महाराष्ट्र विधानसभा: 'छत्रपतींनी मागणी करायची नाही, आदेश द्यायचा'-देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस Image copyright @Dev_Fadnavis

"छत्रपतींनी मागणी करायची नाही तर आदेश द्यायचा असतो, उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह भोसले हे दोन्ही राजे आमच्याकडे येताना कोणतीही अट घालून आलेले नाहीत," असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथे केले.

महाजनादेश यात्रा साताऱ्यात पोहोचल्यावर केलेल्या या भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

"विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे यांना विजयी करा," असं आवाहन करताना फडणवीस यांनी साताऱ्याचे प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासनही दिले. "शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न सोडवू, रस्त्यांच्या कामासाठी 50 कोटी रुपये देऊ," असे सांगताना शिवरायांच्या भूमीसाठी जे जे मागाल ते देईन असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

उदयनराजे महाराष्ट्राचे राजे आहेत, त्यांचा मान-सन्मान कमी होऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तत्पुर्वी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पगडी दिली तर शिवेंद्रसिंह राजे यांनी त्यांना तलवार भेट दिली.

माझी फाईल कचऱ्यात जायची

यावेळेस बोलताना उदयनराजे भोसले यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, "मी माझी फाईल घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे फाईल घेऊन गेलं की ती डस्टबिनमध्य़े जायची. मी निवडणूक जिंकली असली तरी नैतिकदृषट्या हरलो आहे. मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाणही होते आणि देवेंद्र फडणवीसही आहेत. पद तेच आहे. पण तेव्हा काम झाली नाहीत. "

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळतीवर बोलताना उदयनराजे म्हणाले, "वेळीच आत्मचिंतन, आत्मपरिक्षण केलं असतं तर आत्मक्लेश करायची वेळ आली नसती."

'न मिळणारी द्राक्षं आंबट'

जी द्राक्षं मिळत नाही, ती आंबट असतात, अशी शरद पवारांची स्थिती झाली आहे. जोपर्यंत उदयनराजे सोबत होते त्यांना घेऊन मतं मागण्यात पवारांना आनंद वाटत होता, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं पुण्यात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

उदयनराजे यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमधून होणारी टीका म्हणजे जी द्राक्षं मिळत नाहीत, ती आंबट, अशी स्थिती असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

"उदयन राजे त्यांच्यासोबत होते तोपर्यंत त्यांना समोर करून मत मागायला आनंद वाटत होता. दीड महिन्यांपूर्वी उदयन राजेंनी शिवस्वराज्य यात्रा काढावी असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसनं धरला होता. तेव्हा उदयनराजे राष्ट्रवादीसाठी चांगले होते. आता मात्र ते राष्ट्रवादीसाठी खराब झाले आहेत," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

'बारामतीत कलम 370 आहे काय?'

14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेदरम्यान राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप राष्ट्रवादी कडून केला जात आहे.

यावर विचारलं असता, मुख्यमंत्र्यांनी बारामती मध्ये काय 370 कलम आहे का? असा प्रश्न विचारला.

"बारामतीमध्ये दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी सभाच घायच्या नाहीत का? बारामतीमध्ये काय कलम 370 लागलंय की बारामती वेगळं झालंय महाराष्ट्रातून? जर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या प्रत्येक सभांमध्ये जाऊन गोंधळ घातला तर चालेल का, ही पद्धत आहे का?" असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतले इतर मुद्दे-

1. पिंपरी चिंचडवला नवीन आयुक्तायलय सुरू करण्यात आलं. पुणे म्हणजे महाराष्ट्राचं इंडस्ट्रियल मॅग्नेट.

2. गेल्या 5 वर्षांत देशात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशामधील सर्वाधिक रोजगार महाराष्ट्रात आलाय. रोजगार निर्मितीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

3. पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाचे बंद पडलेले सगळे प्रकल्प आमच्या सरकारनं मार्गी लावले. त्यांना निधी दिला.

4. जुन्या सरकारमधले अनेक मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील असूनही त्यांच्या काळात जे झालं नाही, ते आमच्या सरकारनं केलं.

5. होर्डिंग्ज लावल्यामुळे उमेदवारी मिळत नाही, त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्ज लावू नयेत. लावल्यास कारवाई करण्यात येईल.

6. सिंचन घोटाळ्याची सुनावणी आता पूर्णत्वाला चाललीय, याबाबातची अंतिम सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहेत. आम्ही सर्व पुरावे न्यायालयाकडे सादर केले आहेत.

7. शरद पवारांनी राजकीय दौऱ्यावर गेलं पाहिजे.

8. मेक इन महाराष्ट्र अंतर्गत कोणत्या जिलह्यात किती रोजगार निर्माण झाला, हे लवकर जाहीर करणार आहोत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)