काश्मीर: वादग्रस्त मृत्यूंमुळे काश्मीरमध्ये भीती आणि तणावाचं वातावरण

असरार

काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 भारताने रद्द केल्यानंतर आता सहा आठवडे पूर्ण झालेत. गेल्या सहा आठवड्यात काश्मीरमध्ये झालेल मृत्यू सुद्धा आता वादाचा विषय ठरत आहेत. बीबीसीच्या योगिता लिमये यांनी श्रीनगरमधील काही प्रकरणांचा घेतलेला हा आढावा.

6 ऑगस्ट रोजी असरार अहमद खान या 17 वर्षीय मुलाला रस्त्याच्या कडेला असताना दुखापत झाली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर चार आठवड्यांनी हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला.

असरार प्रचंड हुशार विद्यार्थी होता. त्याला खेळाची आवड होती. असरारचा मृत्यू आता काश्मीरमध्ये वादाचा मुख्य मुद्दा बनला आहे.

पाहा हा व्हीडिओ

असरारचे वडील फिरदोस अहमद खान यांच्या आरोपामुळं या नव्या वादाला तोंड फुटलंय. "असरार त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना, त्याच्या डोक्याला अश्रुधुराचे डबे आणि पॅलेट गनच्या गोळ्या लागल्या."

असरारसोबतच क्रिकेट खेळणाऱ्या त्याच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, हे अश्रुधुराचे डबे आणि शिसे भारतीय निमलष्करी दलाच्या सैनिकांना फेकले होते.

वैद्यकीय अहवालानुसार, असरारचा मृत्यू पॅलेटगनच्या गोळ्यांमुळं आणि अश्रुधुराचे डब्यांच्या स्फोटामुळं झाला. मात्र, काश्मीरमधील भारताचे वरिष्ठ लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल केजेएस धिल्लो यांच्या म्हणण्यानुसार, काश्मिरी आंदोलकांनी भारतीय सैन्यावर फेकलेल्या दगडफेकीत असरारच्या मृत्यू झाला.

काश्मीर पोलिसांनी बीबीसीशी बोलताना लेफ्टनंट जनरल केजेएस धिल्लो यांच्या विधानाचं समर्थन केलं. शिवाय, वैद्यकीय अहवाल संदिग्ध असून, आणखी तपासाची गरज आहे, असंही काश्मीर पोलिसांनी म्हटलंय.

भारत सरकारनं काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवून, जम्मू-काश्मीरचं विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश जाहीर केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी असरारच्या दुखापतीची घटना घडली होती.

भारत सरकारच्या या पावलानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हजारो अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आलं होतं, अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती, शाळा-महाविद्यालयं बंद करण्यात आली, पर्यटकांना काश्मीर सोडण्यास सांगितलं गेलं, टेलिफोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आणि राजकीय नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं.

'पंतप्रधानांना माझं दुःख कळतंय का?'

असरारच्या कुटुंबीयांनी त्याचं दहावीचं प्रमाणपत्र दाखवलं. दहावीला असरारला 84 टक्के गुण मिळाले होते. एका वर्तमानपत्राचं कात्रण सुद्धा त्याच्या कुटुंबीयांनी जपून ठेवलंय. त्यात क्रिकेट ट्रॉफी देऊन असरारचा सत्कार करत असल्याचा फोटो आहे.

असरारचे वडील बीबीसीशी बोलताना विचारत होते, "भारताच्या पंतप्रधानांना माझं दुःख कळतंय का? त्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय का? कुठला निषेध तरी व्यक्त केलाय?" "उद्या आणखी मृत्यू होतील. काश्मीर जबाबदारी घ्यायला कुणीच तयार नाही," असंही ते म्हणाले.

'दगडफेकीत असरारचा मृत्यू झाला'

भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर भारतीय सैनिकांच्या कारवाईत एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नाही. मात्र, सरकारविरोधी आंदोलकांच्या दगडफेकीत असरारसह आणखी दोघांचा मृत्यू झाला, असंही सरकारनं म्हटलंय.

भारत सरकारच्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील त्राल भागात दोन भटके विमुक्त आणि एका दुकानदाराला सशस्त्र बंडखोरांनी ठार मारलं.

यातील 60 वर्षीय दुकानदार गुलाम मोहम्मद हे पत्नीसोबत 29 ऑगस्टच्या संध्याकाळी दुकानात बसले होते. त्यावेळी त्यांच्यावर तिघांनी गोळीबार केला आणि हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले.

कट्टरतावाद्यांनी दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं होतं आणि या आवाहनाला गुलाम मोहम्मद यांनी प्रतिसाद न दिल्यानं त्यांना ठार मारण्यात आल्याची चर्चा आहे.

Image copyright AFP

काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांच्या म्हणण्यानुसार, कट्टरतावाद्यांनी दुकानं, बँका आणि पेट्रोल पंप बंद ठेवण्यासाठी काही पत्रकं कट्टरतावाद्यांनी वाटली होती.

गुलाम मोहम्मद यांच्या घरी बीबीसीनं भेट दिली. मात्र, मोहम्मद यांचे कुटुंबीय बोलण्यास घाबरत होते. मोहम्मद यांच्या हत्येमागे नेमका काय हेतू होता, याचा शोध घेत असल्याचं पोलिसांनी कुटुंबीयांना सांगितलंय.

