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सैन्य नेहमी तयार असतं," असं वक्तव्य भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

कलम 370 हटवल्यानंतर भारत प्रशासित काश्मीरच्या परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, "काश्मीरच्या लोकांना हे कळायला हवं की, हे जे काही होत आहे ते त्यांच्या भल्यासाठीच होत आहे. हे कलम हटवल्यानंतर काश्मीर आता संपूर्ण देशाशी जोडला गेला आहे. याचा अनुभव आता इथल्या लोकांनाही येईल."

"जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी 30 वर्षं दहशतवादाचा सामना केला. त्यानंतर आता जेव्हा आपल्याकडे शांतता असते, तेव्हा व्यवस्था कशी असते, हे अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली आहे,"असंही त्यांनी म्हटलं.

2. मोदी म्हणतात... 'पिक्चर अभी बाकी है'

"येत्या काही दिवसांत सरकार विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाची पावलं उचलणार आहे, पिक्चर अभी बाकी है..." असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

झारखंड येथे विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नरेंद्र मोदी

"सरकारनं 100 दिवसांत विकासकामाला सुरुवात केली आहे. अजून खूप काम बाकी आहे," असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, मोदींनी भारतातल्या पहिल्या पेपरविरहित विधिमंडळाचं झारखंडमध्ये उद्घाटन केलं. या विधिमंडळाच्या बांधकामासाठी जवळपास 465 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

3. उदयनराजे 14 सप्टेंबरला भाजप प्रवेश करणार

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले 14 सप्टेंबरला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पुढारीनं ही बातमी दिलीय.

Image copyright Sai sawant

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 15 सप्टेंबरला साताऱ्यात येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत ते सहभागी होणार आहेत.

उदयनराजे यांच्या वतीनं ही अधिकृत माहिती देण्यात आल्याचं बातमीत म्हटलं आहे.

4. मोदींच्या वाढदिवशी 370वर चर्चा करा - अहमदाबादच्या सरकारी शाळांना आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबरला आहे. या दिवशी सगळ्या सरकारी आणि खासगी शाळांमध्ये कलम 370 आणि 35A वर चर्चासत्र, संवाद, निबंधस्पर्धा आणि व्याख्यानांचं आयोजन करावं, असं पत्रक अहमदाबादच्या जिल्हा शिक्षण विभागानं काढलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

या कार्यक्रमाचे फोटो आणि इतर तपशील 18 सप्टेंबरपर्यंत जमा करावा, असंही या पत्रकात म्हटलं आहे.

"कलम 370 आणि 35Aवर भारत सरकारनं प्रशंसनीय पाऊल उचचलं आहे. त्यामुळे देशभरातील लोकांकडून त्याची प्रशंसा केली आहे. याची जगानंही दखल घेतली आहे," असं या पत्रकात म्हटलं आहे.

5. राम मंदिर मुद्द्यावरील वक्तव्य निंदनीय - सर्वोच्च न्यायालय

"अयोध्येत राम मंदिर बांधलं जाईल, कारण सर्वोच्च न्यायालय आपलं आहे," असं उत्तर प्रदेशचे मंत्री मुकूट बिहारी वर्मा यांनी म्हटलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

"अशाप्रकारच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. देशात या गोष्टी व्हायला नकोत. कोणत्याही भीतीशिवाय दोन्ही बाजूंना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे," असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)