राज ठाकरे विधानसभा निवडणुकीला आघाडीबरोबर का आले नाहीत याचा अजित पवारांनी केला उलगडा #5मोठ्याबातम्या

राज ठाकरे Image copyright Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.

1. राज ठाकरेंना काँग्रेसमुळं आघाडीत घेऊ शकलो नाही - अजित पवार

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्याची आमची इच्छा होती. मात्र काँग्रेसमुळं त्यांच्या पक्षाला आघाडीत घेऊ शकलो नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितलं. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि काँग्रेस वगळता इतर पक्षांचा पाठिंबाही होता. मात्र राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांबाबतच्या भूमिकेमुळं काँग्रेस त्यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images

राज ठाकरेंना आघाडीत घेता आलं नाही, याबद्दल वाईट वाटत असल्याचंही अजित पवारांनी नमूद केलं.

दरम्यान, दुसरीकडे भांडुपमधील सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेच्या मुद्द्याला हात घातलाय. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.

"मुंबईत मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा ठीक आहेत, पण चौथी भाषा कुणी आणत असेल, तर बांबूचे फटके दिले जातील," असं राज ठाकरे म्हणाले. वरळीमध्ये शिवसेनेनं गुजराती, तामिळ इत्यादी भाषांमधून केलेल्या पोस्टरबाजीवरही राज ठाकरेंनी टीका केली.

जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली तेव्हा अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं होतं की समान विचारधारा असलेल्या लोकांनाच आघाडीत स्थान राहील. मनसेनी काही मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करावी असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं.

2. कोणताही धोका नको म्हणून शिवसेनेशी युती - चंद्रकांत पाटील

शिवसेना आणि भाजपची विचारसरणी जुळणारी आहे. तसेच, कोणताही धोका नको म्हणून शिवसेनेशी युती केली आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

"गेल्या विधानसभा निवडणुकीत युती नसताना दोन्ही काँग्रेसला मिळालेली मतं आणि यावेळी त्यांची झालेली आघाडी विचारात घेता कसलाही धोका नको म्हणून युती केली," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Image copyright Getty Images

तसेच, निवडणुकीनंतर महायुतीचेच सरकार आल्यावर घटक पक्षांचा मान-सन्मान कायम राखला जाईल, असंही ते म्हणाले.

यावेळी चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवरील टीकेबाबतही मत मांडलं. ते म्हणाले, "शरद पवार आमचे दुश्मन नाहीत किंवा त्यांच्याशी बांधावरचे भांडण नाही. आम्हाला त्यांचा आदरच. मात्र आमचा पक्ष आणि आमची ताकद वाढवण्यासाठी त्यांच्यावर टीका करणं, कोंडी करणं अपरिहार्य आहे."

या निवडणुकीनतंर शरद पवार यांची ताकद संपल्यास दोन्ही काँग्रेस आपोआप संपुष्टात येतील, असा दावाही चंद्रकांत पाटलांनी केला.

3. पंजाबमध्ये हायअलर्ट, सुरक्षाव्यवस्थेत वाढ

पंजाब पोलिसांनी पठाणकोट आणि गुरूदासपूर जिल्ह्याला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेजवळील भागातील सुरक्षेत मोठी वाढ केलीय. कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन (CASO) या भागात सुरू करण्यात आलंय. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिलीय.

गुप्तचर यंत्रणांकडून संभाव्य दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच पंजाब पोलिसांनी सुरक्षेत वाढ केलीय. जवळपास पाच हजार पोलीस या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत.

Image copyright Getty Images

पठाणकोट, गुरूदासपूर आणि बाटला येथील सर्व हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी किमान 8 बेड रिकामे ठेवावेत, असे आदेशही पठाणकोटचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. भूपिंदर सिंग यांनी दिले आहेत.

पठाणकोट, गुरूदासपूरसह इतर जिल्ह्यातही हे ऑपरेशन सुरू केलं जाणार असल्याचं पंजाबचे पोलिस प्रमुख दिनकर गुप्ता यांनी सांगितलं.

4. जीएसटीमध्ये कमतरता असू शकतात, पण टीकेपेक्षा सूचना करा - निर्माला सीतारामन

जीएसटीमध्ये काही कमतरता असू शकतात, मात्र या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी टीका करण्यापेक्षा जीएसटी प्रणाली अधिक चांगली करण्यासाठी सूचना कराव्यात, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. इकोनॉमिक टाईम्सनं ही बातमी दिलीय.

निर्मला सीतारामन यांनी पुण्यात सीए, सीएस, उद्योजक यांसह आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला.

त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, "मोठ्या कालावधीनंतर संसदेतले अनेक पक्ष आणि राज्यांच्यां विधानसभांनी एकत्रित येत काम केलं आणि जीएसटीचा कायदा आणलाय. अचानक आपण असं म्हणू शकत नाही की, किती चुकीची व्यवस्था' आहे."

"जीएसटीवर केवळ टीका करू नये. यामध्ये काही कमतरता असू शकतात, ज्यामुळं तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण माफ करा, कारण हा देशाचा कायदा आहे," असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

5. वाहन उद्योग : सणासुदीच्या काळातही कार विक्रीत24 टक्क्यांची घट

सणासुदीच्या काळातही वाहन उद्योगावरील संकट कायम असल्याचं दिसतंय. कारण सप्टेंबरमध्ये एकूण कार विक्रीमध्ये तब्बल 23.69 टक्क्यांची घट नोंदवण्यात आलीय. कारविक्रीत घट होण्याचा हा सलग अकरावा महिना ठरला आहे. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.

दुचाकींच्या विक्रीलाही फटका बसल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. 24 टक्क्यांनी दुचाकींची विक्री घटली आहे. SIAM या कार उद्योजकांच्या संघटनेनं ही आकडेवारी शुक्रवारी प्रसिद्ध केली.

दिवाळी आणि दसरा या सणांच्या पार्श्वभूमीवर कार विक्रीत वाढ होण्याचा अंदाज होता. वाहन उद्योगाला तशी अपेक्षा होती. मात्र, तसे घडल्याचे सियामच्या आकडेवारीतून दिसून येत नाही.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कार विक्रीचा आकडा 2 लाख 92 हजार 660 होता. यंदा हा आकडा 1 लाख 31 हजार 281 एवढा आहे. म्हणजेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत कार विक्रीत 33.4 टक्क्यांनी घट झालीय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)