आंध्र प्रदेश: गोदावरी नदीत बोट उलटून 11 जणांचा मृत्यू, NDRF आणि APSDMA बचावकार्यात तैनात

बोट उलटून 11 जणांचा मृत्यू Image copyright BBC NEWS TELUGU

आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवीपट्टनम इथं बोट उलटून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (15 सप्टेंबर) हा अपघात घडला.

आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं (APSDMA) या अपघाताबद्दलची माहिती दिली आहे.

या बोटीत 61 प्रवासी होते. यांपैकी 50 जण हे पर्यटक होते तर 11 जण बोटीवरील कर्मचारी होते. गोदावरी नदीजवळील पपीकोंडालू टेकड्या पाहण्यासाठी ते निघाले होते.

लाइफ जॅकेट घातलेले 20 लोक पोहून किनाऱ्याला लागले. त्यांना स्थानिकांची मदत झाली.

आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती पूर्व गोदावरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नेहीम हाशमी यांनी दिली.

NDRFच्या दोन टीमही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये 30 सदस्य आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशमधील दुर्घटनेमुळं आपण व्यथित झालो आहोत, असं म्हटलं. मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Image copyright BBC NEWS TELUGU

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगन मोहन रेड्डी यांनी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मदतकार्यासाठी नौदल तसंच ONGCचे हेलिकॉप्टर्स वापरण्याची सूचनाही जगन मोहन रेड्डी यांनी केली आहे.

तेलंगणामधील वारंगळ येथील एका तरुणानं 14 जणांच्या त्यांच्या गटातील 9 जण अजूनही बेपत्ता असल्याचं सांगितलं.

या अपघाताबद्दल कळल्यावर धक्का बसला, अशी प्रतिक्रिया आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली. या भागात वेगानं मदतकार्य करावं असं आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाला केलं आहे.

जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी त्यांच्या पक्षकार्यकर्त्यांना घटनास्थळी जाऊन मदत करण्याचे आवाहन केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)