अजित पवार यांचा राजीनामा आणि 7 अनुत्तरित प्रश्न

शुक्रवारी (27 सप्टेंबर) शरद पवारांच्या ईडीमध्ये हजेरी लावण्यावरुन नाट्य रंगलं असतानाच अचानकपणे अजित पवारांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली.

एकीकडे शरद पवार यांच्या ईडीबाबतच्या घडामोडी सुरू असतानाच अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. कोणालाही न सांगता राजीनामा दिल्यानंतर अजित पवार अनरिचेबल होते.

शनिवारी दुपारी ते शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले. इथे पवार कुटुंबीयांची एक बैठक झाली आणि त्यानंतर अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं पत्रकार परिषद घेतली. सहकारी बँक प्रकरणी शरद पवारांवर माझ्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानं व्यथित होत मी राजीनामा दिल्याचं अजित पवार यांनी भावूक होऊन सांगितलं.

अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्यामागची कारणं स्पष्ट केल्यानंतरही काही प्रश्न हे अनुत्तरितच राहिले आहेत.

1. राजीनाम्याबद्दल कोणाला का सांगितलं नाही?

व्यथित होऊन राजीनामा दिला असं अजित पवारांनी सांगितलं. पण मग त्यांनी या राजीनाम्याबद्दल कोणाला का सांगितलं नाही?

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. "धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यापैकी कोणालाही मी माझ्या राजीनाम्याबद्दल सांगितलं असतं तर त्यांनी भावूक होऊन मला अडवलं असतं. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडेंनाही मी तीन दिवसांपूर्वी एवढंच सांगितलं होतं, की मी एकजणांना घेऊन तुमच्याकडे येत आहे. मी राजीनामा देण्यासाठी गेल्यावर त्यांनी विचारलं, की तुम्ही कोणाला घेऊन येणार होता? त्यावेळी मी माझ्या राजीनाम्याबद्दल त्यांना सांगितलं," असं अजित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

Image copyright Getty Images

इतर कोणाला सांगितल्यावर त्यांनी अडवलं असतं, हा अजित पवारांचा युक्तिवाद जरी मान्य केला तरी लगेचच पुढचा प्रश्न उपस्थित होतो.

2. काकांसाठी राजीनामा दिला तर त्यांना का नाही सांगितलं?

ज्या शरद पवारांसाठी व्यथित होऊन अजित पवारांनी राजीनामा दिला, त्यांनाही अजित पवारांनी विश्वासात का घेतलं नाही? ज्या दिवशी शरद पवार ईडीसमोर उपस्थित होणार का यावरून वातावरण तापलं होतं, नेमका तेव्हाच अजित पवारांनी राजीनामा का दिला?

अजित पवारांच्या राजीनाम्यासंदर्भात शरद पवार यांनी शुक्रवारी (27 सप्टेंबर) रात्री पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांच्या राजीनाम्याची आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती, असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आपलं अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्याशी बोलणं झालं असल्याचं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

माझं नाव शिखर बॅंक घोटाळा प्रकरणात आल्यामुळे अजित पवार हे अस्वस्थ होते त्यातूनच त्यांनी राजीनामा दिला, असं पार्थ यांनी आपल्याला सांगितल्याचं शरद पवारांनी म्हटलं. पण राजकारणाची पातळी घसरली आहे. त्यापेक्षा आपण उद्योग किंवा शेती करू, असं अजित पवारांनी पार्थ पवारांना म्हटल्याचंही शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

3. नेमकं हेच टायमिंग कसं?

शरद पवारांनाही कल्पना न देता अजित पवारांनी दिलेल्या राजीनाम्याबद्दल बोलताना राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांनी म्हटलं, की अजित पवारांचा हा निर्णय अनाकलनीय आहे. "त्यांची नेमकी नाराजी काय आहे हे आपल्याला माहीत नाही. त्यांनी ती स्पष्ट केली नाही. राजीनामा देण्याची वेळ अजित पवारांनी चुकीची निवडली," असं आसबेंनी म्हटलं.

लोक पक्षाबाबत तसंच पवार कुटुंबीयांबद्दल काय विचार करतायच याचा कोणताही विचार न करता त्यांनी राजीनामा दिला आहे, असं मत प्रताप आसबे यांनी व्यक्त केलं.  ते सांगतात, "या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचलं जाण्याची शक्यता आहे. पण शरद पवार परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहेत. ते कधीच डगमगत नाहीत. शरद पवार त्यांची भूमिका योग्य प्रकारे निभावतील."

Image copyright Getty Images

4. आता आमदारकीचा राजीनामा देऊन उपयोग काय?

अजित पवार यांनी राजीनामा दिला असला, तरी निवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन उपयोग काय, या प्रश्नाचं उत्तर अजित पवार यांनी दिलं नाही.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांच्या तडकाफडकी राजीनाम्यावर टीका करताना म्हटलं, की अजित पवारांनी निराश होऊन राजीनामा दिला आहे. आचारसंहिता लागल्यानंतर राजीनाम्याला अर्थ काय, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

आचारसंहिता लागल्यानंतर राजीनाम्याला काय अर्थ आहे? त्यांना सत्तेची सवय होती. आता त्यांना रोज भीती वाटते की कोण पक्ष सोडतंय. यातून हताशा आणि निराशा येते. त्याशिवाय दुसरं काही कारण असेल असं मला वाटत नाही," असं मुनगंटीवार यांनी म्हटलं.

ही कारवाई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि ईडीकडून केली जात आहे. सरकारचा काही संबंध नसताना पवार या सगळ्याला सुडाची कारवाई का म्हणत आहे, असा प्रश्नही मुनगंटीवार यांनी विचारला.

