चांद्रयान-2 मोहीम संपुष्टात? इस्रोकडून भारतीयांचे आभार मानणारं ट्वीट

ISRO.GOV.IN Image copyright ISRO.GOV.IN

अमेरिकेची संशोधन संस्था `नासा'चं ऑर्बिटर मंगळवारी विक्रम लँडर असलेल्या जागेवरून प्रवास करणार होतं. परंतु नासाकडून अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. इस्रोकडूनही विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सतत सुरू असतानाच, इस्रोने ट्वीट करून भारतवासीयांच्या पाठिंब्यासाठी आभार मानले आहेत.

त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. अनौपचारिक पद्धतीनं इस्रोनं ही मोहीम संपल्याचं तर जाहीर नाही ना केली असं लोक ट्विटरवर विचारत आहेत.

त्याचवेळी अनेकांकडून इस्रोची प्रशंसा सुद्धा केली जात आहे.

देशवासीयांचा ठामपणे पाठिंबा मिळाल्याबद्दल इस्रोने आभार मानले आहेत. यापुढेही जगभरातील भारतीयांच्या आशा आणि स्वप्नं घेऊन आम्ही आणखी पुढे जात राहणार आहोत, असंही इस्रोने या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

इस्रोकडे विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी आता चारपेक्षा कमी दिवस बाकी असतानाच्या पार्श्वभूमीवर इस्रोने भारतवासीयांचे आभार मानणारे हे ट्वीट केलं आहे.

नासाने चंद्रावर पाठवलेलं ऑर्बिटर सध्या चंद्राभोवती भ्रमण करत आहे. परंतु विक्रम लँडरबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी इस्रोकडे 21 सप्टेंबरपर्यंतची म्हणजेच आता केवळ चार दिवसांची मुदत बाकी आहे. या चार दिवसांनंतर चंद्राच्या दक्षिण धृवावर रात्र होईल.

विक्रम लँडर रोव्हरची रचना एक चांद्रदिवस म्हणजेच पृथ्वीवरील 14 दिवस काम करू शकेल, अशी होती.

Image copyright JAXA/NHK
प्रतिमा मथळा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा हा फोटो जपानच्या अवकाशयानाने टिपला आहे.

7 सप्टेंबर 2019 रोजी चंद्रावर उतरत असताना इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. यानंतर सातत्याने दहा दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून, 8 सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 वरच्या ऑनबोर्ड कॅमेऱ्यातून लँडर चंद्रभूमीवर असल्याचं दिसलं, असं इस्रोनं सांगितलं होतं. यानंतर आतापर्यंत अन्य संपर्क होऊ शकलेला नाही.

याचदरम्यान अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था `नासा'ने मदतीचा हात पुढे केला होता. नासाच्या चांद्र मिशनची सुरुवात 18 जून 2009 साली झाली होती.

अॅटलस व्ही रॉकेटने ऑर्बिटरचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. 10 सप्टेंबर 2010 रोजी एलआरओचे मिशन पूर्ण झालं होतं. एलआरओमध्ये हाय रेझोल्युशनचा कॅमेरा बसवलेला आहे. या कॅमेराने 40 वर्षांपूर्वीच्या अपोलो मिशनवरील चंद्रावरील मानवी पाऊलखुणा टिपल्या आहेत.

शिवाय नासाच्या ऑर्बिटरने चीनच्या चँग 3 आणि चँग 4 लँडरचेसुद्धा फोटो काढले आहेत. इतकेच नाही, तर काही महिन्यांपूर्वी इस्रायलच्या बेरेशीटने चंद्रावर क्रॅश लँडिंग केलं होतं, त्याचेही फोटो टिपले आहेत. यामुळेच विक्रम लँडरची माहिती मिळण्याची आशाही निर्माण झाली होती.

अभिनेता ब्रॅड पीटलाही उत्सुकता

अभिनेता ब्रॅड पीटने नासाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्याने अंतराळवीर निक हॉगशी थेट संपर्क साधला आणि त्याला मोहिमेबाबत अनेक प्रश्न विचारले.

अंतराळातलं आयुष्य कसं असतं हे जाणून घेण्याचाही त्यानं प्रयत्न केला. यावेळी भारताचं चांद्रयान-2 दृष्टिक्षेपात आलं होतं का, याबाबतही त्यानं चौकशी केली. यावर हॉग यांनी `दुर्दैवानं अद्याप नाही' असं उत्तर दिलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)