राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून नाराज शिवसैनिकांना डिवचतायत का? - विधानसभा निवडणूक

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे Image copyright Getty Images

"पुण्यामध्ये शिवसेना नावाचं काही दिसतच नाही. भाजपवाले रोज शिवसेनेची इज्जत काढतायत," अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेत केली.

पुणे, नाशिक, नवी मुंबई अशा शहरी भागात युतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा आली नाही. त्यामुळं नाराज झालेल्या शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केलाय का, अशी चर्चा आता सुरू झालीय.

त्याचसोबत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज ठाकरे म्हणाले, "निवडणुकीआधी काय सूर लावला होता, आता यापुढे आम्ही एकहाती भगवा फडकवू. भाजपसोबतची इतकी वर्षं सडली. मग गाडी 124 वर का अडली? पुणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये एक जागा देत नाहीत? काय करून ठेवलंय... लाचार..."

"माननीय बाळासाहेब आज असते ना, कुणाची हिंमत नसती झाली शिवसेनेसोबत असं करायची. माझ्याबरोबर पण हिंमत नसती झाली," असं म्हणत अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वक्षमतेवर शंका घेतली आहे.

राज ठाकरेंच्या या वक्तव्यांचा नेमका अर्थ काय आणि ते यातून नेमकं काय साधू पाहतायत, याचा आढावा बीबीसी मराठीनं घेतला.

राज ठाकरेंचा शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न?

पुणे, नाशिक, नवी मुंबई येथील शहरी भागातील एकही जागा युतीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला आली नाहीय. नवी मुंबईसह काही शहरातील शिवसैनिकांनी जागावाटपानंतर जाहीर नाराजीही दर्शवली होती.

याच नाराजीचा फायदा राज ठाकरे घेऊ पाहतायत का, असा सहाजिक प्रश्न उपस्थित होतो.

"पुणे आणि शिवसेना यांचे जुने संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मच पुण्यातला आहे. एकेकाळी शिवसेनेची मुळं पुण्यात होती. काका वडके, रमेश बोडके असे जुने शिवसैनिक होते. अशी ताकद असतानाही शिवसेनेला जागा मिळाल्या नाहीत, त्यामुळे इथला शिवसैनिक प्रचंड नाराज आहे. शिवसैनिकांचा हा वर्ग राज ठाकरे आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतायत," असं वरिष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात.

Image copyright Getty Images

धवल कुलकर्णी यांचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनावरील 'द कझन्स ठाकरे' हे पुस्तकही नुकतेच प्रकाशित झालंय.

धवल कुलकर्णी पुढे सांगतात, "शिवसैनिकांमध्ये खरंच नाराजी आहे. उदाहरणच सांगायचं तर गोरेगावमध्ये शिवसैनिक विद्या ठाकूर यांना स्वेच्छेने मतं देणार आहेत का? वर्सोव्यातून राजुल पटेल उभ्या आहेत. कोण पाठिंबा देतंय?"

वरिष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर सांगतात, "शिवसेनेतील शिवसैनिकाला मनसेकडे ओढण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. ज्या शिवसैनिकांना युती नको होती, त्यांना पर्याय देण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. पण मतांमध्ये मोठा परिणाम होईल, असेही फारसं आता दिसत नाहीय."

उद्धव ठाकरे हे भाजपच्या मागे फरफटत जात असल्याची टीका काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतर विरोधकांनी गेल्या पाच वर्षात सातत्यानं केलीय. त्याच सुरात सूर मिळवून राज ठाकरे टीका करत असताना, त्याचा मनसेला फायदा होईल का किंवा शिवसैनिक मनसेकडे ओढले जातील का, हा प्रश्न उरतोच.

यावर बोलताना विनायक पात्रुडकर म्हणतात, "शिवसेना ज्याप्रकारे भाजपसोबत सत्तेत आहे, तो एक मुद्दा राज ठाकरेंना मिळालाय. तोच मुद्दा घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांनी टीका केलीय. मात्र राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरातील व्यक्ती आहेत. इतर विरोधकांनी टीका करणं आणि सख्ख्या चुलत भावाने टीका करणं, यात नक्कीच फरक आहे."

शिवसैनिकांना मनसे पर्याय वाटेल?

शिवसैनिक मनसेकडे पर्याय म्हणून पाहू शकतात का, हा प्रश्न उरतोच. त्यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात, "नाराज शिवसैनिकांसाठी मनसे हा सेकंड ऑप्शन ठरू शकतो. मनसेला विजयी करण्यापर्यंत परिणाम होईल की नाही, ते माहीत नाही. पण भाजपला पाडण्यासाठी तरी कारणीभूत ठरू शकतात."

