प्रकाश आंबेडकरांना शरद पवार नको होते म्हणून वंचितबरोबर आघाडी नाही - बाळासाहेब थोरात

विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटप करण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं बाजी मारलीय. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 125 जागा घेऊन 38 जागा मित्रपक्षांसाठी सोडल्यात.

लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीला पूरक भूमिका घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आघाडीत जाऊन नवीन समीकरणं तयार करतील का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीनं जागावाटप करून तो प्रश्नही निकालात काढलाय.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बीबीसी मराठीला खास मुलाखत दिली. त्यात त्यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली.

'आघाडीत येण्यासाठी ना मनसेकडून प्रस्ताव, ना आमच्याकडून'

Image copyright Twitter

बाळासाहेब थोरात म्हणाले, "आघाडीत येण्यासंदर्भात राज ठाकरेंकडून कुठलाही प्रस्ताव नाही किंवा आम्हीही तसा काही प्रस्ताव दिला नाही. किंबहुना, मनसेच्या संदर्भात अजून तशी काही चर्चाच झाली नाही."

आता राज ठाकरेंनी आघाडी येण्याचं म्हटल्यास काही शक्यता आहे का, यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, आता तशी काहीच शक्यता नाही.

"आघाडीमध्ये जिथं जिंकण्याची संधी आहे अशा 125-125 जागा काँग्रेस-राष्ट्रवादीनं निवडल्या. 38 जागा शिल्लक आहेत, मित्रपक्षांना दिल्या जातील. याशिवाय मित्रपक्षांना आमच्या 125 जागांमधील काही देण्याची वेळ आली तर तीही मानसिकता आम्ही तयार केलीय," असंही थोरातांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.

'वंचितचा फायदा भाजप-शिवसेनेल, हे जनतेला कळलंय'

"प्रकाश आंबेडकरांशी आम्ही खूपवेळा चर्चा केली, अनेक बैठका घेतल्या. समविचारी पक्षांनी एकत्र यावं. राष्ट्रीय पातळीवर वळणाची स्थिती आहे. पुढच्या काळासाठी हा कालखंड महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रवादीसोबत नको, ही अट त्यांची आम्ही मान्य करू शकत नाही. कारण यूपीएमध्ये राष्ट्रवादी हा आमचा घटकपक्ष आहे. त्याला आम्ही नाकारू शकत नाही. त्यामुळं ती चर्चा पुढे गेली नाही," असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

Image copyright Twitter

प्रकाश आंबेडकरांच्या जागांच्या मागण्यांवर चर्चा होऊ शकत होती, मात्र यूपीएमध्ये असलेल्या राष्ट्रवादी पक्षालाच ते नको म्हणत असल्यानं चर्चा थांबली, असंही थोरातांनी स्पष्ट केलं.

वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभेतील कामगिरीबद्दल बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, "लोकसभेवेळी जी जनता वंचित बहुजन आघाडीसोबत गेली, त्यांना लक्षात आलंय की, आपला फायदा वंचितला झाला नाही, तर भाजप-शिवसेनेला फायदा झाला. पुरोगामी विचारांचा तोटा झाला. हे आता जनतेनं ओळखलं आहे."

'...म्हणून विखे तसं बोलतात'

काही दिवसांपूर्वी संगमनेरमधील एका कार्यक्रमात नुककेच भाजपवासी झालेल्या गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचा एकही आमदार येणार नसल्याचा दावा केला.

Image copyright Twitter

विखे पाटलांचे परंपरागत स्पर्धक राहिलेले थोरात म्हणाले, "राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते म्हणून काम केलंय. काँग्रेसचा एकही आमदार येणार नाही, असं म्हणणं बरोबर नाही. भाजपला अनुकूल बोलावं म्हणून ते बोलत असावेत."

काँग्रेसचे चांगल्या संख्येने आमदार निवडून येतील, असा विश्वासही थोरातांनी यावेळी व्यक्त केला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)