राज ठाकरे वि. उद्धव ठाकरे: शिवसेनेच्या नेतृत्वासाठीचा संघर्ष आणि मनसेचा जन्माची गोष्ट

पाहा व्हीडिओ -

ठाकरे घराणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात गेल्या जवळपास शंभर वर्षांपासून सक्रीय असलेलं एक घराणं. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीला समांतर असा या घराण्याचा प्रवास आहे.

याच ठाकरे घराण्यातल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन व्यक्तिरेखांमधल्या मतभेदांनी गेल्या दीड-दोन दशकांत राज्याच्या राजकारणाला वेगळा रंग दिला. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं नेतृत्त्व उद्धव यांच्याकडे आलं आणि राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपानं आपली वेगळी चूल मांडली.

या दोन ठाकरेंमधल्या संघर्षावर भाष्य करणारं पुस्तक पत्रकार धवल कुलकर्णी यांनी लिहिलं आहे. 'द कझिन्स टाकरे' या इंग्रजीतील पुस्तकाचा 'ठाकरे विरुद्ध ठाकरे' हा अनुवाद, आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित होतो आहे.

त्यानिमित्तानं दोन्ही नेते आणि त्यांच्या दोन वेगळ्या सेनांचा प्रवास याविषयी धवल कुलकर्णी यांच्याशी बीबीसीनं संवाद साधला.

राज आणि उद्धवच्या राजकारणाची सुरुवात कधी झाली?

उद्धव आणि राज हे दोघं चुलतभाऊ मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी विद्यार्थी. दोघांनीही जाहिरात एजन्सी काढून व्यवसायाची सुरुवात केली होती. पण त्यादरम्यानच त्यांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात झाली.

1988 साली राज ठाकरे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले, त्यामागचा किस्सा मनोरंजक आहे. सेनेच्या एका नेत्यानं तो सांगितल्याचं धवल सांगतात.

"राज ठाकरे हे बाळासाहेबांसोबत राहिले होते, त्यांच्या लकबी त्यांनी आत्मसात केल्या होत्या. त्यामुळं राज ठाकरेंभोवती तेव्हाही एक वलय होतं. पुणे विद्यापीठच्या निवडणुकीच्या वेळेस राज ठाकरे तिथे गेले होते आणि 'बाळासाहेबांचा पुतण्या' या एका आधारावर भारतीय विद्यार्थी सेना निवडून आली. अमरावती विद्यापीठाच्या निवडणुकीतही तेच झालं."

Image copyright Getty Images

"मातोश्रीवर तेव्हा दोन मोठी ग्रेट डेन कुत्री होती. त्यांना असंच सोडून दिलेलं असायचं. विद्यार्थी सेनेचे नेते जेव्हा बाळासाहेबांकडे संघटनेसाठी कुठली मदत मागायला जायचे तेव्हा त्यांना या कुत्र्यांची खूप भीती वाटायची. मग ते मातोश्रीवर जाण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलायचे. मग असा एक विचार आला की आपण राजलाच अध्यक्ष करू. म्हणजे बाळासाहेबांसोबत संपर्क साधणं सोपं होईल. त्यातून राज ठाकरे अध्यक्ष झाले.

उद्धव यांच्या राजकीय प्रवेशाविषयी धवल सांगतात, की 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राच्या स्थापनेत सुभाष देसाई आणि उद्धव यांचा महत्त्वाचा सहभाग होता. "1990च्या एप्रिल महिन्यात उद्धव हे शिशिर शिंदेंच्या शाखेवर गेले होते. तो त्यांचा राजकीय प्रवेश मानला जातो."

राज आणि उद्धवमधला वाद कधी सुरू झाला?

"सर्वसामान्यपणे असं मानलं जातं की, 1996 साली रमेश किणी हत्या प्रकरण झालं, त्यानंतर राज ठाकरे बॅकफूटवर गेले. त्याच काळात उद्धव राजकारणात आले आणि वाद सुरू झाला. पण राज आणि उद्धवमधल्या वादाची पाळंमुळं 1980च्या दशकाच्या अखेरीस आणि 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात दडलेली आहेत," असं धवल सांगतात.

"राज ठाकरे थोडे तडकफडक होते आणि काहीजणांना तो त्यांचा उर्मटपणा वाटायचा. बाळासाहेबांसोबत राजकारणात आलेली पिढी वार्धक्याकडे झुकायला लागली होती आणि राज ठाकरेंसोबत युवक सक्रीय झाले होते. हा दोन पिढ्यांमधला संघर्ष होता."

Image copyright ठाकरे विरुद्ध ठाकरे

1991 साली सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना राज यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि तिथेच राज आणि उद्धवमधल्या वादाची ठिणगी पडल्याचं धवल सांगतात.

