तेजस एक्सप्रेस: ‘रेल्वे होस्टेस’ना असा होतोय प्रवाशांच्या सेल्फींचा त्रास

  • पूनम कौशल
  • बीबीसी हिंदीसाठी
तेजस एक्स्प्रेसच्या ‘होस्टेस’

फोटो स्रोत, POONAM KAUSHAL/BBC

"विमानसफरीसारख्या सोयीसविधा देणारी" भारतातली पहिली 'खासगी' ट्रेन अर्थात तेजस एक्सप्रेस ही नवी दिल्ली ते लखनौदरम्यान धावू लागली आहे.

भारतीय रेल्वेचीच कंपनी असणाऱ्या IRCTCकडे या तेजस एक्स्प्रेसची सूत्रं आहे. IRCTCने तेजस गाडी रेल्वेकडून भाड्यावर घेतली असून ती व्यावसायिकरीत्या चालवली जात आहे.

नवी दिल्ली ते लखनौ हे 511 किमीचं अंतर साडेसहा तासांत कापणाऱ्या या तेजस एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदाच 'रेल होस्टेस'ही आहेत. भारतात पहिल्यांदाच एखाद्या रेल्वेगाडीत अशा प्रकारे होस्टेस नेमण्यात आल्याने प्रवाशांमध्ये त्यांच्याबद्दल कुतूहल आणि आकर्षण आहे. त्या प्रवाशांचा खाणंपिणं पुरवण्यासोबतच इतर मदतही करतात आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतात.

पण ही गाडी धावू लागल्यापासून या काळ्या-पिवळ्या युनिफॉर्ममधल्या रेल होस्टेसना वेगळ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतंय.

या गाडीतून प्रवास करणारे लोक अनेकदा त्यांच्यासोबत सेल्फीची मागणी करतात. कधी कधी तर त्यांना न विचारता त्यांचे फोटो वा व्हीडिओ काढतात.

नव्या नोकरीचा उत्साह

लखनौची श्वेता सिंह या नव्या नोकरीबद्दल अतिशय उत्साहात आहे.

हसऱ्या चेहऱ्याने ती सांगते, "देशातल्या पहिल्या खासगी ट्रेनमध्ये - तेजसमध्ये काम करत असल्याचा मला अभिमान आहे. ट्रेनमध्ये होस्टेस असणाऱ्या पहिल्या महिलांपैकी मी एक आहे. मी माझं स्वप्नच जगतेय."

"रोज आम्ही नवीन प्रवाशांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो. चांगलं वाटतं. रोज वेगळ्या प्रकारची माणसं भेटतात आणि त्यांना समाधानकारक सेवा देणं हे सर्वात मोठं आव्हान असतं."

फोटो स्रोत, POONAM KAUSHAL/BBC

तेजस एक्स्प्रेसच्या 10 डब्यांमध्ये श्वेतासारख्या 20 जणींची 'कोच क्रू' म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सगळ्या जणींनी लखनौच्या एका इन्स्टिट्यूटमधून एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी आणि कस्टमर सर्व्हिसचा डिप्लोमा केलेला आहे.

या सगळ्या जणी IRCTCच्या कर्मचारी नसून एका खासगी कंपनीच्या कर्मचारी आहेत, ज्यांची सेवा या एक्स्प्रेससाठी घेण्यात आली आहे.

तीन टप्प्यांच्या प्रक्रियेमधून निवड झालेली वैशाली जयस्वाल हिने एअर होस्टेस होण्याची तयारी केली होती. आपलं कामही एअर होस्टेससारखंच असल्याचं ती सांगते.

"विमानात केबिन क्रू जे काम करतो, तीच कामं आम्ही करतो. फरक इतकाच की एअर होस्टेस हवेत काम करतात, आम्ही रेल्वेच्या ट्रॅकवर. आम्ही धावत्या गाडीत काम करतो आणि अनेकदा यात वेगळ्याच अडचणी येतात. आम्हाला या अडचणींना तोंड देण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे."

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

भरधाव जाणाऱ्या या ट्रेनमध्ये डुगडुगणारी सर्व्हिस ट्रॉली घट्ट धरून अंशिका गुप्ता आत्मविश्वासाने काम करते. आतापर्यंत भारतीय रेल्वेमध्ये ही कामं पुरुष करत होते.

अंशिका म्हणते, "आम्ही अजूनही शिकतोय. पहिल्यांदाच भारतामध्ये आमच्यासारख्या मुली ट्रेनमध्ये सेवा देतायत. हा अनुभव आम्हाला पुढे उपयोगी पडेल."