अकोलकर पुढे सांगतात, "शिवसेना शहरी पक्ष आहे, मध्यमवर्गीयांचा पक्ष आहे. स्थानिक लोकाधिकार समिती, बँक कर्मचारी, विमान वाहतूक कर्मचारी इत्यादी अनेक प्रश्न शिवसेनेनं लावून धरलेत. अशा पक्षाला मुंबई वगळता चार महत्त्वाच्या शहरात जागा देत नसतील, तर बाळासाहेबांनी हे मान्यच केलं नसतं. त्यामुळं असंख्य शिवसैनिक नाराज झाले असतील. त्यामुळेच पुणे, नाशिक या शहरांमध्ये राज ठाकरेंनी लक्ष केंद्रित केलंय. भाजपच्या वागणुकीमुळं दुखावलेल्या शिवसैनिकांना भाजपपेक्षा राज ठाकरे जवळचेच वाटणार आहेत."

Image copyright Getty Images

"उद्धव ठाकरे यांचं नेतृत्त्व मवाळ आहे. बाळासाहेब ठाकरे ज्याप्रकारे आक्रमक वक्तव्य करायचे, तसं मी करतोय, हे राज ठाकरे सांगू पाहतायत. तशी आक्रमक प्रतिमा उद्धव ठाकरेंची नाही. यातून शिवसैनिकांमधील मनसैनिकाला आकर्षित करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी करताना दिसतात," असं विनायक पात्रुडकर सांगतात.

उद्धव ठाकरेंचं नेतृत्त्व कमकुवत झालंय?

राज ठाकरे हे अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर शंका उपस्थित करत असले, तरी त्यांनी खरंच शिवसेना सांभाळली असती का, याचा कानोसा घेण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला.

धवल कुलकर्णी सांगतात, "उद्धव ठाकरे नरम पडलेत, हे दाखवून शिवसेनेची मतं स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करतायत. मात्र सातत्य नावाचा गुण राज ठाकरेंकडे दिसत नाही."

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावरील राज ठाकरेंच्या टीकेकडे पाहताना राजकीय संदर्भ देतात.

अकोलकर सांगतात, "बाळासाहेब ठाकरे असते, तर शिवसेनेला झिडकारणं भाजपला शक्य नसतं. बाळासाहेब आता ठणठणीत प्रकृतीचे असते, तर अशा स्थितीत युती ठेवलीच नसती. इतका अपमान बाळासाहेबांनी सहनच केला नसता. उद्धव ठाकरेंनी युती ठेवली, कारण अनेक खासदार भाजपला अंगावर घेण्यास तयार नव्हते."

Image copyright Getty Images

"पक्ष फुटण्याच्या शक्यतेमुळे आणि फुटल्यास जे भाजपमध्ये जातील, त्यामुळं सत्तेशी आपला संबंध राहणार नाही, म्हणून मिळेल त्या जागांवर युती केली," असं सांगत राज ठाकरेंच्या दाव्यावर अकोलकर म्हणतात, "मी असतो तर काय झालं असतं, ही जर-तरची भाषा आहे. निवडणुकीच्या काळात असं बोलावं लागतं."

विनायक पात्रुडकर म्हणतात, "शिवसेना स्वतंत्र लढली असती तर फूट पडली असती. त्यामुळं तडजोड स्वीकारावी लागली. त्या तडजोडीमुळं काही टीका सहन करावी लागणारच आहे. मात्र पुढची राजकीय गणितं लक्षात घेता, देशाचं राजकारण लक्षात घेता, ही तडजोड उद्धव ठाकरेंनी स्वीकारली आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांनाही ही तडजोड हवीच होती."

राज ठाकरेंनी भाजपला जुमानलं नसतं का?

शिवसेनेत असतो, तर माझ्याबरोबर भाजपने अशी हिंमत केली नसती, असं म्हणत राज ठाकरेंनी आपलं नेतृत्त्व सक्षम असल्याचा दावा केलाय. मात्र, राज ठाकरे शिवसेनेत असते, तर खरंच कणखरपणा दाखवला असता का, हा प्रश्न उपस्थित होतो.

त्यावर बोलताना प्रकाश अकोलकर म्हणतात, "'मी असतो तर काय झालं असतं', ही जर-तरची भाषा आहे. निवडणुकीच्या काळात असं बोलावं लागतं."

तर विनायक पात्रुडकर म्हणतात, "राज ठाकरेंच्या मनात एक शिवसैनिक आहे. शिवसेना अशी पाहिजे, ही एक कल्पना राज ठाकरेंच्या मनात आहे. हा पक्ष आक्रमक राहिला पाहिजे, यातून त्यांनी टीका केलीय."

शिवाय, या टीकेतून राज ठाकरे राजकीय फायदा उठवण्याचाही प्रयत्न करत असल्याचं पात्रुडकर सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)