राहुल गांधी: मुंबई आणि औसामध्ये विधानसभा निवडणूक प्रचारसभा, पण काँग्रेसला फायदा होईल का?

राहुल गांधी, नरेंद्र मोदी, भाजप, काँग्रेस, महाराष्ट्र Image copyright Twitter
प्रतिमा मथळा राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मेक इन इंडिया'चा नारा देत असले तरी 'मेड इन चायना' अशी परिस्थिती झाली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात लातूर आणि मुंबईत दोन ठिकाणी बोलताना भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं.

"शेतकरी आणि बेरोजगारांची अवस्था वाईट आहे. शेतकऱ्यांना हमीभाव चांगला मिळत नाहीये तर बेरोजगारांच्या हाताला काम नाही. सामान्य जनतेच्या मुद्द्यांपासून भाजप मतदारांना भरकटवत आहे. कंपन्या बंद होत आहेत, बेरोजगारीचा दर 45 वर्षांमध्ये सगळ्यात नीचांकी झाला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही पण 10-15 उद्योगपतींना साडेपाच लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ झालं आहे. नोटबंदी आणि जीएसटीने सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं. पण त्याविषयी कोणी बोलायला तयार नाही," अशी टीका राहुल यांनी केली.

ते पुढे म्हणाले, "आपण चंद्रावर झेप घेतली हे कौतुकास्पदच आहे. पण इथल्या समस्यांचं काय? आतापर्यंत आपल्या देशाची प्रगती झाली कारण सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन काम करत आहेत. या देशाची जेवढी शकलं केली जातील तेवढं आपलं नुकसान होणार आहे."

"काँग्रेस पक्षाची पाळंमुळं महाराष्ट्राच्या मातीत रुजली आहेत. काँग्रेसला निवडून द्याल याची खात्री वाटते. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे. त्यांनी अनेक आश्वासनं दिलं होती. त्यांचं काय झालं? पीएमसी बँकेचं काय झालं याविषयी बोला. पुण्यातला ऑटोमोबाईल उद्योग, सुरतमधला डायमंड उद्योगाचं काय झालं यावर चर्चा करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षि जिनपिंग यांची भेट झाली. 'मेड इन इंडिया' नव्हे 'मेड इन चायना' समीकरण झालं आहे," असं राहुल म्हणाले.

"रफालप्रकरणी गडबड झाली आहे हे संरक्षण मंत्रालयाच्या लोकांनीही मान्य केलं आहे. राफेल सतवतं आहे म्हणूनच राजनाथ सिंह यांना फ्रान्सला जावं लागलं," असा टोला त्यांनी लगावला.

"देशाची जी स्थिती झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. अंबानी-अदानी तर तुम्हाला सगळं काही मिळू शकतं. पण तुम्ही कष्टकरी सामान्य माणूस असाल तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. काँग्रेस पक्ष सगळ्यांना एकत्र घेऊन काम करतो. आम्ही खोटी आश्वासनं देत नाही," असं ते यावेळी म्हणाले.

'राहुल गांधींना कोण गांभीर्याने घेतं?'

मात्र राहुल गांधींच्या या सभांचा महाराष्ट्र निवडणुकतच नव्हे तर काँग्रेस पक्षावरही परिणाम होणार नाही, असं भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांना वाटतं.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "राहुल गांधींना कोण गांभीर्याने घेतं? त्यांनी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात फक्त दोन दिवसांसाठी येणं, तेही अतिशय सक्रिय अशा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारांवर टीका करायला. त्यावर आम्ही काय बोलावं?"

Image copyright Getty Images

रोजगार आणि शेती प्रश्नावर विचारल्यावर भाजप नेते काश्मीर आणि कलम 370वर बोलतात किंवा चंद्राकडे पाहायला लावतात, अशी टीका राहुल गांधी यांनी आज केली. यावर विचारलं असता शायना एनसी म्हणाल्या, "आम्ही शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार, पीकविमा आणि शेतकरी सन्मान योजनेसारख्या योजना आणल्या. या सरकारच्या काळात कुठलाही घोटाळा बाहेर आला नाही.