5. जागा वाटपावरून मनात खदखद तर नाही?

मुनगंटीवारांनी उपस्थित केलेले प्रश्न तसंच अजित पवारांच्या राजीनाम्याचं टाइमिंग पाहता, ही त्यांची नाराजी होती का? जागावाटप आणि उमेदवारीवरुन अजित पवारांच्या मनात काही खदखद आहे का? हे मुद्देही उपस्थित केले जात आहेत.

Image copyright Ani

अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील त्यांची नाराजी प्रकर्षाने दिसून आली, असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडेंनी व्यक्त केलं आहे. "कालचा दिवस राजीनाम्यासाठी योग्य नव्हता. मुळात राजीनामा पक्षातील कोणत्याही नेत्यांशी चर्चा न करता देण्यात आला. विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. अशा वेळी राजीनामा देण्याला तसा काही अर्थ नाही. असा राजीनामा म्हणजे निषेध सिद्ध करण्याचा एक प्रयत्न असतो," असं देशपांडे यांनी म्हटलं.

"माझ्यामागे ईडीची चौकशी लागल्याने अजित पवारांनी राजीनामा दिल्याचं शरद पवारांनी सांगितलं. पण तसं काहीच दिसून आलं नाही. तसं असतं तर त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिला असता. कालच्या महत्त्वाच्या क्षणी ते शरद पवारांच्या सोबत दिसले असते आणि कालचा दिवस राजीनाम्यासाठी निवडला नसता," असं देशपांडे सांगतात.

अजित पवारांनी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांच्या राजीनाम्यांच्या कारणांबद्दल बोलताना अभय देशपांडेंनी म्हटलं होतं, की सध्या विधानसभेची निवडणुकीची उमेदवारी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासंबंधी त्यांची एखादी नाराजी असू शकते. तसंच त्यांचे शरद पवार यांच्यासोबत मतभेद असू शकतात. त्यांचा मुलगा पार्थ पवार याला विधानसभेची उमेदवारी मिळण्यावरून काही मतभेद असण्याची शक्यता आहे. तसंच आपल्यावरच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी तात्पुरते राजकारणातून बाजूला राहणे असाही त्यांचा प्रयत्न दिसून येतो.

6. यामागे कौटुंबिक कलह किंवा पक्षांतर्गत नाराजी तर नाही?

अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे पवार कुटुंबियांमधील धुसफूस बाहेर आली का, असाही एक सूर ऐकू येत होता.

अजितदादांच्या राजीनाम्यानंतर पवार कुटुंबीयांमध्ये संघर्ष आहे, असा प्रश्न विचारला जाईल याची कदाचित शरद पवारांनाही कल्पना असावी. म्हणूनच त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आमचं कुटुंब एकत्र आहे आणि आजही आमच्या घरात कुटुंबप्रमुखांचा शब्द अंतिम असतो, असं स्पष्ट करून सांगितलं होतं.

Image copyright Getty Images

शरद पवारांच्या याच विधानाची री अजित पवार यांनीही आपल्या पत्रकार परिषदेत ओढली. "मी राजकारणात आलो, तेव्हा आमच्या घरात मतभेद आहेत असं चित्रं रंगवलं गेलं. त्यानंतर सुप्रिया राजकारणात आली तेव्हाही पवारांच्या घरात कलह असं म्हटलं गेलं. पार्थ लोकसभा निवडणूक लढवणार हे ठरल्यावरही अशाच स्वरुपाच्या बातम्या आल्या. कृपा करून आमच्या घरात कोणतेही मतभेद नाहीत, हे लक्षात घ्या," असं अजित पवारांनी म्हटलं.

पवारांच्या घरात कोणतेही मतभेद नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं असलं तरी यापूर्वीही 2009 साली अजित पवारांनी असेच तडकाफडकी अनरिचेबल झाले होते. त्यावेळी त्यांची नेमकी नाराजी काय होती? तो कौटुंबिक कलह होता की पक्षांतर्गत नाराजी?

Image copyright Twitter

7. ते नेहमी-नेहमी अनरिचेबल का होतात?

काल अजित पवार बराच वेळ अनरिचेबल होते. 2009मध्येही ते अनरिचेबल झाले होते. अजित पवारांच्या त्यावेळेच्या नाराजीबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी म्हटलं, की राष्ट्रवादी काँग्रेस साधारणतः मराठा समाजाचा पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षानं सातत्यानं त्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे 2009 साली अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदावरचा दावा डावलून ते छगन भुजबळांना दिलं गेलं. कारण ओबीसी मतांसाठी ते आवश्यक होतं. शरद पवारांना 'बेरजेचं राजकारण' करायला आवडतं. त्यामुळे मराठा मतांना ओबीसी जोड असा तो प्रयत्न होता. त्यापूर्वीही 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा निवडून येऊनही अजित पवारांना मुख्यमंत्रिपद मिळालं नव्हतं. ते शल्यही अजित दादांच्या मनात असावं.

गेल्या दोन दिवसांमधील अजित पवारांच्या नाराजीबद्दल बोलताना नानिवडेकर यांनी म्हटलं, की अजित पवारांवर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, तेव्हा पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. मात्र शरद पवारांवर जेव्हा ईडीने ठपका ठेवला तेव्हा त्यांच्यासाठी पक्ष एकत्र आला. त्यांच्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे दादांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला असेल, की माझ्या अडचणीत, आरोपांमध्ये पक्ष माझ्याबरोबर राहिल का? त्यामुळेच अजित पवारांनी माझ्यासोबत उभं राहा, हे सांगण्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र उगारलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)