"राज यांनी बेरोजगार युवकांच्या मुद्द्यावरून राज्याचा दौरा केला होता. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा निघणार होता. मोर्चाच्या आदल्या दिवशी रात्री राज ठाकरेंना फोन आला, की उद्या तुझ्यासोबत 'दादू'सुद्धा भाषण करेल. तेव्हा राज ठाकरे प्रचंड विचलित झाले की कष्ट मी घेतोय, मग श्रेयाचा वाटा उद्धवला का?"

1996 साली रमेश किणी हत्याप्रकरणातील आरोपी राज यांचे मित्र असल्याचं समोर आलं. पुढे CBIने ती आत्महत्त्या असल्याचं तपासाअंती म्हटलं. पण त्या आरोपांमुळे राज शिवसेनेत काहीसे मागे पडले, असं धवल सांगतात.

उद्धव शिवसेनेचे कार्याध्यक्ष कसे बनले?

राज-उद्धव वाद विकोपाला गेला होता. पण तरीही महाबळेश्वरच्या अधिवेशनात राज यांनी पक्षाच्या नेतृत्त्वासाठी उद्धवचं नाव कसं सुचवलं?

Image copyright Getty Images

धवल सांगतात, "1990 साली शिवसेनेनं पक्षाची घटना लिहिली, ज्यात सर्वाधिकार शिवसेनाप्रमुखांना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना देण्यात आले होते. 1997 साली तेव्हाचे निवडणूक आयुक्त MS गिल यांनी त्याला आक्षेप घेतला आणि तुम्ही पक्षांतर्गत निवडणुका घ्यायला हव्यात, असं म्हटलं."

हा वाद चांगलाच विकोपाला गेला आणि गिल यांनी पक्ष म्हणून शिवसेनेची मान्यता रद्द करावी लागेल, असा इशारा दिला.

"तेव्हा चाकं फिरायला लागली आणि आता शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचा हक्क अबाधित ठेवून कार्यकारी प्रमुख नेमायचं ठरलं. तेव्हा उद्धवचं नाव समोर आलं. मी याविषयी अनेकांशी बोललो आहे. अनेक वर्षं राज ठाकरेंना मनवण्याचा प्रयत्न सुरु होता, आणि शेवटी राजनीच उद्धव यांना कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव मांडला. बाळासाहेबांनी पुढे हे राजना बोलूनही दाखवलं अनेकदा, की मी त्याला कार्याध्यक्ष केलं नव्हतं, तूच ठराव मांडला होतास."

राज ठाकरे, महात्मा गांधी आणि आक्रमक मनसे

राज ठाकरे हे महात्मा गांधींमुळे प्रभावित झाले होते असा उल्लेख धवल यांनी या पुस्तकात केला आहे. मग तरीही त्याच राज ठाकरेंची मनसे आक्रमक आणि प्रसंगी हिंसक भूमिका का घेताना दिसते, असा प्रश्न पडतो.

Image copyright Getty Images

त्याविषयी धवल सांगतात, "ठाकरे, शिवसेना, मनसे यांच्या राजकारणात प्रचंड अंतर्विरोध आहे. ज्याला आपण इंग्रजीत contradiction (विरोधाभास) म्हणतो. ही वस्तुस्थिती आहे की राज ठाकरे यांच्यावर महात्मा गांधींचा प्रभाव आहे आणि असं म्हणतात की महात्मा गांधींवरचं असं एकही महत्त्वाचं पुस्तक नसेल जे राज ठाकरेंकडे नाही.

"जेव्हा राज ठाकरे विद्यार्थीदशेत होते, तेव्हा त्यांनी रिचर्ड अॅटनबरोंचा 'गांधी' हा चित्रपट दीडशेवेळा पाहिला होता, कारण ते चित्रपटांचे चाहते आहेत. त्याच राज ठाकरेंच्या मनसेनं उत्तर भारतीयांवर हल्ले केले, तोडफोड केली, ज्याला ते 'खळ्ळ फट्याक' म्हणतात."

"नाझींचे स्टॉर्म ट्रूपर होते, त्याच धर्तीवर तसं एक मनसेचं दल करायचाही विचार होता. पण त्यामुळं नकारात्मक चित्र निर्माण होईल, असं लक्षात आल्यानं ते रद्द करण्यात आलं," असा दावा धवल यांनी केला आहे.

राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतील का?

राज आणि उद्धवमधले मतभेद टोकाचे असले तरी त्यांच्यात एक जिव्हाळ्याचं नातं असल्याचं चित्रही वारंवार दिसलं आहे. उद्धव ठाकरेंची तब्येत बिघडली तेव्हा राज त्यांना भेटायला गेले होते, तर राज यांची EDकडून चौकशी होत असताना, उद्धव यांनी त्यांची पाठराखण केल्याचं दिसलं.

