नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स चोरांनी लांबवली, पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी काळजीत

मोदी Image copyright Getty Images

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी दमयंती मोदी यांची पर्स चोरट्यांनी लांबवल्याची घटना दिल्लीत घडली.

दमयंती मोदी यांच्या पर्समध्ये 56 हजार रूपये रोख रक्कम आणि पॅन कार्ड, मतदान ओळखपत्रासारखे कागदपत्र होते. या प्रकरणाचा पोलिस तपास करत असून, संशयिताला शोधण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

याआधी दमयंती मोदी यांचे वडील आणि नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्यासोबतही दिल्लीत चोरीची घटना घडली होती.

दमयंती मोदी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांची मुलगी आहे. पती विकास मोदी आणि दोन मुलींसह दमयंती गुजरातमधील सुरत येथे राहतात. दमयंती मोदी या गृहिणी असून, त्यांचे पती व्यावसायिक आहेत.

Image copyright Getty Images

प्रल्हाद मोदी यांनी दमयंती यांच्यासोबत घडलेल्या चोरीच्या घटनेनंतर कुटुंबाच्या सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केलीय.

स्कूटीवरून आलेल्या चोरांनी पर्स लांबवली

दमयंती मोदी या पती आणि मुलींसोबत अमृतसरहून दिल्लीला परतल्या होत्या. शनिवारी संध्याकाळी चार वाजता त्या गुजरातला रवाना होणार होत्या. त्यादरम्यान विश्रांतीसाठी त्यांनी सिव्हिल लाईन परिसरात गुजराती समाज भवनमध्ये रूम बुक केली होती.

ज्यावेळी त्या सोबत असलेलं साहित्य गाडीतून उतरवत होत्या, त्यावेळी स्कूटीवरून आलेल्या अज्ञातांनी पर्स पळवून नेली.

Image copyright Getty Images

सिव्हिल लाईन्सचे एसपी अशोक त्यागी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, दमयंती मोदींच्या पर्स चोरीच्या घटनेची आमच्याकडे तक्रार आली असून, तपास सुरू करण्यात आलाय.

दिल्लीत चेन आणि पर्स स्नॅचिंगच्या घटना सर्रासपणे होतात. 2018 सालच्या आकडेवारीनुसार दिल्लीत दररोज स्नॅचिंगच्या 18 घटना होतात.

प्रल्हाद मोदींना सुरक्षेबाबत काळजी

बीबीसी गुजरातीचे भार्गव पारीख यांनी दमयंती यांचे वडील प्रल्हाद मोदी यांच्याशी या घटनेबाबत बातचीत केली.

प्रल्हाद मोदी म्हणाले, "दिल्लीत कायदा-सुव्यवस्था असा काही प्रकारच नाहीये. चोर उघडपणे फिरतायत. सर्वसामान्य लोकांचं कुणीच ऐकत नाहीय."

ते पुढे म्हणाले, "याआधी जेव्हा मी दिल्लीत गेलो होतो, त्यावेळी माझा 30 हजारांचा फोन चोरीला गेला होता. दिल्ली विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मात्र अजूनपर्यंत त्या तक्रारीचं पुढे काहीच झालं नाही. माझ्या मुलीचे 56 हजार रूपये मिळणं कठीण आहे. कारण तिथली कायदा व सुव्यवस्था वाईट आहे."

Image copyright ANI

प्रल्हाद मोदी यांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबतही काळजी व्यक्त केली. आपण स्वत:ही असुरक्षित आहोत, असं त्यांना वाटतं.

"मला आणि माझ्या कुटुंबीयांना सरकारनं सुरक्षा दिली होती. मात्र 26 मे 2019 रोजी कुठल्यातरी कारणावरून सुरक्षा काढून घेण्यात आली. मी रेशन दुकानांच्या संघटनेचा अध्यक्ष आहे. देशाच्या विविध भागात मला फिरावं लागतं." असं प्रल्हाद मोदी सांगतात.

आपल्याला धमक्या मिळत असल्याचे प्रल्हाद मोदी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. ते म्हणतात, "मी सरकारच्या विरोधात आवाज उठवतो. मला सुरक्षा दिली गेली होती, तेव्हा सुरक्षित वाटायचं. आता असुरक्षित वाटतं."

मुलीबाबत दिल्लीत घडलेल्या घटनेबाबत ते म्हणतात, "माझी मुलगी आणि जावई दिल्लीत आहेत. माझं त्यांच्याशी बोलणं झालं, तेव्हा कळलं की, त्यांना पोलिसांकडून काही विशेष मदत झाली नाही."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक फोटो

सुरक्षेच्या कारणास्तव कुटुंबीयांना समोर आणत नाही. मात्र आता मुलगा आणि जावयाचीही काळजी वाटू लागलीय, असं प्रल्हाद मोदी सांगतात.

मला माझ्या चोरीला गेलेला 30 हजारांचा फोन आणि मुलीचे 56 हजार रूपये विसरावं लागेल, असं ते म्हणतात.

दिवळीच्या सुट्टीनिमित्त ते बाहेर जाणार होतो, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव आता त्यावर पुनर्विचार करावा लागेल, असं प्रल्हाद मोदींनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)