"आम्ही मुंबईसाठी मेट्रो आणि सागरमाला प्रकल्पासारखे मोठे विकास प्रकल्प आणले. काँग्रेसने काय केलं? फक्त शिखर बँक घोटाळा आणि सिंचन घोटाळा," त्यांनी पुढे सांगितलं.

मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात फडणवीस सरकारला पूर्ण यश आलं नाही, हे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी मान्य केलं की "आम्ही सारंकाही आलबेल केलंय, असा दावा करत नाही आहोत. मात्र महाराष्ट्र या सरकारच्या काळात विकासाच्या महामार्गावर लागलाय, हे नक्की."

राहुल गांधींचा महाराष्ट्रात प्रभाव पडणार?

जर 80 वर्षांचे शरद पवार आज महाराष्ट्रभर पक्षासाठी फिरताना दिसतात, तर राहुल गांधींना एवढा उशीर का झाला, असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना उपस्थित केला.

"शरद पवार ज्या killer's instinctने संपूर्ण राज्यभर, प्रत्येक मतदारसंघाचे बारकावे समजून प्रचार करतायत, त्यामुळे बऱ्यापैकी भाजपविरोधी वातावरण त्यांना निर्माण व्हायला मदत झालेली आहे. किमान तो 370-370चा घोषवारा दिला होता भाजपने, तो कमी झालाय," असं निरीक्षण ते नोंदवतात.

मात्र राहुल गांधींना प्रचाराला येण्यास उशीर झाला आहे का, हे विचारलं असता ते म्हणाले, "काँग्रेस एकंदरच शांत दिसतेय. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातसह सर्वच नेते कुठेही प्रचारतोफा डागताना दिसत नाही. त्यांना दिल्लीने एवढीही ताकद दिलेली नाही, त्यामुळे थोरातांची परिस्थिती तर अतिशय केविलवाणी झाली आहे. त्यामुळे आता त्यांनी संगमनेर राखावा की बाहेर करावा प्रचाराचा देखावा, हे कळत नाहीय.

Image copyright Getty Images

"या प्रचारात रंग भरण्याचं काम दिल्लीच्या मंडळीचं होतं. मात्र त्यांनी उमेदवार ठरवण्यासाठीच दीड महिन्याच्या काळात 10 बैठका घेतल्या. याच दरम्यान फडणवीसांनी संपूर्ण मराठा लॉबी आपल्या बाजूने उभी केली. त्यामुळे काँग्रेसचा कारभार अतिशय धीम्या गतीने चाललेला आहे," असं त्यांना वाटतं.

"राहुल गांधींचं वैयक्तिक पातळीवर नैराश्य असेल, पण एका राष्ट्रीय पक्षाला नैराश्याच्या गर्तेत ओढण्याचा त्यांना अधिकार नाही. तुम्हाला अध्यक्ष व्हायचंय की नाही व्हायचंय, ही गोष्ट वेगळी. पण निदान पक्षासाठी काम करणं तरी थांबवू नये ना. त्यांना लोक ओळखतात, त्यांना पाहायला आजही लोक येतात. पण पुढे चालून प्रियंका गांधी जर महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या तर त्यांना आपला बेस पुन्हा नव्याने स्थापित करावा लागेल.

तरुणांमधली नवीन फळी जी राहुल गांधींनी उभी केली होती, ती आता पक्षाची सूत्र सोनिया गांधींकडे आल्यामुळे मागे पडेल की काय आणि जुनी फळी परत येणार की काय, अशी भीती तरुणांमध्ये जाणवत होती. मात्र आता राहुल प्रचारासाठी आले असता ही भीती जरा कमी होईल, असं उन्हाळे पुढे म्हणाले.

काँग्रेसला एकंदरच उशीर झाला आहे, मात्र संधी अजूनही आहे, असं संजीव उन्हाळे यांना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)