"काही गोष्टी लोकांना दाखवण्यासाठी केल्या जातात. जिव्हाळा अर्थातच असेल कारण ते दोघं भाऊ आहेत. पण शेवटी भाजपच्या नेत्यानं मला सांगितलेलं, जिथे राजकीय मतभेद असतात तिथे कदाचित दोन व्यक्ती किंवा पक्ष एकत्र येऊ शकतात. पण जिथे दोघांच्या संबंधांमध्ये घृणा, तिरस्कार, मत्सर असतो, तेव्हा या प्रक्रियेत कुठेतरी बाधा येते."

Image copyright Getty Images

राज आणि उद्धवमधले राजकीय मतभेद आणि मनभेद असले तरी शिवसेना आणि मनसेमधल्या अनेक समर्थकांना दोघं भाऊ आणि त्यांचे पक्ष एकत्र येतील, अशी आशा वाटते. पण धवल यांना सध्या तरी असं होताना दिसत नाही.

"शिवसेना आणि मनसे या दोन वेगळ्या संघटना आहेत. त्यांचं एकत्रीकरण हे दोन्ही पक्षांना राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरू शकतं आणि ते तितकंसं सोपं नाहीये."

आदित्य आणि अमित ठाकरेंच्या पिढीचं राजकारण

उद्धव यांचे पुत्र आणि शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यंदा विधानसभेसाठी रिंगणात उतरले असून वरळीतून निवडणूक लढवत आहेत. त्या निमित्तानं निवडणूक न लढवण्याचा ठाकरे घराण्याचा आजवरचा प्रघात त्यांनी मोडला आहे. राज यांचे पुत्र अमित ठाकरेही मनसेच्या प्रचारात सहभाग घेताना दिसतायत. त्यानिमित्तानं ठाकरे घराण्याची चौथी पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे.

1920च्या दशकापासून प्रबोधनकार ठाकरेंनी जातीय वर्चस्व आणि भोंदूगिरीविरुद्ध भूमिका घेतली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. मग बाळासाहेब ठाकरेंनी आधी मुंबईतील मराठी भाषिक आणि मग हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवरून राजकारण केलं. उद्धव आणि राज यांच्यात फूट पडली, तरी हेच मुद्दे त्यांच्या राजकारणच्या केंद्रस्थानी होते. आता आदित्य आणि अमित यांच्या काळातलं राजकारण कसं असेल, याविषयी आम्ही धवल यांना विचारलं.

Image copyright facebook

"काश्मीरमधलं शेख अब्दुल्लांचं कुटुंब, उत्तर भारतातलं मुलायमसिंग यादव कुटुंब किंवा तामिळनाडूतील करुणानिधींचं कुटुंब यांपेक्षा ठाकरेंचं वेगळेपण असं की राजकारणात असूनही ते थेट निवडणुकीच्या राजकारणात कधीही नव्हते. आदित्य थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले, तरी प्रमुख स्पर्धक किंवा मुख्य शत्रू म्हणून त्यांच्यासमोर भाजपच आहे."

शिवसेना आणि मनसेच्या बदलत्या भूमिका

शिवसेना आणि भाजप यांची युती असली तरी त्यांच्यातली अंतर्गत चढाओढ लपून राहिलेली नाही. तर मनसेनं या दोन्ही पक्षांविरोधात कधी आंदोलन करताना दिसते तर कधी ते आंदोलन थंड पडल्याचं चित्र दिसतं.

त्याविषयी धवल सांगतात, "सातत्य हा मोठा गुण आहे आणि तो या दोन्ही पक्षांमध्ये दिसत नाही. म्हणजे शिवसेना एकीकडे विरोधी बाकांवर बसते मग सरकारमध्ये जाते आणि सरकारमध्ये जाऊनही सतत भाजप आणि मोदींवर टीका करते, स्वबळावर निवडणूक लढवू असं सांगतात आणि लोकसभेसाठी पुन्हा एकत्र येतात."

"तसंच राज ठाकरेंचं आहे. राज यांनी काही चांगल्या गोष्टींची सुरुवात केली होती. महापालिकेच्या निवडणुकीआधी त्यांनी उमेदवारांसाठी परीक्षा ठेवली होती. हेतू असा की उमेदवारांना काही मूलभूत गोष्टी माहिती असायला हव्यात. पण तो विषयही पुढे बारगळला. सातत्य हा गुण दोन्ही पक्षांत थोडा अभावानं आढळतो.

"आता यापुढच्या काळात शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसमोर प्रमुख स्पर्धक म्हणून भाजप समोर आहे. सध्याच्या मराठी तरुण नवमतदारांना भाषेचा किंवा भाषिक ओळख हा मुद्दा तेवढा भेडसावत नाहीत. त्यांचं प्राधान्य वेगळ्या गोष्टींना असतं आणि हा वर्ग सध्य भाजपकडे चालला आहे. त्यांना स्वतःकडे खेचून घेणं आणि आपला मूळ मतदार आपल्यापासून भरकटू न देणं ही दोन मोठी आव्हानं मला या दोन पक्षांसमोर दिसतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)