सुशीलकुमार शिंदेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे संकेत दिले?

सुशीलकुमार शिंदे-शरद पवार Image copyright Getty Images

राज्यात विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असली तरी आज या दोन्ही पक्षांचं स्वतंत्र अस्तित्त्व आहे.

मात्र माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 'हे दोन पक्ष एकत्र येतील' या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

"राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष थकले आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस एकाच आईची लेकरं आहेत आणि एकाच आईच्या मांडीवर आम्ही दोन्ही पक्ष खेळलो आहोत. त्यामुळे भविष्यात आम्ही एकत्र येऊ. खरंतर शरद पवार आणि माझ्या वयात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. जे झालं त्याबाबत आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधीही बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील," असं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं.

"काँग्रेसचे नेते वारंवार अशा स्वरुपाची विधानं करत आहेत. संकट काळात पवारसाहेबांनी नेतृत्व करावं असं त्यांना वाटतं. परंतु अशी कुठलीही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही. असा कोणताही विचार नाही. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आहेत. परंतु पक्ष म्हणून एक होण्याचा, विलीनकरणाचा मुद्दा नाही," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यामुळं दोन्ही पक्षांच्या एकीकरणाची शक्यता निर्माण झालीये का, याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाईंनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी राहुल गांधींची भेट घेतली तेव्हाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र पवारांनी त्याला दुजोरा दिला नाही. सुशीलकुमार शिंदे जे म्हणाले आहेत ते योग्यच आहे. राष्ट्रवादीची वेगळी अशी काही विचारसरणी नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना काँग्रेस कसं सामावून घेणार हा खरा प्रश्न आहे', असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सांगितलं.

सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याला किती महत्त्व?

हेमंत देसाईंनी पुढे म्हटलं, की सुशीलकुमार शिंदे जे म्हणालेत ते बरोबर आणि तर्काला धरून आहे मात्र काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने अशी मागणी केलेली नाही. मुळात सुशीलकुमार शिंदेंच्या बोलण्याला काँग्रेस पक्षात तसंच राजकीय वर्तुळात किती महत्व उरलं आहे हेही ध्यानात घ्यायला हवं.

प्रतिमा मथळा सुशीलकुमार शिंदे

देसाई यांनी सांगितलं, "आतापर्यंत राज्यात काँग्रेस मोठा पक्ष आणि राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असं आघाडीचं चित्र होतं. मात्र, आता काँग्रेस पूर्णत: विस्कळीत झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीची स्थिती थोडी बरी आहे. राष्ट्रवादीचं वेगळं संस्थान आहे. स्वत:चा पक्ष ही शरद पवारांसाठी स्वाभिनाची गोष्ट आहे. घरातल्या नेत्यांबरोबरच राष्ट्रवादीच्या नेत्यांना काँग्रेस कसं वागवणार हा कळीचा मुद्दा आहे."

काँग्रेस सध्या स्वतःच गोंधळलेली

ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा निकाली काढला.

बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलं, "राष्ट्रवादीची स्थापना होऊन वीस वर्षं झाली आहेत. स्थापनेच्या वेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा होता. मात्र 2004 निवडणुकीआधीच राष्ट्रवादीने तो मुद्दा सोडून देत आघाडी केली होती. त्यामुळे तो विषय नाही. काँग्रेस पक्ष स्वत:च गोंधळात आहे. नेतृत्व कोण करणार हे ठरलेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हायचा प्रश्नच नाही. ही मोठी प्रक्रिया असते. त्याला बराच वेळ लागतो. आता तशी शक्यता दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने नव्हे तर सगळ्या सेक्युलर गटांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. सुशीलकुमार शिंदेंच्या मुलीविरोधात राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं असेल पण विलीनकरणाचा मुद्दाच नाही'.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा सोनिया गांधी आणि राहुल गांधी

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यादरम्यान सुशीलकुमार शिंदेच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

"काँग्रेस-राष्ट्रवादी कशामुळे थकले आहेत? खा खा खाऊन थकलात?" असं उद्धव यांनी म्हटलं.

"काँग्रेस-राष्ट्रवादीनं एकत्र यायला हवं असं सुशीलकुमार यांनी म्हटलं. पण एकत्र येण्याआधी त्यांनी आपला नेतृत्व कोण हे ठरवावं. शरद पवार की सोनिया गांधी?" असा टोलाही उद्धव यांनी लगावला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)