शरद पवार : गुलाल उधळायला मला साताऱ्यात बोलवा - #5मोठ्याबातम्या

शरद पवार Image copyright FACEBOOK

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. गुलाल उधळायला मला साताऱ्यात बोलवा - शरद पवार

सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसह लोकसभाही जिंकायची आहे. आता साताऱ्यात गुलाल उधळायलाच मला बोलवा, असं आवाहन कार्यकर्त्यांना करत उदयनराजेंना पराभूत करण्याचा प्रत्यक्ष इशारा शरद पवार यांनी दिला.

साताऱ्यामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यानंतर ते कार्यकर्त्यांशी ते बोलत होते. "छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा इतिहास निर्माण केला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज आग्र्याला गेले. पण औरंगजेबांच्या दरबारात महाराजांचा उचित सन्मान केला गेला नाही. महाराज तिथून परत आले. त्यामुळे त्यांना आग्र्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. मात्र महाराजांनी परत येऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आता...?" असा टोला शरद पवार यांनी उदयनराजे यांना लगावला.

गरज पडली तर सोळा नाही अठरा तास काम करेन, पण हा महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊ देणार नाही, असंही शरद पवार यावेळेस म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

2. घोषणाबाजी केलीत तर तिकीटच देणार नाही

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर मेळाव्यात इच्छुक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन केलं. आपल्याच नेत्याला तिकीट मिळावं यासाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. त्यामुळे संतापलेल्या अजित पवार यांनी, "आता जर कोणी घोषणाबाजी केली तर तिकीटच देणार नाही", अशी ताकिद दिली. त्यानंतरच कार्यकर्ते शांत झाले.

Image copyright Getty Images

"ज्यांना जायचंय त्यांना जाऊद्या. पण आपले सरकार आल्यावर त्यांना आपल्याकडे घ्या असं तुम्ही म्हणू नका. मी तर कुणाला परत पक्षात घेणार नाही. पण तुम्ही येऊन सांगू नका, दादा घ्या हो पदरात पाडून. अरे आपला पदर फाटला, पदरात पाडून घेता-घेत", असे म्हणत अजित पवारांनी पक्षांतर करणाऱ्यांवर टीका केली. हे वृत्त एबीपी माझानं प्रसिद्ध केलं आहे.

3. राहुल आवारेला कांस्यपदक

जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये राहुल आवारेनं कांस्यपदक पटकावलं आहे. राहुलने टायलर ली ग्राफला 61 किलो वजनी गटात 11-4 असं पराभूत केलं. या स्पर्धेत भारताला एकूण पाच पदकं मिळाली आहेत.

या पदकविजेत्यांमध्ये बजरंग पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट यांचा समावेश आहे.

यापूर्वी राहुलने 2018 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. हे वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं आहे.

4. सौदी अरेबियाच्या राजकुमारांनी इम्रान खान यांना दिलं प्रायव्हेट जेट

व्यावसायिक विमानातून अमेरिकेला जाणाऱ्या इम्रान खान यांना सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी स्वतःचं खासगी जेट दिलं आहे.

या जेटमधून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरेशी, अर्थसल्लागार अब्दुल हाफिज शेख, स्पेशल असिस्टंट ऑन ओवरसिज पाकिस्तानीज झुल्फिकार अब्बास बुखारीही होते.

सौदी अरेबियामध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये इम्रान खान यांनी राजे सलमान बिन अब्दुलअजिज आणि इतर नेत्यांचीही भेट घेतली. 27 सप्टेंबर रोजी ते संयुक्त राष्ट्राच्या 74 व्या आमसभेत भाषण करणार आहेत. या भाषणात इम्रान खान काश्मीर प्रश्नाचा उल्लेख करतील असा कयास बांधला जात आहे.

आज 23 सप्टेंबर रोजी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांचीही भेट घेणार आहेत. ही बातमी द हिंदूने प्रसिद्ध केली आहे.

5. 26 सप्टेंबरपासून सलग पाच दिवस बँका बंद

26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत देशभरातील बँका बंद राहाणार असून, थेट 30 सप्टेंबरला बँका उघडणार आहेत. तसंच अर्धवार्षिक कामांची पूर्तता करण्यासाठी कोणतेही व्यवहार होणार नसल्यामुळे थेट 1 ऑक्टोबरला बँकाच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे.

बँकांच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय संपाची घोषणा केली असल्यामुळे 26 आणि 27 सप्टेंबरला बॅंका बंद राहाणार आहेत. तसंच 28 आणि 29 सप्टेंबर रोजी अनुक्रमे शनिवार आणि रविवार असल्याने बॅंका राहाणार आहेत.

बँका सलग पाच दिवस असल्यामुळे एटीएमवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच धनादेश वटण्यालाही विलंब लागण्याची शक्यता आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)