रामदास आठवले: मॉब लिंचिंग शब्द परकीय, तरीही दलित व मुस्लिमांवर अत्याचार #5मोठ्या बातम्या

रामदास आठवले Image copyright Twitter

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.

1. मॉब लिंचिंग शब्द परकीय, तरीही दलित व मुस्लिमांवर अत्याचार - आठवले

मॉब लिंचिंग हा भारतीय शब्द नाही तर तो विदेशी आहे, या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मताशी आपण सहमत आहोत, परंतु भारतात मॉब लिंचिंग होऊन त्यात सुडाचे राजकारण घडते. त्यात दलित व मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडली. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे.

विधानसभा निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाची भूमिका जाणून स्पष्ट करताना आठवले यांनी सध्याच्या राजकीय, सामाजिक प्रश्नांवरील आपली मते मांडली. रिपब्लिकन राजकारणाचा प्रभाव ओसरत चालल्याचे त्यांनी मान्य केले. भाजप-शिवसेनेकडून रिपब्लिकन पक्षाला जागा कमी मिळाल्या तरी, सत्तेतील वाटा जास्त मिळणार आहे, असा दावा त्यांनी केला.

2. PMC बँकप्रकरणी HDIL कंपनीची 5000 कोटींची मालमत्ता जप्त

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीविरूद्ध अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई सुरूच ठेवली आहे. मागच्या एका आठवड्यात कंपनीची 5000 कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही बातमी दैनिक लोकमतने दिली आहे.

Image copyright Getty Images

दिवाळखोरीत निघालेल्या एचडीआयएल कंपनीचे कार्यकारी संचालक राकेश वाधवा आणि त्यांच्या मुला सारंग वाधवा यांना 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. त्यांच्या कोठडीची मुदत 14 ऑक्टोबरपर्यंत आहे.

वाधवा यांच्या मालकीचे वसईतील दिवाण फार्म हाऊस शुक्रवारी जप्त करण्यात आले. याशिवाय विरार, पालघर परिसरातील बंगले आणि तब्बल 400 एकर भूखंड ताब्यात घेण्यात आले आहेत. तसंच दोन खासगी विमानं, जहाज, मर्सिडीझ बेंझ, बेटली, टोयोटा इनोव्हेशन अशा सुमारे 112 गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती या बातमीमध्ये देण्यात आली आहे.

3. माहिती अधिकार कायद्याचा वापर कमी करण्यासाठी सरकार कटिबद्ध - अमित शाह

आरटीआयचा वापर कमी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यासाठी जास्तीत जास्त माहिती सार्वजनिक करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आयोगाच्या 14व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.

Image copyright Twitter

शाह म्हणाले, जगातील सर्व देशांनी माहिती अधिकार कायदा तयार केल्यानंतर तो बंद केला आहे. या देशांना असं वाटतंय की त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. मात्र, भारत सरकारने असा विचार केलेला नाही. मोदी सरकारला याबाबत एक अशी व्यवस्था बनवायची आहे, ज्यामुळे आरटीआयचे प्रमाण कमी होईल. कोणालाही आरटीआयद्वारे अर्ज करण्याची गरज पडणार नाही. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे.

4. काश्मीर : श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला

जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लाल चौकाजवळील हरिसिंह रस्त्यावर हा दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला अति सुरक्षित क्षेत्रात (हाय सिक्युरिटी झोन) झाला. हल्ल्याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाच नागरिक जखमी झाल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटले आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा श्रीनगरच्या लाल चौकाचे संग्रहीत छायाचित्र

या हल्ल्यात 5 नागरिक जखमी झाले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले आहे. परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. ही बातमी हिंदुस्तान टाईम्स मराठी या वेबसाईटने दिली आहे.

5. भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक अवस्थेकडे - रघुराम राजन

आर्थिक विकासाचा वेग मंदावलेली भारताची अर्थव्यवस्था वाढत्या तुटीमुळे 'चिंताजनक' अवस्थेकडे वाटचाल करीत आहे. तिची प्रकृती गंभीर होण्याची चिन्हे आहेत, असा इशारा रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. ही बातमी दैनिक महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात झालेल्या ओ. पी. जिंदाल व्याख्यानमालेत भारतीय अर्थव्यववस्थेबद्दल राजन बोलत होते. निश्चलनीकरण आणि घाईघाईत केलेली वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी हे घटकही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्यास कारणीभूत ठरले, असं मत राजन यांनी व्यक्त केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)