दसरा मेळावा: शिवसेना राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे Image copyright ANI

विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी मी निघालो आहे. एका महिन्यात दोन विजयादशमी, एक आजची आणि दुसरी 24 तारखेची तसंच लगेच दिवाळी असा योग क्वचित येतो, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

'शिवतीर्था'वर सुरू असलेल्या सेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना उद्धव यांनी युतीमधील तडजोड, राम मंदिर, शिवसेनेची धोरणं यावर भाष्य केलं तसंच विरोधकांवर टीका केली.

दादर येथील शिवाजी पार्कवर पार पडणारा 'दसरा मेळावा' हा शिवसैनिकांसाठी नेहमीच खास असतो. शिवसेना स्थापन केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळावा घेण्याचा पायंडा पाडला होता.

राम मंदिर प्रकरणी न्यायालयानं न्याय दिला तर ठीक आहे, नाहीतर मंदिरासाठी विशेष कायदा करा, ही शिवसेनेची मागणी कायम आहे. आम्हाला राजकारणासाठी राम मंदिर नको आहे. ती देशाची आणि हिंदुंची मागणी आहे. प्राण जाए पर वचन ना जाए, हीच शिवसेनेची नीती आहे. आम्ही वचन दिलंय आणि ते पाळणारच, असं उद्धव यांनी म्हटलं.

उद्धव यांनी म्हटलं, "युती केल्यावर अनेकांना वाटलं, की शिवसेना झुकली. आम्ही केवळ भाजपची अडचण समजून घेतली. आता तुम्ही महाराष्ट्राची अडचण समजून घ्या, असं मी भाजपला म्हणतो."

Image copyright Getty Images

देशात अस्थिर सरकार येऊ नये यासाठी लोकसभेला युती केली. लपून-छपून शिवसेना काही करणार नाही. आम्ही वैरही उघड करू आणि प्रेमही उघड करू. म्हणूनच आम्ही युती केली, असं उद्धव यांनी म्हटलं.

युतीबद्दल बोलताना पुढे त्यांनी म्हटलं, "आम्ही हिंदुत्वासाठी भाजपशी युती केली. भाजपला पाठिंबा नाही द्यायचा, तर काय कलम 370 ला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसला द्यायचा?"

काँग्रेस-राष्ट्रवादी आता थकली आहे, या सुशीलकुमार शिंदेंच्या विधानावर उद्धव यांनी भाष्य केलं. काय करून थकलात, असा प्रश्न विचारून उद्धव यांनी म्हटलं, की काँग्रेस-राष्ट्रवादीनं एकत्र यायला हवं असं सुशीलकुमार यांनी म्हटलं. पण एकत्र येण्याआधी त्यांनी आपला नेता कोण हे ठरवावं.

अजित पवारांना टोला

अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. मगरीचे अश्रू ऐकले होते, ते प्रत्यक्ष पाहिलेही, असा टोला उद्धव यांनी अजित पवारांच्या राजीनामा नाट्यावर लगावला.

Image copyright Getty Images

"तुमच्या डोळ्यात तुमच्या कर्माने अश्रू आले आहेत. माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते ते तुम्हाला दिसले नाहीत," असं उद्धव यांनी म्हटलं.

सुडाचं राजकारण सेना सहन करणार नाही

शरद पवार यांना ईडीनं बजावलेल्या नोटीशीबद्दल उद्धव यांनी म्हटलं, की सत्ता असल्यामुळे सुडाचं राजकारण केल्याचा आरोप आमच्यावर केला. सूडाचं राजकारण कुणी करायला गेलं तर सेना सहन करणार नाही. पण 2000 साली शिवसेनाप्रमुखांबरोबर जे केलं ते काय होतं?

Image copyright Getty Images

शिवसेनाप्रमुखांवर 'सामना'च्या अग्रलेखाच्या निमित्तानं जो खटला दाखल केला, ते सुडाचं राजकारण नव्हतं? असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला.

बाबरी मशीद पडली तेव्हा शरद पवार आणि कंपूचंच सरकार होतं. तेव्हा आपल्यासोबत कोणी नव्हतं. तुम्हा शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेनाप्रमुखांनी मुंबई वाचवली, अशी आठवण उद्धव यांनी जमलेल्या शिवसैनिकांना करून दिली.

शिवसेना काय करणार?

मी सत्तेत होतो, सत्तेत आहे आणि सत्तेत राहणार हा विश्वास व्यक्त करत उद्धव यांनी सत्तेत आल्यावर आपले प्राधान्यक्रम काय असतील हे नमूद केलं.

शेतकऱ्यांसाठी मला कर्जमाफी नको आहे, कर्जमुक्ती हवीये असं उद्धव यांनी म्हटलं.

10 रुपयांत जेवणाची थाळी देणार, वीज वापराचा दर 30 टक्क्यांनी कमी करणार तसंच सुदृढ महाराष्ट्रासाठी 1 रुपयांत रोगांच्या चाचण्या करणारी केंद्रं स्थापन करणार, अशी आश्वासनं उद्धव यांनी दिली.

बाळासाहेबांची धोरणं जगानंही स्वीकारली

370 कलम, राम मंदिर शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न होतं. या विषयांवर अमित शाह बोलल्याप्रमाणे वागत आहेत. बांगलादेशी घुसलेत त्यांना बाहेर हाकला ही पण शिवसेनाप्रमुखांची भूमिका होती.

भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य हवं, हा विचार बाळासाहेबांनी मांडला. आज अमेरिकेत ट्रंपही भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याबद्दल आग्रही आहेत. 50 वर्षांनंतर आज सेनाप्रमुखांचे विचार जगाला पटत आहेत.

संजय राऊतांनी मांडलेले मुद्दे-

  • राज्यात युतीचं सरकार यावं आणि शिवसेनेच्या हाती सत्तेची सूत्रं यावीत, अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. अर्थात, भाजपही सोबत आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.
  • आमच्याकडे कोणतीही वॉशिंग पावडर नाही किंवा वाल्याचा वाल्मिकी करण्याचा फॉर्म्युला नाही. आम्ही वाल्मिकीच घेतो, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपच्या मेगाभरतीवर टोला लगावला.
Image copyright Getty Images
  • भाजपा आमचा सहकारी पक्ष आहे. 370 कलम निर्णयात आम्ही पाठिंबा दिला. पण हे कलम हटलं पाहिजे ही बाळासाहेबांची भूमिका होती. ते काम पुढे नेण्याचं काम अमित शहांनी केलंय. बाळासाहेबांच्या भूमिकाच ते पुढे नेतायंत.
  • राम मंदिर, 370 कलम, जीएसटी असे अनेक विषय उद्धव ठाकरेंनी हातात घेतले की ते सोडत नाहीत.
  • नव्या पिढीचं नेतृत्व कऱण्याची जबाबदारी आदित्य ठाकरेंनी घेतलेली आहे.

'हे भाषण म्हणजे उसनं अवसान'

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला 'उसनं अवसान' असं म्हटलं आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना प्रकाश अकोलकर यांनी म्हटलं, "भाजपने महायुतीतल्या इतर लहान पक्षांना कमळ चिन्हावरून निवडणूक लढण्यासाठी राजी केलं आहे. म्हणजे एका अर्थाने शिवसेनेचे 124 तर कमळ चिन्हावर लढणारे 164 अशी ही लढाई आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे, की शिवसेना भाजपमागे फरफटत जाणार. आपली फसवणूक झाली हे शिवसेनेला लक्षात आलंय, म्हणून हे उसनं अवसान. महाराष्ट्र आणि शिवसैनिकांची समजूत घालण्याचा हा विफल प्रयत्न आहे."

Image copyright SHIV SENA

"उद्धव ठाकरेंनी म्हटलं, की आम्ही मित्रासाठी तडजोड केली. पण त्या वक्तव्याला अर्थ नाही. त्यांनी म्हटलं, की शिवसेना कधीही कुणापुढे वाकणार नाही, पण प्रत्यक्षात शिवसेनेला किती वाकवलं आहे ते स्पष्ट झालेलं आहे. आजचं भाषण आपण जे केलं त्याची वकिली आहे," असं अकोलकर यांनी म्हटलं.

अकोलकरांनी पुढं म्हटलं, "बरं, या सगळ्या भाषणात ते महाराष्ट्राविषयी एकच वाक्य बोलले...सत्तेवर आलो की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करीन. पण पाच वर्षे तुम्ही सत्तेत होताच की. आपल्या पदरात जो चतकोर तुकडा पडेल तो त्यांना हवा आहे आणि त्यापोटी हे सगळं सुरू आहे.

पॉलिटिकली करेक्ट भाषण

"हे भाषण अगदी 'टाईट रोप वॉक' होता. याला आपण 'पॉलिटिकली करेक्ट' म्हणू शकतो. त्यांनी भाजपसोबत तडजोड का केली हे स्पष्ट केलं. दुसरा कुठला पर्याय नाहीये, काँग्रेसबरोबर ते जाऊ शकत नाहीत, हेही ठामपणे सांगितलं. त्याचवेळी आपण झुकलो नाही हे ठसवायला त्यांनी काही वाक्य वापरली," असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाबद्दल बोलताना म्हटलं.

Image copyright SHIV SENA

"हे लक्षात घ्यायला हवं, की त्यांनी आदित्य ठाकरेविषयी काही वक्तव्य केलं नसलं तरी शिवरायांनी कोणत्या वयात पहिला किल्ला घेतला याचा उल्लेख करणं, येणारी पिढी तरूणांचीच असेल असं म्हणणं हे सगळं माझ्या घरातला तरूण निवडणुकीत का उतरला आहे याचं स्पष्टीकरण देणारं होतं," असंही देशपांडे यांनी म्हटलं.

अभय देशपांडे यांनी पुढं म्हटलं, "तिसरं म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी आपलं टार्गेट असणार हे त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी म्हटलं, की राष्ट्रवादी जर आम्हाला टार्गेट करत असेल, तर आम्ही त्यांना करणार. याला दोन कारणं आहेत, एक म्हणजे अनेक मतदारसंघात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असा सरळ सरळ सामना आहे. दुसरं म्हणजे, मराठा व्होटबँक. मराठा समुदाय शिवसेनेचीही मोठी व्होट बँक आहे. अगदी गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीपेक्षा जास्त मराठा मतं शिवसेनेला मिळाली होती, असा सीएसडीएसचा सर्व्हे सांगतो. त्यामुळे या भाषणाव्दारे त्यांनी आपल्या प्रचाराची दिशा काय असणार आहे हे सांगून टाकलं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)