राणे या प्रवृत्तीशी शिवसैनिक तडजोड करणार नाहीत - सुभाष देसाई | विधानसभा निवडणूक

सुभाष देसाई

"राणे या प्रवृत्तीला शिवसेनेचा विरोध आहे. कुणीही शिवसैनिक त्यांच्याशी तडजोड करायला तयार नाही. आम्ही भाजपलाही कणकवलीत अन्य कुणीही उमेदवार द्यावा, असं सांगितलं होतं. पण तिथे जर राणे असतील तर शिवसेना तडजोड करणार नाही," असं वक्तव्य राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी बीबीसी मराठीच्या मुलाखतीत केलं.

मात्र या मुलाखतीच्या 24 तासातच नारायण राणेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी कणकवलीमध्ये झालेल्या एका सभेत त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलीन केला.

बीबीसी मराठीच्या प्राजक्ता पोळ यांच्याशी बोलताना सुभाष देसाई यांनी राणे, भाजप, शिवसेनेचं 'दहा रुपयात थाळी' आणि एका रुपयात आरोग्य सेवेसारखी आश्वासनं, यांबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्टपणे मांडली.

पाहा संपूर्ण मुलाखत -

निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांपेक्षा शिवसेना आणि भाजपमध्येच चुरस पाहायला मिळतेय?

अशी चुरस असेल तर काय हरकत आहे? निरोगी स्पर्धेला काहीच हरकत नाही. उलट आता इतर पक्षांना जागा उरलेली नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त दोनच पक्ष महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सर्व राजकीय विश्व व्यापून टाकलेलं आहे, हा त्याचा अर्थ आहे.

कणकवलीमध्येही अशी निरोगी स्पर्धा होतेय का?

कणकवली हा अपवाद झालेला आहे. इतर कुठेही असं झालेलं नाही, कारण राणे या प्रवृत्तीला शिवसेनेचा विरोध आहे. कुणीही शिवसैनिक त्यांच्याशी तडजोड करायला तयार नाही. आम्ही भाजपलाही कणकवलीत अन्य कुणीही उमेदवार द्यावा, असं सांगितलं होतं. पण तिथे जर राणे असतील तर शिवसेना तडजोड करणार नाही.

आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत. आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, असं नीतेश राणे यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे...

ते त्यांचं दिवास्वप्न आहे. पण ते स्वप्न कधीच साकार होणार नाही. कारण त्यासाठी निवडून यावं लागेल. आणि ते निवडून येण्याची सूतराम शक्यता नाही.

त्यांनी शिवसेनेला स्वीकारलेलं दिसतंय. शिवसेनासुद्धा राणे कुटुंबीयांना स्वीकारणार का?

नाहीच. नाहीतर आम्ही त्यांच्याविरोधात लढायला का उभे राहिलो असतो? भाजपचे उमेदवार आहेत म्हणून सोडून दिली असती जागा. पण नाही होणार तसं. आणि त्याची पूर्वकल्पना भारतीय जनता पक्षाला दिलेली होती.

यापुढे राणे कुटुंबीयांनी शिवसेनेबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना तयार होणार नाही का?

भविष्यातलं मी आता सांगू शकत नाही. पण आत्ता या निवडणुकीत नक्कीच नाही. यावेळेस तिथले उमेदवार सतीश सावंत यशस्वी होतील. शिवसैनिक भावनेने या विषयाशी इतके निगडित आहेत की ते कोणतीही तडजोड करणार नाहीत.

मुख्यमंत्री कणकवलीत प्रचारासाठी जाणार आहेत. ते शिवसेनेच्या विरोधातल्या उमेदवाराचा प्रचार करतील?

288 जागांपैकी एखादी जागा अशी असू शकते. त्यांच्या तत्त्वानं ते जातायंत. आमच्या तत्त्वांनी आम्ही जातोय. शिवसेनेच्या उमेदवाराच्या बाजूने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे प्रचार करतीलच. स्वच्छ भूमिका आहे ही. त्यामध्ये कुठलीही गोष्ट आम्ही लपवून ठेवलेली नाही.

उद्या त्यांनी म्हटलं की आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही. तरीसुद्धा तुमची हीच भूमिका असेल का?

मुळात हा वाद भाजपशी नाहीच. मुख्यमंत्र्यांशी नाहीच. हा वाद त्या प्रवृत्तीशी आहे.

