देवेंद्र फडणवीसांना आव्हान देण्यासाठी आशिष देशमुख किती सज्ज?

व

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरच्या दक्षिण - पश्चिम विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी काँग्रेसनं डॉ. आशिष देशमुखांना उमेदवारी दिली आहे.

डॉ. आशिष देशमुखांनी गेल्या वर्षीच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण-पश्चिममधून आपल्या माजी सहकारी आमदारांचं आव्हान असेल.

डॉ. आशिष देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे चिरंजीव आहेत. देशमुख हे विदर्भ राज्याचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. गेली पाच वर्ष त्यांनी भाजपात असतानाही प्रत्येक अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा लावून धरला होता.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात देशमुख यांच्याकडून वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढली जाणार असल्याचं सांगण्यात येतं.

देशमुख यांनी या निवडणुकीत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा लावून धरला तर ते मुख्यमंत्र्यांना अडचणीचे ठरू शकते. देशमुखांना निवडणूक मैदानात उतरवून फडणवीस यांना त्यांच्याच मतदारसंघात अडकवून ठेवण्याची काँग्रेसची रणनीती आहे.

आशिष देशमुखांची राजकीय कारकीर्द

आशिष देशमुख यांनी 2009 साली भाजपच्या तिकिटावर नागपुरच्या सावनेर मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविली होती. पण त्यात त्यांना अपयश आलं होतं. नंतर देशमुख यांनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलन सुरु केले.

देवेंद्र फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी आशिष देशमुख

भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही आशिष देशमुख यांच्या आंदोलनात भाग घेतला. पुढे 2014 साली आशिष देशमुख यांना सावनेरऐवजी नागपूर जिल्ह्यातील काटोलमधून भाजपने उमेदवारी दिली आणि ते निवडून आले.

Image copyright Facebook

पण मुख्यमंत्र्यांवर वेळोवेळी टीका करत आशिष देशमुख यांनी भाजपची नाराजी ओढवून घेतली. नंतर भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा आणि अरुण शौरी यांचे राज्यात कार्यक्रम आयोजित करून आशिष देशमुख यांनी भाजपसाठी अडचण केली.

आमदारकीची साडेचार वर्षे झाल्यावर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये परत आले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मागील दोन विधानसभांमध्ये प्रफुल्ल गुडदे-पाटील यांनी निवडणूक लढविली होती. पण या वेळेस पक्षाने आशिष देशमुख यांना मैदानात उतरविले.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर नागपूर मेट्रो, एम्स हॉस्पिटल, आयआयएम, ट्रीपल आयटी असे अनेक प्रकल्प नागपूरमध्ये आणले. त्यामुळे विकासाच्या मुद्दयांवरच मुख्यमंत्री निवडणूक लढवत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.

दुसरीकडे आशिष देशमुख हे देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रातील लपवून ठेवलेली माहिती आणि यावेळेच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील अडचणी शोधून त्यांना आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात नोटरीचा जुन्या तारखेचा स्टॅम्प असल्यावरून वादही देशमुख यांनी निर्माण केला आहे. मुख्यमंत्री यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा अर्ज रद्द करण्यात यावा अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.

Image copyright Getty Images

दरम्यान, भाजपने काँग्रेसच्या आरोपांवर पलटवार केला आहे. शिखंडीसारखे मागून वार करण्यापेक्षा मर्दासारखे समोरून वार करावे, अशी टीका मुख्यमंत्र्यांचे प्रचार प्रतिनिधी संदीप जोशी यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसकडे काहीही विषय नाही. त्यांची अनामत जप्त होणार आहे, त्यामुळं अशा प्रकारचे आरोप करत आहेत. आमच्याकडून काहीही चूक झालेली नाही. तारखेची चूक ही नोटरीकडून झाली आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यासंदर्भात निकाल देतील, असंही जोशी यांनी म्हटलं.

'आशिष देशमुखांची उमेदवारी सरप्राईज नाही'

दक्षिण पश्चिम मतदार संघातून मुख्यमंत्री पन्नास हजार मतांनी विजयी होतील, असा अंदाज नागपुरमधील राजकीय निरीक्षक अतुल पेटकर यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरच्या दक्षिण पश्चिम मतदार संघातील संपर्क कायम ठेवला आहे. त्यामुळे सध्याच्या चित्रानुसार फडणवीस विजयी होणार असं दिसत असल्याचं पेटकर यांनी म्हटलं.

"काँग्रेसने मुख्यमंत्री लढणार असलेल्या मतदार संघात सरप्राईज उमेदवार देणार असं जाहीर केलं होतं. पण त्यांचे सरप्राईज हे आशिष देशमुख यांच्या उमेदवारीमुळे काही टिकले नाही. मुळात आशिष देशमुख चमकोगिरी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांविरोधात उभे आहेत. आमदार असताना त्यांचा त्यांना फोकस नव्हता. या ना त्या कारणाने प्रसिद्धीत राहणे आशिष देशमुख यांना आवडते," असं विश्लेषण पेटकर यांनी केलं आहे.

मुळात दक्षिण पश्चिम मतदार संघात कुणबी, तेली समाजाचे प्राबल्य आहे. पण असं असली तरी या मतदार संघात जात फॅक्टर चालणार नाही. शिवाय ब्राम्हण समाजाचे प्राबल्य असणाऱ्या स्वावलंबी नगर, जयप्रकाश नगर, खामला आणि जयताळा हा पट्टा भाजपचा पारंपरिक मतदार आहे. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्र्यांनी मतदार संघात अनेक कार्यक्रम घेतल्याने लोकांसोबत त्यांचा संपर्क कायम राहिला आहे . काँग्रेसचे आधीचे उमेदवार प्रफुल्ल गुडढे यांनी लढण्यास नकार दिला. यावरूनच मतदार संघातील मुख्यमंत्र्यांची स्थिती स्पष्ट होत असल्याचं पेटकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम जागेसंदर्भात सध्या तरी एकेरीच लढत असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. "आशिष देशमुख यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली असली तरी ते मुख्यमंत्र्यांना किती टक्कर देऊ शकतात हे सर्वश्रुत आहे," असं बाळ कुलकर्णी यांनी म्हटलं.

लढाई मुख्यमंत्र्यांविरुद्ध

2014 च्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता. भाजप स्वबळावर लढत असतानाही मोदी लाटेमुळे त्यांना भरघोस यश मिळालं होतं.

त्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना 1 लाख 13 हजार 918 मतं मिळाली. तर दुसऱ्या स्थानी राहिलेल्या काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडदे-पाटील यांना 54 हजार 976 मतं मिळाली. त्यावेळी फडणवीस यांना मिळालेलं मताधिक्य तब्बल 58 हजार 942 इतकं भरघोस होतं.

त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची ताकद नक्कीच वाढली आहे. त्यामुळे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरुद्धच्या लढाईत खरी कसोटी ही आशिष देशमुख यांचीच असणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)