नरेंद्र मोदींची राम मंदिर मुद्द्यावर ठाकरेंवरील टीका म्हणजे युती न होण्याचे संकेत?

उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेंवर नाव न घेता टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना 370 प्रमाणेच आता सरकारनं राम मंदिराचा निर्णयही घ्यावा असं म्हटलं होतं.

त्यावर "गेल्या दोन तीन आठवड्यांपासून काही वाचाळवीर लोक राममंदिराविषयी काहीही बरळत आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टावर आपला विश्वास ठेवायला हवा," असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

16 जूनला उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आयोध्याचा दौरा केला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारनं याबाबत अध्यादेश काढावा अशी मागणी केली होती.

नरेंद्र मोदींनी नेमकीकाय टीका केली?

"नाशिकबरोबर प्रभू श्रीरामाचं नावंही जोडलं गेलेलं आहे. मला तुम्हाला आज अजून एक गोष्ट सांगायची आहे, की गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून काही वाचाळवीर, बडबड करणाऱ्या लोकांनी राममंदिर विषयावरून वाट्टेल ते बरळायला सुरुवात केली आहे. देशातल्या सर्व नागरिकांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखायला हवा.

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, यावर सुनावणी सुरू आहे, सर्वोच्च न्यायालय सातत्याने वेळ काढून बाबी ऐकून घेत आहे. मग मला कळत नाही, की हे वाचाळवीर लोक कुठून उगवले आहेत? या प्रकरणी ते खोडा का घालत आहेत? आपला सर्वोच्च न्यायालयावर विश्वास असला पाहिजे. आपला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर विश्वास असला पाहिजे. भारताच्या न्यायप्रक्रियेवर आपला विश्वास असला पाहिजे. यामुळेच मी आज नाशिकच्या पवित्र भूमीवर, मी या वाचाळवीरांना हात जोडून विनंती करतो, की देवासाठी, प्रभू श्रीरामासाठी तरी डोळे बंद करून भारताच्या न्यायप्रक्रियेवर विश्वास ठेवा."

उद्धव ठाकरे नेमके काय बोलले होते?

मुंबईतल्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, "राम मंदिरासाठी शिवसेना पहिल्या दिवसापासून आग्रही आहे. न्यायदेवतेला आमची विनंती आहे, की लवकरात लवकर जो काही निर्णय असेल तो द्यावा. पण त्या पलीकडे जाऊन सरकारकडून आमची अपेक्षा आहे, की जसं आपण ३७० कलम हा मुद्दा कोर्टात वाट न बघता आपल्या अधिकारात तो निर्णय घेतला आणि आपलं काश्मीर जे आपण नेहमी म्हणतो की आपल्या देशाचा, हिंदुस्थानचा अविभाज्य भूभाग होता, आहे आणि राहील त्याबद्दल धाडसाने केंद्र सरकारने जे पाऊल उचलले तसचं धाडसी पाऊल राम मंदिराच्या बाबतीत सुद्धा केंद्राने उचलावं अशी आमची अपेक्षा आहे आणि विनंती आहे."

16 जूनला त्यांनी अयोध्येचा दौरा केला होता तेव्हा सुद्धा त्यांनी अध्यादेश आणण्याची मागणी केली होती. त्यावेळ आम्ही त्यांना तुमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही का असा सवाल केला होता. त्यावेळी ते बोलले होते,

"सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. पण शेवटी लोकसभेमध्ये कायदा बनतो, अनेक गोष्टींवर लोकसभेनं निर्णय घेतलेले आहेत. शहाबानो असेल, ट्रिपल तलाक असेल अशा काही गोष्टी आहेत."

'नरेंद्र मोदींची टीका सूचक'

राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाष्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचेच कान टोचले आहेत का, या प्रश्नावर उत्तर देताना 'मिड डे'चे सिटी एडिटर संजीव शिवडेकर यांनी सांगितलं,

"राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा वारंवार आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पंतप्रधानांनी राम मंदिरासंबंधी केलेलं वक्तव्य हा निश्चितच सेनेला लगावलेला टोला होता. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांना 'छोटा भाऊ' म्हणून संबोधलं होतं. राममंदिराच्या प्रश्नावर न्यायालयावर विश्वास ठेवा, हे पंतप्रधानांनी केलेलं वक्तव्य म्हणजे मोठ्या भावानं धाकट्या भावाला दिलेला सबुरीचा सल्ला आहे असंच म्हणावं लागेल."

शिवसेना भाजपची युती अजूनही जाहीर झालेली नसताना पंतप्रधानांनी इतक्या स्पष्टपणे आपल्या सहकारी पक्षावर निशाणा साधणं सूचक आहे, असंही शिवडेकर यांनी म्हटलंय. 

Image copyright BBC/PraveenThakare

नाशिकमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी स्थिर सरकारला निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं. पंतप्रधानांच्या या विधानाचा दुसरा अर्थ भाजपला बहुमतानं निवडून द्या, असाही असू शकतो, याकडे शिवडेकर यांनी लक्ष वेधलं. 

"गेल्या निवडणुकीत भाजपला 122 जागा जिंकता आल्या होत्या. बहुमतासाठी त्यांना 23 जागा कमी पडल्या होत्या. शिवसेना सोबत आली असली तरी अनेकदा त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांचीच भूमिका बजावली. नाणारसारखा प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळे रखडला. त्यामुळे आपली धोरणं राबवण्यासाठी भाजपला बहुमताची गरज आहे. पंतप्रधान जेव्हा स्थिर सरकारचं आवाहन करतात त्यावेळी ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी," असं शिवडेकर यांनी सांगितलं. 

"नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराची पहिली वीट आम्हीच रचू असं विधान केलं होतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासंबंधी केलेलं वक्तव्य हे निश्चितपणे उद्धव ठाकरेंना दिलेलं प्रत्युत्तर आहे," असं मत दैनिक पुण्यनगरीच्या मुख्य संपादक राही भिडे यांनी व्यक्त केलं. 

"मुळात शिवसेना आणि भाजप युतीमध्ये सगळं काही आलबेल नाहीये. त्यांचं जागावाटप निश्चित झालेलं नाहीये. त्यावरून कुरबुरी सुरू आहेत आणि असे वाद सुरू असताना एकमेकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टोले लगावले जातात. याचाच अनुभव पंतप्रधानांच्या वक्तव्यातून आला. हा परस्परांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे. कदाचित युती होणार नाही याचाही हा संकेत आहे," असंही राही भिडे यांनी म्हटलं.

"भाजपचा इरादा हा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा आहे. तो वेळोवेळी व्यक्तही झाला आहे. त्यामुळे अशापद्धतीची आक्रमक भाषा हा दबावतंत्राचा भाग असू शकतो," असंही त्यांनी म्हटलं. 

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)