राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याबाबत रामराजे नाईक निंबाळकरांचा सस्पेन्स कायम

रामराजे Image copyright facebook/ramraje naik nimbalkar

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या राजकीय वाटचालीबाबत सस्पेन्स कायम ठेवला असून येत्या आठ दिवसांत ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. फलटण येथे त्यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात रामराजे आगामी वाटचालीबाबत निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा होती. पण कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी येथे आलो असल्याचं सांगत रामराजेंचा हा कार्यकर्ता मेळावा कोणत्याही निर्णयाशिवाय संपला.

पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते असलेले रामराजे नाईक-निंबाळकर काय निर्णय घेणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. रामराजे नाईक - निंबाळकर हे 2015 पासून विधान परिषदेचे सभापती आहेत. फलटणच्या निंबाळकर राजघराण्याचे ते 29 वे वंशज असलेले रामराजे यांनी एमएस्सी करून त्यानंतर कायद्याची पदव्युत्तर पदवी म्हणजे एलएलएम केलेलं आहे.

राजकारणात येण्यापूर्वी ते कायद्याचे प्राध्यापक होते. फलटलणच्या नगराध्यक्षपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्यानंतर 1995 मध्ये फलटणमधून अपक्ष आमदार निवडून आले. युती शासनाच्या काळात स्थापन झालेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद रामराजे नाईक-निंबाळकरांकडे सोपवण्यात आले.

Image copyright facebook/ramraje naik nimbalkar

1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. 2004 मध्ये ते राज्याचे जलसंपदा मंत्री झाले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. धीरगंभीर प्रवृत्तीचे अभ्यासू राजकारणी म्हणून रामराजेंची ओळख आहे. पाणीप्रश्नावर त्यांचा उत्तम अभ्यास आहे.

रामराजेंचा प्रभाव किती आहे?

ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके रामराजे नाईक-निंबाळकरांच्या ताकदीविषयी सांगतात, "रामराजे नाईक-निंबाळकर यांची ताकद सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा, कोरेगाव आणि माण या भागांत त्यांचा परिणामकारक गट आहे. येत्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव पाडू शकतील. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांच्या गटाचे कायम स्वतंत्र अस्तित्व फलटणमध्ये राहिलेले आहे. त्यांची राजकारणातील सुरुवातच 1995 मध्ये अपक्ष म्हणून झालेली आहे."

शरद पवारांना या वयात सोडून जाण्याचा विचार करू शकत नाही असं रामराजेंनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. रामराजेंच्या आगामी वाटचालीबाबत विजय मांडकेंचं म्हणणं आहे की, "रामराजेंनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय जर नाही घेतला तर ते राष्ट्रवादी तांत्रिकदृष्ट्या न सोडता आपल्या समर्थकांना शिवसेनेत पाठवू शकतात याचीही शक्यता आहे. ते स्वत: विधान परिषदेवर असल्यामुळे ते काही विधानसभा लढवणार नाहीत. त्यांना सध्या कार्यकर्त्यांना पर्याय उपलब्ध करून द्यायचा आहे."

"शिवसेनेला अर्थातच रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या येण्याचा फायदाच होईल. सातारा जिल्ह्यात पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे सेनेचे एकमेव आमदार आहेत. सेना-भाजपच्या मतदारसंघ वाटपात पाटण, कराड उत्तर, माण-खटाव आणि फलटण हे चार मतदारसंघ सेनेच्या वाट्याचे आहेत. रामराजे आल्यास फलटण आणि माण-खटाव या दोन मतदारसंघांमध्ये सेनेला त्यांचा फायदा होऊ शकतो."

Image copyright Getty Images

नुकतेच माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे फलटणमधील रामराजेंचे विरोधक आहेत. तर सातारा जिल्ह्याच्या राजकारणात उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. दोघांनी वेळोवेळी अगदी उघडपणे एकमेकांवर टीका केली आहे.

राष्ट्रवादीला साताऱ्यात फटका

रामराजे नाईक-निंबाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यास राष्ट्रवादीला साताऱ्यात मोठा फटका बसणार आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले अगोदरच भाजपवासी झालेले आहेत. खासदार उदयनराजे भोसलेही भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यात रामराजेंच्या जाण्यानं साताऱ्यात खिळखिळी होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा हा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण आता साताऱ्यात शशिकांत शिंदे सोडल्यास पक्षाकडे मोठ्या नेत्यांची वानवा राहणार आहे.

Image copyright Sai sawant

रामराजे राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याबाबत विचार का करत असावेत याची कारणमिमांसा करताना लोकमतच्या सातारा आवृत्तीचे प्रमुख दीपक शिंदे सांगतात की, "रामराजेंच्या राष्ट्रवादीशी दुराव्याचे दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे उदयनराजे भोसले आणि त्यांच्यातील वादात पक्षानेतृत्वानं त्यांना हवी तशी साथ दिली नाही अशी त्यांची भावना आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पराभवाला रामराजेंना जबाबदार धरले गेले, त्यातूनही ते नाराज होते. दुसरे कारण म्हणजे निरा-देवघर धरणाच्या पाण्यावरून रामराजेंवर आरोप झाले आहेत. फलटण तालुक्याच्या हक्काचे निरा प्रकल्पातील पाणी रामराजे जलसंपदा मंत्री असताना बारामतीला गेले असा आरोप झालेला आहे. त्यामुळे हा आरोप खोडून काढण्यासाठी रामराजेंना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांपासून फारकत घेणे गरजेचे वाटत आहे.

रामराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडावी असा कार्यकर्त्यांचाही मोठ्या प्रमाणात आग्रह आहे. रामराजेंचे जवळचे कार्यकर्ते भीमदेव बुरूंगले यांनी म्हटलंय की, "आमचं म्हणणं आहे की अंतिम निर्णय जो काही आहे तो रामराजेंनीच घ्यावा. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडावं असा कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात आग्रह आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)