ट्रान्सवुमन ए. रेवती: अस्तित्वासाठीचा संघर्ष ते कोलंबिया विद्यापीठाकडून गौरव

ए रेवती Image copyright BBC Tamil
प्रतिमा मथळा ए रेवती

तामिळ साहित्यविश्वात लैंगिक समानता नाही आणि पुरुष साहित्यिकांना मिळणारा मान-सन्मान स्त्री साहित्यिकांना मिळत नाही, असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र ट्रान्सवुमन ए. रेवती यांनी तामिळ साहित्यविश्वाच्या अलिखित नियमांना फाटा देत वैभवशाली इतिहास रचलाय.

ए. रेवती यांचं नाव कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात मोठ्या अभिमानानं झळकताना दिसतंय, तेही माया अँजेलो, टोनी मॉरिसन, मर्मन सिल्को आणि शेंझ या नामवंत लेखिकांच्या सोबत.

कोलंबिया विद्यापीठातल्या बटलर लायब्ररीच्या प्रवेशद्वारावर अॅरिस्टॉटल, प्लेटो, होमर, डेमोस्थेनेस आणि सिसेरो यांसारख्या आठ साहित्यिकांची नावं आहेत. या यादीत स्त्री लेखिकांची नावंही समाविष्ट करावी, यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं.

1989 मध्ये तर विद्यार्थ्यांनी स्वत:च बटलर लायब्ररीच्या प्रवेशद्वारावर स्त्री लेखिकांची नावं लिहिली आणि तीही पुरुष लेखकांच्या नावांच्या वरील बाजूस. मात्र काही दिवसांनी स्त्री लेखिकांची नावं काढून टाकण्यात आली.

Image copyright Twitter

त्यानंतर सुमारे 30 वर्षांनी स्त्री हक्कांसाठीच्या लढ्याच्या स्मरणार्थ जागतिक स्तरावर नावाजलेल्या आणि महत्त्व प्राप्त झालेल्या स्त्री लेखिकांच्या नावांची यादी असलेलं बॅनर बटलर लायब्ररीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली.

या बॅनरवर एक नाव होतं तमिळनाडूमधील ट्रान्सवुमन ए. रेवती यांचं. बीबीसीनं ए. रेवती यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचा प्रवास जाणून घेतला.

कोण आहेत रेवथी?

तमिळनाडूच्या नमक्कल जिल्ह्यात ए. रेवती यांचा जन्म झाला. मुलगा म्हणून त्यांचं नाव दुराईसामी ठेवण्यात आलं. मात्र, पाचव्या इयत्तेत असताना रेवती यांना त्यांच्यातील लैंगिक बदलाची जाणीव झाली. त्यानंतर त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. शेजारी-पाजारी किंवा शाळेतही त्यांना अनेकजण चिडवू लागले. आई-वडील आणि भावाकडून रेवती यांना त्रास सहन करावा लागला.

त्यानंतर रेवती यांनी कुटुंबीयांना सोडलं आणि दिल्ली, मुंबई अशा ठिकाणी त्या भटकत राहिल्या. आजूबाजूच्या लोकांनी, समाजाने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण केल्या. तृतीयपंथीयांना सामोरं जावं लागणाऱ्या सर्व अडचणींना रेवती सामोऱ्या गेल्या.

त्यानंतर 1999 साली रेवती यांनी बंगळुरूमधील संगमा संस्थेशी जोडल्या गेल्या.

Image copyright BBC Tamil

"तुम्हाला आता जी रेवती दिसतेय, ती संगमा लायब्ररीनं तयार केलीय. मी कुणी मोठी साहित्यिक नाहीय. किंबहुना, माझं जास्त वाचनही नाहीय. भाषेबद्दल माझ्या मनात एक भीती आहे. समाजानं अनेक गोष्टी पवित्र करून ठेवल्या आहेत, भाषेलाही त्या पवित्र गोष्टींमध्ये नेऊन ठेवलंय. कुठल्याही पवित्र म्हणवल्या जाणाऱ्या गोष्टींना सामोरं जायला मला भीती वाटत होती." असं ए. रेवती सांगतात.

"संगमाच्या लायब्ररीनं मला वाचनातून अफाट अनुभव दिला. मी तिथं अनेक पुस्तकं वाचली. त्यामुळं माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले. तृतीयपंथीय लोकांचं दु:ख मांडणारी तिथं अनेक इंग्रजी पुस्तकं होती. पण त्या पुस्तकांमध्ये भारतीय दृष्टिकोनातून मांडणी नव्हती. हीच गोष्ट मला पुस्तक लिहिण्यास प्रोत्साहन देणारी ठरली. मात्र तरीही मला संकोच वाटत होताच. त्यानंतर बामा या लेखिकेनं मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं, विश्वास दिला आणि पुस्तक लिहिण्यास सांगितलं," असं सांगत ए. रेवती आपल्या आठवणींना उजाळा देतात.

