विधानसभा निवडणूक 2019: महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल

भुजबळ Image copyright Ganesh Pol

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

उमेदवारांना 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. दोन्ही राज्यांचा 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. हरियाणामधील 90 आणि महाराष्ट्रातील 288 जागांसाठी मतदान होणार आहे. त्याबरोबरच देशात 65 ठिकाणी पोटनिवडणुका होणार असल्याचंही निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

महाराष्ट्रात 1.8 लाख मतदान यंत्रे आहेत. निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन विशेष निरीक्षकांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले.

नोव्हेंबर 2019 मध्ये विधानसभेची मुदत संपणार आहे. गेल्या वेळी 18 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती.

विधानसभेसाठी एकूण किती जागा आहेत?

2014 साली राज्यात 8 कोटी 25 लाख मतदार होते. 15 ऑक्टोबर 2014 रोजी एकाच टप्प्यात राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या होत्या.

चारच दिवसानंतर म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक म्हणजेच 122 जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या.

Image copyright Getty Images

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.

लोकसभा 2019 साठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणुका लढवल्या पण निवडणुकीनंतर त्यांनी एकत्रपणे सरकार स्थापन केलं.

विधानसभेसाठीची राजकीय समीकरणं

विधानसभा निवडणुकीत प्रमुख लढत ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना युती अशी असेल असं सध्यातरी दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समान जागावाटपावर एकमत झालं आहे. एमआयएम पक्षानं वंचित बहुजन आघाडीची साथ सोडून स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपविरुद्ध प्रचार करणारे राज विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत जाणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. याबद्दल राज किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीनं उघडपणे कोणतंही भाष्य केलं नसलं, तरी या राजकीय समीकरणाकडे विधानसभेच्या वेळेस सर्वांचच लक्ष असेल.

या पक्षांव्यतिरिक्त बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष यांचीही भूमिका महत्त्वाची राहील.

भुजबळांना शंका

"मतदान जर 21 ऑक्टोबरला होतंय, तर मतमोजणी 22 ला घ्या ना, 23 ला घ्या नाहीतर. 24 ऑक्टोबरला कशाला?" असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

"आता मतदान जर EVMनेच घेता म्हटलं तर मतमोजणीला एवढा वेळ नको ना लागायला. आजकाल तर एक बटण दाबलं की सरळ मोजणीला सुरुवात होते नि लवकरच कळतं. अगदी मतदान संपल्या संपल्या त्याच संध्याकाळी मतमोजणी केली जाऊ शकते. आम्ही जरी मानलं की त्याच दिवशी नाही करायची, तर दुसऱ्या दिवशी करा. मध्ये दोन दिवस असतील तर मग लोक आम्हाला विचारतात, शंका उपस्थित करतात की यांना पुन्हा EVMचा घोटाळा तर नाही ना करायचा," असं ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

EVM शी छेडछाड करून भाजप निवडणुका जिंकतं, असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीही वेळोवेळी केले आहेत. "शंका आहे म्हणूनच पक्षाने याबाबत जाहीर भूमिका घेतली आहे," असंही भुजबळ यावेळी म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)