चंद्रकांत पाटील यांनी दत्तक घेतलेलं कसबा वाळवे गाव आदर्श झालं आहे का?

चंद्रकांत पाटील Image copyright Chandrakant Patil/facebook

"चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निधीतून गावातील मुख्य रस्त्यांचं काम झालं, पण अंतर्गत रस्ते अजूनही खराब अवस्थेत आहे," रस्त्याकडे निर्देश करत कृष्णात देसाई सांगत होते.

कृष्णात देसाई हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावात राहतात.

केंद्र सरकारच्या 'सांसद आदर्श ग्राम योजने'च्या धर्तीवर राज्यात 2015मध्ये 'आमदार आदर्श ग्राम योजना' सुरू करण्यात आली. प्रत्येक आमदारानं आपल्या मतदारसंघातील 3 ग्रामपंचायती निवडाव्यात आणि जुलै 2019पर्यंत त्या 'आदर्श ग्राम' म्हणून विकसित कराव्यात, असं या योजनेसंबंधीच्या शासन निर्णयात सांगण्यात आलं.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा वाळवे हे गाव दत्तक घेतलं आहे. आम्ही गावात गेल्यानंतर सगळीकडे बऱ्यापैकी स्लॅबचे बांधकाम असलेली घरं पाहायला मिळाली.

बाजारपेठ, रस्ता आणि विश्रामाची व्यवस्था

आम्ही गावात पोहोचलो, तेव्हा तिथल्या गावकऱ्यांनी आमच्याशी चर्चेला सुरुवात केली.

यापैकी एक असलेल्या विलास संकपाळ यांनी सांगितलं, "आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निधीतून गावात मोठी बाजारपेठ सुरू करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी मंदिराच्या बाहेर बसण्याची व्यवस्था करण्यात आली."

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
चंद्रकांत पाटील यांचं दत्तक कसबा वाळवे गाव किती आदर्श? - पाहा व्हीडिओ

गावातील कृष्णात देसाई यांचं या बाजरपेठेत मेडिकलचं दुकान आहे. आमदार निधीतून गावातील मुख्य रस्ते बनवण्यात आले असले, तरी अंतर्गत रस्ते अजूनही खराब अवस्थेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "मुख्य रस्त्यावर असलेल्या गटारी झाकण्यात आल्यानं बाकीच्या गटारीवर डासांचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो, त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे."

पूर्ण वेळ दवाखान्याची गरज

गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर हिरवाईनं बहरलेला आहे. आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा तिथले मुख्य डॉक्टर मीटिंगसाठी कोल्हापूरला गेल्याचं समजलं.

याविषयी अधिक विचारणा केल्यानंतर प्राथमिक आरोग्या केंद्रात निवासी डॉक्टर नसल्याची माहिती मिळाली.

Image copyright Swati patil/bbc
प्रतिमा मथळा सुनीता पाटील

गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधांचा अभाव असल्याचं गावकरी सुनीता पाटील यांनी सांगितलं.

त्या म्हणाल्या, "गावात सरकारी दवाखाना आहे, पण रात्रीच्या वेळी कुणी डॉक्टर इथं उपलब्ध राहत नाही. त्यामुळे रात्री कुणाचं काही दुखायला लागलं, तर कोल्हापूरला जाण्यासाठी पर्याय नसतो."

कसबावाळवे गाव कोल्हापूरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे.

गावात 2 शाळा, पण...

कसबा वाळवे गावात 8 अंगणवाड्या आहेत. आंगणवाड्यांमधल्या आणि शाळेतल्या मुलांना इथं पोषण आहार उपलब्ध असल्याचं शिक्षकांनी सांगितलं.

Image copyright Swati patil/bbc

गावात मुलांची आणि मुलींची अशा 2 स्वतंत्र प्राथमिक शाळा आहेत. या ठिकाणी ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करण्यात आलीय. त्यासाठी टीव्ही आणि प्रोजेक्टर दिला आहे. मात्र विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यानं शिक्षक स्वखर्चानं मोबाईलच्या इंटरनेटवर विद्यार्थ्यांना शिकवतात, असं चित्र आहे.

सरपंच काय म्हणतात?

कसबा वाळवे आदर्श गाव म्हणून विकसित करण्यासाठी ग्रामपंचायतीनं 14 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव दिला होता.

त्यानुसार 2016 ते जुलै 2019च्या दरम्यान या गावात 5 ते 6 कोटी रुपयांची कामं पूर्ण झाल्याचं सरपंच अशोक फराक्टे यांनी सांगितलं.

Image copyright Swati Patil/bbc
प्रतिमा मथळा कसबा वाळवेचे सरपंच अशोक फराक्टे

ते म्हणाले, "मिळालेल्या निधीतून गावात सुसज्ज बाजारपेठ, विरंगुळा केंद्र, मुख्य रस्त्यांचं डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी टाकी, ई-लर्निंगची सुविधा अशी कामं पूर्ण करण्यात आली आहे."

गावकऱ्यांच्या तक्रारीविषयी ते म्हणाले, "गावात सांडपाण्याची व्यवस्था करायची आहे, पण ती निधीविना प्रलंबित आहे. निधी आला की, ऊर्वरित कामं करण्यात येतील."

आमदार आदर्श ग्राम योजना

केंद्र सरकारच्या 'सांसद आदर्श ग्राम योजने'च्या धर्तीवर राज्यात 'आमदार आदर्श ग्राम योजना' सुरू करण्यात आली. त्यासंबंधीचा शासन निर्णय 20 मे 2015ला जारी करण्यात आला.

प्रत्येक आमदारानं आपल्या मतदारसंघातील 3 ग्रामपंचायती निवडाव्यात आणि जुलै 2019पर्यंत त्या 'आदर्श ग्राम' म्हणून विकसित कराव्यात, असं या निर्णयात सांगण्यात आलं.

Image copyright www.maharashtra.gov.in
प्रतिमा मथळा 'आमदार आदर्श ग्राम योजने'चा शासन निर्णय

निवडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आमदार निधीतून केलेल्या आणि सरकारनं परवानगी दिलेल्या विकासकामांसाठी जोडनिधी देण्यात येईल, असं सांगण्यात आलं.

या योजनेअंतर्गत आदर्श गावाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे सांगण्यात आली -

  • केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा गावकऱ्यांना लाभ देणे.
  • गावात आरोग्य आणि स्वच्छतेच्या सवयी विकसित करणे.
  • गावातील सर्वांना किमान 10वी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शेती क्षेत्राचा दर्जा उंचावणे.
  • युवकांना कौशल्यवृद्धीचं प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • गावात सुसज्ज ग्रामपंचायत भवन, उत्तम दर्जाचे रस्ते, पूर्णवेळ वीज, इंटरनेट सुविधा इ. पायाभूत सुविधा विकसित करणे.
  • गावात घनकऱ्याचं व्यवस्थापन करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या शुद्ध पाण्याचा फेरवापर शेतीसाठी करण्यात यावा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)