विधानसभा निवडणूक ईव्हीएमवरच होणार: निवडणूक आयुक्त सुनील अरोरा#5मोठ्या बातम्या

ईव्हीएम मशीन Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. मतपत्रिका इतिहासजमा आता मतदान ईव्हीएमवरच

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी ईव्हीएमद्वारेच मतदान घेण्यात येईल याचा ठाम पुनरुच्चार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बुधवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ करण्याच्या मागणीवर कोणताही विचार होणे शक्य नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसन कार्यात निवडणूक आचारसंहितेमुळे कोणतीही अडचण येणार नाही आणि आवश्यकता वाटल्यास आचारसंहितेच्या काळामध्ये राज्य सरकारच्या मागणीचा आयोग नक्की विचार करेल असेही अरोरा यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

2. पंतप्रधानांच्या सभेमध्ये कांद्याला बंदी

कांद्याचे दर उंचावत असताना केंद्र सरकारनं निर्यातीवर निर्बंध आणत इतर देशातून आणण्याची तयारी केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे असंतोषाचा हा भडका पंतप्रधानांच्या सभेत उडू नये म्हणून त्यांच्या नाशिकमध्ये होणाऱ्या सभेमध्ये चक्क कांदा आणायला बंदी घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज तपोवनमधील साधुग्राम मैदानावर सभा होणार आहे.

Image copyright PTI

या सभेच्या आणि कांद्याच्या कोंडीमुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेस बाधा पोहोचू नये यासाठी आज सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.

2. उद्धव ठाकरे आमची ओढाताण समजून घेतील- चंद्रकांत पाटील

भाजपाचे सध्याचे 122 आमदार आणि नव्याने आलेले आमदार अशी एकूण संख्या 136 झाली आहे. त्या जागा राखणे आम्हाला क्रमप्राप्त आहे.

तसेच ज्या जागा भाजपने अत्यंत चांगल्या पद्धतीनं बांधलेल्या आहेत आणि जिथे योग्य उमेदवारही आहेत अशा जागा जोडल्या, तर आम्हाला जास्त जागा लागतील, आमची ही ओढाताण लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनाचा मोठेपणा दाखवतील अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. हे वृत्त लोकमतनं प्रसिद्ध केलं आहे.

Image copyright Getty Images

विधानसभेत जिथं भाजपकडे विजयी होणारे उमेदवार आधीपासून आहेत तिथं आम्ही इनकमिंग होऊ दिलेलं नाही. असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

3. विकासकामं म्हटली की पर्यावरणावर परिणाम होणं अटळ

आरे वसाहतीमध्येच मेट्रो कारशेड तयार करण्याचा एकमेव पर्याय आहे. कांजूरमार्गच्या पर्यायी जागेबद्दलही आम्हाला जाणून घ्यायचं आहे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं एमएमआरडीएला दिले आहेत.

Image copyright RADHIKA JHAVERI

तसेच विकासकामं म्हटलं की त्याचा पर्यावरणावर कुठेतरी पर्यावरणावर परिणाम होणारच त्यामुळे या प्रकरणात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना आणि त्यांच्या वकिलांना मुख्य न्यायाधीशांनी सांगितले.

आरेमध्ये कारशेड उभारण्यासाठी मुंबई महापालिकेने 2700 झाडांची तोड करण्यास परवानगी दिलेली आहे. त्याविरोधातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. यावेळेस याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेतील अनेक मुद्द्यांबाबतही हायकोर्टाने असामाधान व्यक्त केले. हे वृत्त एबीपी माझानं प्रसिद्ध केलं आहे.

5. 18 ऑक्टोबरपर्यंत अयोध्या प्रकरणाची सुनावणी संपणार

अयोध्येतील 2.77 एकर जमिनीसाठी गेली 70 वर्षे सुरू असणारे कायदेशीर प्रकरण येत्या ऑक्टोबर महिन्यात संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा निकाल 17 नोव्हेंबरआधी किंवा नंतर येण्याची शक्यता आहे. 17 नोव्हेंबररोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त होत आहेत.

युक्तीवादासाठी आपल्याला किती वेळ लागू शकतो याचा अंदाज के. पराशरन, सी. एस वैद्यनाथन आणि राजीव धवन यांनी दिला.

त्यानंतर सरन्यायाधीश गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नझीर यांनी 18 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पुढील चार आठवड्यांत सुनावणी संपेल अशी आशा व्यक्त केली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)