शिवसेनेच्या वचननाम्यातील दहा रुपयातील थाळी आणि एक रुपयात आरोग्य सेवा सेना कसं देणार?

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी हे जाहीर करण्यापूर्वी अनेक लोकांशी चर्चा केलेली आहे. किती खर्चाचा बोजा पडेल, आपल्या तिजोरीला झेपेल का, या सगळ्याचा विचार करून हे आश्वासन दिलेलं आहे.

Image copyright Twitter

2-3 चपात्या, 2-3 भाज्या आणि भात अशा चौरस आहार असलेल्या थाळीचा खर्च 40 रुपये येतो. यातले 10 रुपये ग्राहकानं द्यायचे आहेत आणि 30 रुपये अनुदान सरकार देईल. आम्ही 10 लाख लोकांना दररोज ही सेवा द्यायचं ठरवलं तर त्याचा शासनावर 3 कोटी रुपये रोजचा खर्च येईल. म्हणजेच 1,000 कोटी रुपये वर्षाला होतात.

महाराष्ट्रात कुणी अर्धपोटी, उपाशीपोटी झोपू नये म्हणून वर्षाकाठी 1,000 कोटी रुपये खर्च करणे ही काही फार मोठी गोष्ट नाही. हे राज्याला शक्य आहे. आणि ते करायला हवं.

मग त्यासाठी करवाढ करावी लागेल का?

नाही. उत्पन्न वाढत असतं. नव्या नव्या योजनांपेक्षा अन्न, वस्त्र, निवारा यांना प्राधान्य द्यावं. त्यामुळे या प्रश्नाला प्रथम हात घातलेला आहे.

पण ही योजना आखताना तुम्ही मित्रपक्ष भाजपशी चर्चा केली नव्हती का? कारण त्यांनी पाच रुपयात अटल आहार योजना आणलेली आहे...

त्याबद्दल तुम्ही त्यांना विचारा. आम्ही जे केलेलं आहे त्याचं वर्किंग एकदम करेक्ट आहे. आम्ही दोन्ही पक्ष जेव्हा एकत्र येऊन बसू तेव्हा यातून मार्ग नक्की काढू.

झुणका भाकरसारख्या योजना ऐनवेळी आणून शिवसेना मोक्याच्या जागा लाटण्याचा प्रयत्न करते, अशी टीका शरद पवारांनी केली आहे...

हा बिनबुडाचा आरोप आहे, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं, असं बोलावं हे मला बरोबर वाटत नाही.

शिवसेनेला सरकार चालवायचंय की स्वयंपाक करायचाय असंही पवार म्हणालेत. सरकारचं काम महागाईवर नियंत्रण ठेवणं हे आहे, जेवण देणं हे नाही. असं ते म्हणतात...

पंधरा वर्षं त्यांनी सरकार चालवलं. ते करताना त्यांना जनतेचा पैसा हडप करणं हे महत्त्वाचं काम असेल कदाचित. त्यांचे मंत्री आमदार तुरुंगात गेले. बँका बुडवल्यात त्यांनी. सहकारी बँकांमध्ये घोटाळे केले त्यांचे प्रमुख राष्ट्रवादीचेच नेते होते. किती नावं घ्यायची.

पीएमसी आता उघडकीस आलंय. पण त्यापूर्वी राज्य सहकारी बँकेची चौकशी सुरू आहेच. त्यातही त्यांचेच लोकं आहेत. पेण अर्बन बँक, गोरेगाव अर्बन बँक, उस्मानाबाद बँकेचा घोटाळा उघडकीस आला. या सगळ्याचे प्रमुख त्यांचीच लोक होती.

सरकार चालवणं म्हणजे घोटाळे करणं ही त्यांची संकल्पना आहे. त्यापेक्षा कुणीतरी काहीतरी वेगळं करतंय. आणि आम्ही स्वयंपाक करणार नाही. आम्ही नियोजन करणार.

शिवसेनेनं शिववडापाव सुरू केलाय त्याची किंमत आधी दहा रुपये करावी, तेसुद्धा 20-25 रुपयाला मिळतात, असं मनसेनं म्हटलं आहे...

शिववडापाव ही सरकारी योजना नाही. ही विक्रेत्यांची योजना आहे. विक्रेत्यांना परवडतं त्या दरात ते विक्री करतात आणि ज्यांना परवडतं ते तो घेतात.

