भाजपचा जाहीरनामा: सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीसह 16 सूत्री 'संकल्पपत्र' प्रसिद्ध

फडणवीस Image copyright Twitter / @BJP4Maharashtra

भाजपनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपनं 16 सूत्री कार्यक्रम या निमित्तानं जनतेसमोर मांडला आहे.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याबरोबरच सर्व कामगारांची नोंदणी करून त्यांना सर्व योजनांचे लाभ देण्याचं आश्वासन भाजपनं दिलं आहे.

भाजपच्या संकल्प पत्रातील प्रमुख मुद्दे

 • दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार.
 • मराठवाडा वॉटर ग्रिडची स्थापना करणार.
 • दुष्काळी भागात पुढच्या पाच वर्षांत पाणी पोचवणार. उद्योग, शेतकरी यांना पाणी देणार.
 • प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचं पाणी देणार.
 • शेतीला 12 तास दिवसाची वीज देणार, सौर ऊर्जेवर आधारित ही वीज असेल.
 • 5 वर्षांत 1 कोटी नोकऱ्या देणार.
 • पायाभूत सुविधांसाठी 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक.
 • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 30 हजार किमीचे ग्रामीण रस्ते बांधणार.
 • रस्त्यांच्या देखभालीसाठी विशेष यंत्रणा राबवणार.
 • 2022 पर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक बेघराला घर देणार.
 • जनआरोग्य योजनांतून 90 टक्के लोकसंख्या आरोग्यसेवेच्या कवचाखाली आणणार. 90 टक्के जनतेला मोफत उपचार देणार.
 • उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारणार.
 • सर्व कामगारांची नोंदणी करून त्यांना सामाजिक सुरक्षेच्या योजना लागू करणार.
 • माजी सैनिक आणि शहिदांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याच्या योजना आणणार.
 • प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी कालबद्ध कार्यक्रम.
 • महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि सावरकरांच्या भारतरत्नासाठी पाठवुरावा करणार.
 • 2020 पर्यंत आंबेडकरांचं स्मारक पूर्ण करणार.

यावेळी भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा, सरचिटणीस आणि प्रभारी सरोजिनी पांडे उपस्थित होते.

भाजपच्या संकल्पनामा प्रकाशित करताना भाजपनं शीर्षकगीत सादर केलं. हे गीत कवी गुरू ठाकूर यांनी लिहिलं आहे आणि ते अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

काँग्रेसची टीका

भाजपचं संकल्पपत्र म्हणजे लबाडाघरचं आवताण आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

"गेल्या निवडणुकीच्या वेळी याच लोकांनी 45 लाख तरुणांना रोजगार देण्याचं वचन दिलं होतं. पण प्रत्यक्षात रोजगार मिळण्याऐवजी आहे त्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या. हे लोक वारंवार खोटं बोलतात आणि खोटी आश्वासनं देतात," असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड म्हणाले.

"भाजपने आता कोणतीही नवीन आश्वासनं देण्याऐवजी गेल्या वेळी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, ते सांगावं. कर्जमाफी झाली नाही, असं भाजपच्या मित्रपक्षाचे म्हणजे शिवसेनेचे नेतेच सांगतात. म्हणजे आश्वासनांची पूर्तता झाली नाही. मग नवीन आश्वासनांवर कोण विश्वास ठेवणार?" असंही गायकवाड म्हणाले.

Image copyright Facebook

भाजपच्या या संकल्पपत्राविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमत (पुणे)चे संपादक प्रशांत दीक्षित म्हणाले, "जाहीरनाम्यांचा खरोखर मतदारांवर किती परिणाम होतो, हा मोठा प्रश्न आहे. कारण सामान्य मतदार जाहीरनामा वाचून मतदान करत नाही. लोकांच्या मनात राजकीय पक्षांबद्दल काही प्रतिमा तयार झालेली असते. त्यावरच मतदान होतं.

"जाहीरनामा उपयुक्त तेव्हाच होईल जेव्हा अमेरिकन पद्धतीप्रमाणे उमेदवार समोरासमोर उभे राहतील आणि पत्रकार त्यांना ठणकावून प्रश्न विचारतील किंवा त्यांच्या जाहीरनाम्याची स्क्रुटीनी होईल. आपल्याकडे मुळातच जाहीरनाम्याची स्क्रूटिनी होत नाही. आताही पाच दिवस उरलेले असताना दावे करण्यात आलेले आहेत. पण लोकांना जे अनुभव येत असतात, जे जाणवतं, त्यानुसार ते मतदान करतात. दाव्यांची पडताळणी होत असेल, तरच जाहीरनाम्याची उपयुक्तता आहे. आपली निवडणूक ही बरीचशी भावनेवर होते. शिवाय जाहीरनाम्यातले सिंचन, दुष्काळ, रोजगार यासारखे मुद्दे जवळपास सारखेच असतात. फक्त पक्षानुसार त्यांचा प्राधान्यक्रम बदलतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)