नरेंद्र मोदी नाशिकमध्येच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ का फोडतात?

नरेंद्र मोदी Image copyright BBC/PRAVIN THAKARE

"प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या चरणस्पर्शानं पावन आणि आदिमाया आदिशक्ती महिषासुरमर्दिनी सप्तशृंगी मातेच्या स्पर्शानं पवित्र अशा नाशिकच्या या धर्मभूमीला माझा शतशत नमस्कार..." या वाक्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं.

नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप झाल्यानंतर आयोजित सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केलं.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मोदींनी नाशिकमधूनच प्रचाराचा नारळ फोडला होता. यंदाही नाशिकमधूनच प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे. पण, मोदींनी या सभेसाठी नाशिकच का निवडलं असावं?

या प्रश्नाचं उत्तर देताना राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी सांगितलं, "नाशिक हे पंचवटीचं स्थान आहे, रामाचं स्थान आहे, कुंभमेळ्याचं स्थान आहे. त्यामुळे धार्मिक स्थळ म्हणून नाशिकचं महाराष्ट्रात मोठं महत्त्व आहे. याशिवाय आजच्या मोदींच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्याप्रकारे जयजयकार झाला, तो पाहिल्यास भाजपला ही सभा धार्मिकतेचं प्रतीक अशा पद्धतीची ठेवायची आहे."

"नाशिकला दक्षिणेची काशी म्हटलं जातं आणि गोदावरीच्या तटावर केलेला कोणताही संकल्प सिद्धीस जातो, असं समजलं जातं. मोदी ज्या व्यासपीठावर उपस्थित होते, त्यावर मागे 'नरेंद्र मोदी विजयी संकल्प सभा' असं लिहिलेलं होतं. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्याचा संकल्प करण्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली होती," असं लोकमतच्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक किरण अग्रवाल सांगतात.

तर दैनिक पुढारीच्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर कावळे सांगतात, "भाजपचा भर पहिल्यापासून धार्मिक बाबींकडे राहिला आहे. सप्तशृंगीचं नाव घेऊन मोदींनी भाषण सुरू केलं, गेल्यावेळी त्यांनी सप्तशृंगीला सोन्याची पावलं दान केली होती. शप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर हा मोदींच्या श्रद्धेचा विषय असल्यानं त्यांनी नाशिकमधून प्रचाराला सुरुवात केली आहे."

'सत्तेसाठी उत्तर महाराष्ट्र निर्णायक'

भाजपला सत्ता काबीज करायची झाल्यास त्यासाठी उत्तर महाराष्ट्र महत्त्वाचा आहे, असं कावळे यांना वाटतं.

ते सांगतात, "लोकसभेच्या 8 पैकी 8 जागा जागा उत्तर महाराष्ट्रानं भाजपच्या पारड्यात टाकल्या आहेत. आता विधानसभेच्या 47 जागांवर भाजपचं लक्ष आहे. या जागा विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी निर्णायक भूमिका निभावू शकतात, त्यामुळेही मोदींनी प्रचाराचा नारळ नाशिकमधून फोडला आहे."

Image copyright BBC/PRAVIN THAKARE

देसाई एक नवीन मुद्दा उपस्थित करतात.

त्यांच्या मते, "नाशिकमध्ये ओबीसींचे नेते म्हणून छगन भुजबळ यांची ओळख आहे. पण, या ठिकाणी नरेंद्र मोदींना बोलावून नरेंद्र मोदी हेच ओबीसींचे नेते आहेत, असं भाजपला दाखवायचं असू शकतं. मराठा आरक्षणामुळे ओबीसींची नाराजी ओढवू नये, म्हणूनही कदाचित इथून सुरुवात करण्यात आली असावी," देसाई सांगतात.

"याशिवाय नाशिकनजीक धुळे, नंदूरबार असा आदिवासी पट्टा येतो. या पट्ट्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम आहे. त्यामुळे नाशिकच्या सभेतून या पट्ट्यापर्यंत पोहोचण्याचाही उद्देश असू शकतो," देसाई पुढे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)