'सरकारी आकडेवारीत अनेक मृत्यूंच्या नोंदी नाहीत'

मात्र, काही लोक म्हणतात की, सरकारच्या 'अधिकृत आकडेवारी'त गेल्या काही दिवसातील मृत्यूंची नोंद नाहीय. यातल्याच रफिक शागू यांनी बीबीसीला सांगितलं की, 9 ऑगस्ट रोजी श्रीनगरमधील बेमिना इथं असणाऱ्या दुमजली घरात पत्नीसोबत (फहमिदा बानो) चहा घेत होतो. त्याचवेळी जवळच आंदोलक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये संघर्ष सुरू झाला.

आंदोलकांना पांगवण्यासाठी सैन्याकडून वापरण्यात आलेल्या अश्रुधुराची डबी घरात पडली आणि त्यामुळं फहमिदाचा श्वास कोंडू लागला, असं रफिक सांगतात.

रफिक सांगतात, "तिनं मला सांगितलं की, तिचा श्वास कोंडतोय. त्यामुळं तातडीनं तिला मी हॉस्पिटलमध्ये नेलं. मला काय झालंय, असंच ती वारंवार विचारत होती आणि खूप घाबरली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण फहमिदाची मृत्यूशी झुंज संपली."

Image copyright Getty Images

वैद्यकीय अहवालानुसार, फहमिदांचा मृत्यू विषारी वायूमुळं झाला. रफिक शागू हे फहमिदाच्या मृत्यूची चौकशी करण्याची विनंती करणारी याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

श्रीनगरमधील सफकदल इथल्या 60 वर्षीय मोहम्मद अयुब खान यांचा मृत्यूची स्थितीही फहमिदा यांच्यासारखीच आहे.

अश्रुधुराचा टीन बाजूला पडल्याने मृत्यू?

मोहम्मद अयुब खान यांचे मित्र फयाज अहमद खान यांच्या माहितीनुसार, 17 ऑगस्ट रोजी सफकदल परिसरातून मोहम्मद अयुब खान यांच्यासोबत जात असातना बाजूलाच आंदोलन आणि सैनिकांमध्ये संघर्ष सुरू झाला. अश्रुधुराचा एक टीन खान यांच्या पायाजवळ पडला आणि फुटली.

त्यानंतर फयाज यांनी मोहम्मद अयुब खान यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं, पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांचा जीव गेला होता. मोहम्मद अयुब खान यांचा कुठलाही वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आला नाही.

अश्रुधुरामुळं मोहम्मद अयुब खान यांचा मृत्यू झाल्याच्या केवळ अफवा आहेत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

काश्मीरचा परिसर गेल्या काही दिवसांपासून जवळपास बंद असूनही आणि संचारबंदीसदृश स्थिती असूनही सरकार आणि सैनिकांविरोधात आंदोलनं होत आहेत. अनेकदा ही आंदोलनं हिंसक सुद्धा होतात.

Image copyright Getty Images

हॉस्पिटलकडून जखमींच्या संख्येबाबत मौन बाळगलं जातंय. दुसरीकडे, अनेकजण जखमी होऊनही योग्य वैद्यकीय सुविधांसाठी हॉस्पिटलपर्यंत जात नाहीत. कारण आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल आपल्याला अटक केली जाईल, याची त्यांना भिती आहे.

सरकारनं याआधीच हजारो लोकांना ताब्यात घेतल्याचं म्हटलं जातंय. यात कार्यकर्ते, स्थानिक राजकीय नेते, व्यापाऱ्यांचा समावेश आहे. अनेकजणांना तर काश्मीरबाहेर भारतातील विविध शहरांमधील तुरूंगांमध्ये हलवण्यात आलंय.

'आधीपेक्षा कमी मृत्यू'

मात्र, किती लोक मृत्युमुखी पडले किंवा जखमी झालेत, हे नेमकं सांगणं कठीण असलं तरी, हे निश्चित आहे की, काश्मीरमधील अशांततेचं प्रमाण आधीपेक्षा कमी झालंय.

Image copyright AFP/getty
प्रतिमा मथळा राज्यपाल सत्यपाल मलिक (संग्रहित)

"सध्याची स्थिती 2008, 2010 आणि 2016 सालच्या घटनांच्या बरोबर उलट आहे. या तीन वर्षांमध्ये काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी आपला जीव गामावला होता", असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी माध्यमांना सांगितलं.

कुठल्याही व्यक्तीला धोका न पोहोचता काश्मीरमध्ये हळूहळू सर्व सुरळीत व्हावं, यासाठी सुरक्षादलाचे सर्व सैनिक रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत, असंही राज्यपालांनी सांगितलं.

दरम्यान, अनेकांच्या म्हणणं आहे की, संवादाची सर्व माध्यमं बंद केल्यानं आणि सैन्याच्या दबावामुळं लोक आपला रोष व्यक्त करू शकत नाहीत.

काश्मीरमधील निर्बंध पूर्णपणे कधी हटवले जातील, हे अद्याप स्पष्ट नाही आणि ते हटवल्यानंतर काय स्थिती असेल, काय होईल, हेही सांगता येत नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)