महाराष्ट्र विधानसभा 2019 : 'भाजपाबरोबर जाणं ही आमची ऐतिहासिक चूक'- जितेंद्र आव्हाड

पाहा व्हीडिओ -

राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रातील भाजप सरकारला पाठिंबा देणं ही आमची ऐतिहासिक चूक होती अशा स्पष्ट शब्दांमध्ये कबुली राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. बीबीसी मराठीने शुक्रवारी पुण्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्र-महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमातील मुलाखतीमध्ये आव्हाड यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

ज्या भाजप सरकारविरोधात आपण दररोज आरोप करता त्या पक्षाच्या सरकारला आपण पाठिंबा कसा दिला होता असे विचारल्यावर आव्हाड यांनी भाजप सरकारला पाठिंबा देण्यापूर्वी अलिबाग येथे झालेल्या बैठकीमध्ये पक्षाचे 35-40 नेते उपस्थित होते. तेव्हा मी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या शेजारी बसलो असूनही या निर्णयाला विरोध केला असे सांगितले. तसेच "जर आपण विचारधारेशी तडजोड केली तर संपून जाऊ", असं शरद पवारांना सांगितल्याचंही आव्हाड म्हणाले.

2014 साली महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला 122 जागांवर विजय मिळाला होता. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला 23 जागा कमी पडत होत्या. शिवसेनेने सुरूवातीच्या काळामध्ये भाजपला पाठिंबा देण्याऐवजी मित्रपक्षात बसण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा शरद पवार यांनी भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महिन्याभराच्या कालावधीनंतर शिवसेनेने सरकारला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते भाजपामध्ये जाण्याबद्दल विचारताच आव्हाड म्हणाले, "राष्ट्रवादीतून नेते गेले हे पवारांचं अपयश नाही तर EDचं यश आहे," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आणि शिवसेनेत होत असलेल्या मेगाभरतीबद्दल लगावला.

काँग्रेस-राष्ट्रवादीमधून मोठ्या संख्येने नेतेगळती झाली, याविषयी तुम्हाला काय वाटतं?

जे सत्तेसाठी आमच्याजवळ होते ते गेलेच, बरं झालं ते गेले ते. आता ते EDच्या भीतीनं गेले की आणखी कशाच्या, ते मला ठाऊक नाही. पण चाळणी झाली. चांगले ते मागे राहिले, हे बरंच झालं की नाही!

म्हणून तर पवार साहेबांनी कुणाला थांबवलं नाही. जाहीर सभेत त्यांनीही 'ज्यांना जायचंय, त्यांनी जा' असंच म्हटलं.

गडकरींबद्दल तुम्ही ट्वीट केलं होतं, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं होतं?

गडकरींच्या भाषणबाजीमध्ये मला मनुवादाचा गर्व जाणवला. अहो! यांच्या बापजाद्यांना अघोषित आरक्षण होतं, असं मी म्हटलं होतं. आणि मी आजही त्यावर ठाम आहे.

आपल्या देशापुढचे शत्रू कोण, असं तुम्हाला वाटतं?

आपल्याकडे जातीयवाद आहे, तो आपला फार मोठा शत्रू आहे. पण त्याहीपेक्षा मोठा शत्रू म्हणजे फॅसिझम. आज आपल्याला हवे तसे कपडे घालता येतात, हवं तसं राहता येतं. पण हेच लोक उद्या आपल्या कपडयांवर बंधनं आणतील. जे आपण काय खायला हवं हे सांगू शकतात, ते पुढे चालून आपण काय घालावं, हेही सांगतीलच.

त्याला आत्ताच कडाडून विरोध करायला हवा. मोदींना तर विरोधी पक्ष पण संपवायचाय. फॅसिझम असाच असतो.

राज ठाकरे यांनी विधानसभा लढवावी का? आघाडीविषयी तुम्ही काय सांगाल? राज ठाकरे सोबत आले तर तुम्हाला चालेल का?

अहो! पक्षाचे दोन नेते वर बसलेले आहेत. मी त्याबद्दल काय बोलू. पण माझं वैयक्तिक मत म्हणजे फॅसिझम ज्याचा शत्रू आहे, तो माझा मित्र आहे. मुघलांशी लढण्यासाठी शिवरायांनी अदिलशहालाही जवळ केलं होतं. पण म्हणून तो त्यांचा मित्र नव्हता. जो येईल तो आपल्याबरोबर हो.

आपली धोरणं, तत्त्व नेत्यांना समजावून द्यायला शरद पवार कमी पडले का?

शरद पवार खूप कामं करतात. पण वैयक्तिक हेव्यातून शत्रूला संपवायचं नाही, हे तत्त्व पवारांनी जोपासलं. पण त्यांचा दुर्गुण म्हणजे ते कमरेखाली वार करत नाहीत. त्यांनी असं राजकारण कधीच केलं नाही. आणि ते अजिबातच कुठेही कमी पडलेले नाहीत.

उरलेल्या नव्या तरुणांमधून ते पुढचे नेते घडवतील, असा विश्वास त्यांना स्वतःलाही वाटतो आहे.

Image copyright BBC/Rahul Ransubhe

तुम्ही असे नेहमी चिडलेले आव्हाड असता. शरद पवार तुम्हाला कधी ओरडतात का हो?

आता काय बोलायचं? राजकारणात माझ्याइतक्या शिव्या कुणीच देत नसेल. कधीकधी प्रश्न डोक्यात जातात आणि मग राग बाहेर निघतो. पण पवारसाहेब मला एकदाच ओरडले होते. मी एकदा IAS अधिकाऱ्याशी बोलताना आवाज चढवला होता, तेव्हा मात्र त्यांनी मला झापलं होतं. तो धडा मी कायम लक्षात ठेवलेला आहे.

पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय मुद्दे लावून धरतायत का?

अहो! यांची इतकी मोठी यात्रा झाली. पण काय अपेक्षा करायची त्यांच्याकडून. तरुणांमध्ये व्यवस्थेबद्दलची शंका, बंद पडलेले धंदे, मंदी... कांद्यांवर बोलणं अपेक्षित आहे ना.

सध्याच्या ट्रोल आर्मीविषयी काय सांगाल?

आज काहीही मत व्यक्त करायला गेलं की ही ट्रोल धाड पडतेच. शिवाय आजकाल नवी व्हॉट्सअॅपची संस्कृती जन्माला आलीये. मी तिला व्हॉट्सअॅपिया म्हणतो. आजच्या मुलांना त्यावरचं सगळंच खरं वाटतं. आता ते सगळं वाचून ही मुलं आधीचं सगळं केलेलं विसरतात. ते त्यांनी लक्षात घ्यायला हवंय.

भाषेच्या सक्तीचा विषय सध्या चर्चेत आहे. याविषयी तुम्ही काय सांगाल?

माझी माय मराठी मी मनापासून बोलतो. आपण सगळेच बोलतो खरं तर. पण ज्याला ज्या भाषेत बोलायचं आहे, त्याने बोलावं. हिंदी असो इंग्रजी असो किंवा आणखी कोणतीही भाषा असो. असं एक भाषा, एक राष्ट्र असं करत करत आपण लोकांच्या मुळावर येणार आहोत. मग संपलोच आपण. मला आवडते तीच भाषा मी बोलणार आणि ते स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळायला हवं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)