नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रंप यांचा प्रचार केल्याचा काँग्रेसचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रंप, भारत, अमेरिका, निवडणुका Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप

रविवारी अमेरिकेतील ह्यूस्टन येथील हाऊडी मोदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा प्रचार केल्याची टीका काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री आनंद शर्मा यांनी केली आहे.

भारताच्या परराष्ट्र धोरणाचं हे उल्लंघन असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी केली आहे.

अमेरिकेच्या निवडणुकांसाठी स्टार प्रचारक म्हणून आपली भूमिका नको असं शर्मा यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेत 2020 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत.

हाऊडी मोदी कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप सहभागी झाले होते. ट्रंप यांनी आपल्या भाषणादरम्यान अमेरिकेच्या राबवलेल्या योजनांची माहिती दिली. तसंच भारतीय अमेरिकन समुदायाशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न केला.

मोदींनी काय म्हटलं?

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं स्वागत केलं. मोदींनी ट्रंप यांचं कौतुक केलं. ट्रंप भारताचे खरे मित्र असल्याचंही मोदी यांनी सांगितलं.

मोदी पुढे म्हणाले, "ट्रंप यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांना नवा आयाम मिळाला आहे. अमेरिकास्थित भारतीय नागरिक आणि ट्रंप यांच्यात चांगले ऋणानुबंध प्रस्थापित झाले आहेत."

अबकी बार ट्रंप सरकार असंही मोदी यांनी म्हटलं.

Image copyright ANI
प्रतिमा मथळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप

2016 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या आधी डोनाल्ड ट्रंप यांनी एक व्हीडिओ जारी केला होता. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या व्हीडिओच्या शेवटी त्यांनी 'अबकी बार ट्रंप सरकार' असं म्हटलं होतं.

भारतात 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांवेळी भाजपने 'अबकी बार मोदी सरकार'ची घोषणा दिली होती. भाजपने त्या निवडणुका बहुमतासह जिंकल्या.

हाऊडी मोदी कार्यक्रमात मोदी यांनी ट्रंप यांच्यासाठी प्रचार केला अशी टीका आनंद शर्मा यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पंतप्रधान नरेंद्र मोदी

"अन्य देशांच्या अंतर्गत निवडणुकीत सहभागी न होण्याच्या परराष्ट्र धोरणाची तुम्ही पायमल्ली केली आहे. हे भारताच्या दूरगामी हिताचं नाही.

अमेरिकेशी मग ते रिपब्लिकन असो किंवा डेमोक्रॅट्स यांच्याशी चांगले संबंध राहिले आहेत. जाहीरपणे ट्रंप यांचा प्रचार करणं लोकशाही मूल्यांना तिलांजली देण्यासारखं आहे."

"तुम्ही तिथे भारताचे पंतप्रधान म्हणून गेला आहात, अमेरिकेतील निवडणुकांचे स्टार प्रचारक म्हणून नाही हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)