पहिलं पुस्तक

रेवती यांनी 2004 साली 'उनरवुम उरूवमम' हे पहिलं पुस्तक लिहिलं. ट्रान्सवुमन व्यक्तीनं ट्रान्सवुमनवर लिहिलेलं हे भारतातील पहिलं पुस्तक ठरलं. ट्रान्सवुमनच्या आयुष्याबद्दल तसंच समाज ट्रान्सवुमनकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, अशा या पुस्तकामुळं चर्चा होऊ लागल्या. या पुस्तकाला अनेक पुरस्कारही मिळाले.

रेवती सांगतात. "मी एक पुस्तक लिहिलं असलं तरी मला माझ्या भाषेबद्दल आणि साहित्यिक मूल्यांबद्दल संकोच वाटत होता. त्याचवेळी पेंग्विन पब्लिकेशन्सनं 'उनरवुम उरूवमम' पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादासाठी माझ्याकडे परवानगी मागितली. यामुळं मला आणखी विश्वास आला. तेव्हा मी त्यांना विचारला, मी माझी आत्मकथा लिहीन, तुम्ही अनुवादित कराल? त्यांनी होकार दिला. त्यानंतर 'The Truth About Me: A Hijra Life Story' हे पुस्तक प्रकाशित झालं."

आत्मकथा इंग्रजीतच का पहिल्यांदा प्रकाशित केली, मागेही एक कारण असल्याचं रेवती सांगतात.

Image copyright BBC Tamil

त्या सांगतात, "मी आत्मकथेत माझ्या आयुष्यातली कुठलीच गोष्ट लपवून ठेवली नव्हती. सर्व काही उघडपणे लिहिलं. त्यामुळं आत्मकथा थेट तामिळ भाषेत प्रकाशित झाली, तर अनेक लोकांना ते अवघडल्यासारखं होईल. त्यामुळं पहिल्यांदा इंग्रजीत प्रकाशित केली. इथं एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे मला इंग्रजी येत नाही."

हे पुस्तक तामिळ भाषेतही प्रकाशित व्हायला हवं, असं अनेक लोकांनी सांगितल्यानंतर आणि तसा विश्वास दिल्यानंतर रेवती यांनी 'वेल्लाई मोझी' नावानं तामिळ अनुवाद प्रकाशित केला.

लेखक पेरूमल मुरूगन यांनी माझ्या लेखनाला आकार दिल्याचं रेवती सांगतात. "आम्ही जवळच राहतो. मी नियमितपणे त्यांना भेट असते आणि खूप चर्चा करत असते. आणखी चांगलं लिहिण्यासाठी ते कायमच सूचना करत असत."

कोलंबिया विद्यापीठातील बहुमान

कोलंबिया विद्यापीठातल्या बटलर लायब्ररीच्या प्रवेशद्वारावर नामांकित साहित्यिकांच्या यादीत आपलं नाव लिहिल्याचं रेवती यांना दोन दिवसांनंतर कळलं.

"कोलंबिया विद्यापीठात पीएचडी करत असलेल्या मित्रानं याबाबत सांगितलं. मला सुरुवातील त्याचं महत्त्वच लक्षात आलं नाही. त्यानंतर त्यांने सांगितलं की 30 वर्षांपूर्वी स्त्री लेखिकांच्या नावांसाठी झालेलं आंदोलन आठवलं. मला खरंच खूप अभिमान वाटला," असं रेवती सांगतात.

Image copyright BBC Tamil

रेवती यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात जाऊन स्वत:च्या डोळ्यांनी आपलं नाव पाहायचंय. "मला खरंच तिथं जायचंय आणि स्वत: पाहायचंय. पण पैशांची अडचण आहे."

आयुष्य म्हणजे एक नाट्य आहे

नाट्य कलावंत श्रीजित आणि मंगाई यांना रेवती सहकार्य करतात. एखाद्या नाटकासारखी त्यांनी आपलं आयुष्य समजावून सांगतात. तीसहून अधिकवेळा ते सादरही केलंय.

Image copyright BBC Tamil

"लेखन आणि रंगमंच ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोत्तम माध्यमं आहेत. मला या दोन्ही माध्यमांचा अधिकाधिक चांगला वापर करायचा आहे," असं रेवती सांगतात.

"ट्रान्सजेंडरबद्दल लोकांचं मत थोडसं बदललंय. मात्र ते पुरेसं नाहीय. सुप्रीम कोर्टाचा कलम 377 बद्दलचा निकाल आशादायी आहे. पण अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचाय," असं रेवती सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)