नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंची राम मंदिरावरील भाषा बदलली का?

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी Image copyright facebook

सरकारनं कलम 370 प्रमाणेच राम मंदिरासाठी धाडसी पाऊल उचलावं, असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी 4 दिवसांनी या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतली. राम मंदिराचा निकाल लवकरात लवकर लागेल, असा पंतप्रधानांना विश्वास असेल, तर त्यासाठी वाट पाहणं रास्त आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राम मंदिराबाबत उद्धव ठाकरेंची भाषा बदललीय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चार दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं, "सरकारकडून आमची अपेक्षा आहे, की जसं आपण 370 कलम हा मुद्दा कोर्टात वाट न बघता आपल्या अधिकारात तो निर्णय घेतला, तसंच धाडसी पाऊल राम मंदिराच्या बाबतीत केंद्रान उचलावं."

यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 19 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर नाव न घेता टीका केली.

ते म्हणाले, "गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून काही वाचाळवीर, बडबड करणाऱ्या लोकांनी राममंदिर विषयावरून वाट्टेल ते बरळायला सुरुवात केली आहे. देशातल्या सर्व नागरिकांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखायला हवा. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, यावर सुनावणी सुरू आहे, सर्वोच्च न्यायालय सातत्याने वेळ काढून बाबी ऐकून घेत आहे. मग मला कळत नाही, की हे वाचाळवीर लोक कुठून उगवले आहेत? या प्रकरणी ते खोडा का घालत आहेत? आपला सर्वोच्च न्यायालयावर विश्वास असला पाहिजे."

पंतप्रधानांच्या वक्तव्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 20 सप्टेंबरला मुंबईतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, "राम मंदिरावर मी तमाम हिंदू बांधवांची भावना बोलून दाखवत आहे. कोर्टावरती आमचा विश्वास आहे, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. पण, हा खटला खूप वर्षं चालला आहे, त्याकरताच मी गेल्या वर्षी अयोध्येला गेलो होतो आणि मी अशी मागणी केली, कोर्टानं हा प्रश्न सुटत नसेल, तर सरकारनं धाडस करावं आणि निर्णय घ्यावा. परंतु, लवकरात लवकर या केसचा निकाल लागेल, असा पंतप्रधानांचा विश्वास असेल, त्याकरता थांबण्याची विनंती पंतप्रधानांनी केली असेल, तर ती रास्त आहे."

शिवसेना बॅकफूटवर?

शिवसेनेनी ही नरमाईची भूमिका घेतली आहे की त्यांना पंतप्रधानांचा मुद्दा पटला आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

पंतप्रधानांच्या वक्तव्यामुळे शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांचं मत आहे.

त्या सांगतात, "विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे भाजपकडून सेनेवर दबाव आणला जात आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपमध्ये चालले आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले आहेत. याशिवाय 145 किंवा त्याहून अधिक जागा मिळतील, असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेची गरज पडणार नाही, असं भाजपला वाटत आहे. हे सर्व बघितल्यास पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे बॅकफूटवर गेले आहेत."

Image copyright Getty Images

तर ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांच्या मते, "2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीची समीकरणं बदलली आहेत. त्यापूर्वी भाजप लहान भाऊ, तर शिवसेना मोठा भाऊ होता. पण, गेल्या 5 वर्षांत भाजपनं शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिलं नाही, महत्त्वाची खाती दिली नाही. आज अशी परिस्थिती आहे की, शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत नाही. कारण, मोदी पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत आणि त्यांच्या सत्तेत येण्यानं प्रादेशिक पक्षांची जी वाताहत झाली आहे, ती ते पाहत आहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेला सोबत घेईल, पण समानतेनं वागवेलच असं नाही."

'उद्धव ठाकरेंनी स्वत:ला करेक्ट केलंय'

राम मंदिराच्या मुद्द्यावर वाट पाहण्याची भूमिका घेऊन उद्धव ठाकरे स्वत:ला योग्य रीतीनं करेक्ट केलं आहे, असं मत राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांनी मांडलं.

त्या म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीस यांना राज्यात मिळणारा प्रतिसाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात तयार केलेलं वातावरण यामुळे भाजपचं ऐकण्याशिवाय पर्याय नाही, हे शिवसेनेला कळालं आहे. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्यावर वाट पाहण्याची भूमिका घेऊन उद्धव ठाकरे स्वत:ला योग्य रीतीनं करेक्ट केलं आहे."

Image copyright TWITTER
प्रतिमा मथळा 25 नोव्हेंबर 2018ला उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा केला होता.

राम मंदिराचं श्रेय घेण्यासाठी शिवसेनेता खटाटोप सुरू आहे, असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना वाटतं.

त्यांनी सांगितलं, "लवकरच राम मंदिराचा निकाल लागणार आहे. त्यामुळे याचं श्रेय घेण्यासाठी शिवसेना वारंवार हा मुद्दा चर्चेत आणत आहे. हा मुद्दा उपस्थित करून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. राम मंदिराचा मुद्दा म्हणजे शिवसेनेचं दबावाचं राजकारण आहे."

हाच मुद्दे पुढे नेत नानिवडेकर सांगतात, "आतापर्यंत दबावाचं राजकारण करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आरे प्रकल्प असेल, किंवा राम मंदिर असे वेगवेगळे मुद्दे पुढे करून ते भाजपला अडचणीत आणायचा प्रयत्न करत आहेत. या आडून त्यांना जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या आहेत. पण, या जागा घेताना खळखळ दाखवायचा त्यांचा प्रयत्न आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)