पण या मंडळींना टीका करण्याखेरीज काही काम नाही, उद्योग नाही कारण त्यांच्यावर काही जबाबदारी नाही. ती आमच्यावर आहे.

आरेची वृक्षतोड थांबवण्याचा कुठलाही मुद्दा तुमच्या वचननाम्यात नाही...

त्याच्यापलीकडे तो विषय गेलेला आहे. आदित्य ठाकरेंनी सांगितलं, की आम्ही आरेला जंगल जाहीर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे ही आमची शिवसेनेची भूमिका आहे.

Image copyright Radhika jhaveri
प्रतिमा मथळा आरे आंदोलन

या प्रकरणी हजारो लोकांना मारहाण झाली. परंतु तेव्हा कुणीही रस्त्यावर उतरलेलं दिसलं नाही. शिवसेनेचे नेतेही तिथे गेले नाहीत. फक्त ट्वीट केलं गेलं.

आम्ही या विषयाच्या बाजूनं मनापासून आहोत. त्यांना गुपचूप ही कारवाई करायची होती म्हणून ती रात्रीच्या अंधारात केली. हा विषय इथेच संपलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात तो सुरू आहे. न्यायपालिकेचा आदर आपण ठेवला पाहिजे. पण शासन वन या संज्ञेअंतर्गत तो भाग आणू शकतं.

हक्काच्या, न्यायाच्या प्रश्नात शिवसेना जनतेच्या बरोबर राहातेच. आम्ही या सरकारला पाच वर्षं सहकार्य केलं. कुठेही अडवलं नाही. म्हणून तर ते सुरळीत चाललं. या चांगल्या कामात शिवसेनेचा वाटा आहेच.

बाळासाहेब असते तर त्यांनी अनेक भ्रष्ट नेत्यांना पक्षात प्रवेश नाकारला असता असं राज ठाकरे म्हणाले...

आम्ही कुठल्याही भ्रष्टाचारी माणसाला प्रवेश दिलेला नाही. आओ जाओ घर तुम्हारा हे शिवसेनेचं धोरण नाही. आम्ही डाग नसलेल्या मोजक्याच नेत्यांना घेतलेलं आहे. या वारेमाप आरोपांसाठी किती वेळ घालवायचा.

शिवसेना सरकारमध्ये राहूनही सरकारविरोधी टीका करताना दिसते...

आम्ही जनतेच्या बाजूनं उभं राहिलो. जिथे जिथे जनतेवर अन्याय होताना दिसत होतं तिथं आम्ही सरकारच्या निर्णयांविरोधात उभं राहिलो.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा उद्धव ठाकरे

विरोधी पक्षाला आवाज राहिलेला नाही अशी परिस्थिती असताना जनतेच्या बाजूनं कोण उभं राहणार. शिवसेनेनं ती भूमिका घेतली. मग तो नाणार प्रश्न असो, मेसमा कायदा असो. याविरोधात शिवसेनेने विधानसभेत तो आवाज उठवला. आम्ही पाचशे फुटांपर्यंतच्या घरांवरचा करही माफ करून घेतला. हे चांगले निर्णय जनतेच्या हिताचे झाले.

ही आमची कायम भूमिका राहणार. सरकारमध्ये आहे म्हणून दुर्लक्ष करायचं हे आम्ही करणार नाही.

सत्तेत राहूनही शिवसेनेला आंदोलनं करावी लागली. त्यांना रस्त्यावर का उतरावं लागलं?

फक्त सरकारनं निर्णय घ्यायचे आणि विरोधी पक्षांनी विरोध करायचा. हा हा पूर्वीचा पॅटर्न झाला. आमची जनतेशी बांधिलकी आहे. जेव्हा जनतेचा आवाज उठवायची गरज भासेल तेव्हा ते करायचं.

आताचे विरोधी पक्ष कमजोर पडतायंत. त्यावेळेला शिवसेनेनं जबाबदारी घेतली. तर त्याचं स्वागत झालं पाहिजे.

अशी आमची भूमिका माहीत असूनही भाजपने आमच्याबरोबर युती केलेलीच आहे.

(शब्दांकन: श्रद्धा दामले)

हेही वाचलंत का?

पाहा संपूर्ण मुलाखत -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)