विशीच्या आसपासच्या या सगळ्या होस्टेस मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत.

कोच क्रू म्हणून काम करणाऱ्या लखनौच्या संध्या सिंह यादवचे वडील रिक्षा चालवतात. इथपर्यंतचा संध्याचा प्रवास सोपा नव्हता.

ती म्हणते, "माझ्या वडिलांनी मला पूर्ण साथ दिली. मला जे हवं ते करू दिलं. पण लोकांनी खूप टोमणे मारले. मी होस्टेस व्हायचं ठरवलं तेव्हा हे मुलींचं काम नाही, असं अनेकांनी माझ्या वडिलांना सांगितलं. मुलीकडून कोणत्यातरी सुरक्षित सरकारी नोकरीची तयारी करून घ्या, असे सल्ले त्यांना देण्यात आले."

तेजसमधल्या क्रू मॅनेजर असलेल्या शुभांगी श्रीवास्तवचाही अनुभव असाच आहे. त्यांच्यासोबत दोन कॅप्टन्स आणि एक सहायक मॅनेजर आहेत.

हे सगळे मिळून संपूर्ण ट्रेनची व्यवस्था आणि टीम सांभाळतात. सध्या या गाडीत पुरुष कर्मचारी असले तरी पुढच्या काही काळात ट्रेनचा सगळा कारभार महिलांच्या हाती सोपण्याची योजना असल्याचं शुभांगी सांगते.

फोटो स्रोत, POONAM KAUSHAL/BBC

महिलांची सोय

या गाडीने प्रवास करणं महिलांसाठी सोपं करण्यावर या टीमचा भर असल्याचं शुभांगी सांगते.

"गाडीत महिला कर्मचारी असणं महिला प्रवाशांसाठी दिलासादायक असतं. एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना आमच्या असण्याने अधिक सुरक्षित वाटतं."

या गाडीमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स आणि महिलांसाठी आवश्यक इतर गोष्टी उपलब्ध आहेत. गर्भवती महिलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना या क्रूला देण्यात आल्या आहेत.

शुभांगी म्हणते, "अनेकदा महिलांची पाळी अचानक सुरू होते. त्यांच्याकडे सॅनिटरी पॅड्स नसतात. आमच्याकडे हे पॅड्स उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत या महिला होस्टेससोबत मोकळेपणाने बोलू शकतात. लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांचीही आम्ही विशेष काळजी घेतो. या मुलांना आम्ही मांडीवरही घेतो"

फोटो स्रोत, POONAM KAUSHAL/BBC

युनिफॉर्मवरून वाद

चार ऑक्टोबरला या तेजस एक्स्प्रेसचं उद्घाटन झाल्यानंतर मीडिया आणि सोशल मीडियात याची चर्चा झाली. घट्ट युनिफॉर्म घातलेल्या होस्टेस पहिल्या प्रवाशांवर फुलं उधळतानाचा फोटो प्रसिद्ध झाला आणि सोशल मीडियावर अनेकांनी याविषयी प्रश्न विचारले.

या होस्टेसनी साडी परिधान करावी, असं अनेकांनी रेल्वे मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत ट्वीट केलं.

भारतीय रेल्वेमध्ये काम करणाऱ्या या होस्टेसनी वेस्टर्न रीतीने स्कर्ट घालण्याऐवजी भारतीय संस्कृतीचं प्रतीक मानला जाणारी साडी नेसावी, असं अनेकांचं म्हणणं होतं.

सांस्कृतिक वा पारंपरिक दृष्टिकोनातून ही गोष्ट योग्य वाटत असली तरी ती व्यवहार्य नसल्याचं शुभांगी म्हणते.

"आम्ही एक असा पोशाख परिधान करतोय जो आमचं काम लक्षात घेत डिझाईन करण्यात आलेला आहे. ट्रेनमध्ये जागा कमी असते आणि प्रवासी जास्त. धावत्या ट्रेनमध्ये साडी नेसून प्रवाशांना सेवा देणं व्यवहार्य नाही. साडी सांभाळणं हेच एक काम असतं. अनेकदा साडी नेसल्यावर आम्हाला स्वतःला सावरता येत नाही. आम्ही दुसऱ्यांची काय काळजी घेणार. जर काही अडचण आली तर या कपड्यांमध्ये आम्ही स्वतःच्या आधी इतरांकडे लक्ष देऊ शकतो."

कपड्यांबद्दलच्या या वादाविषयी श्वेता सांगते, "आमच्या ड्रेसने आमचं पूर्ण शरीर झाकलेलं आहे. हा पोशाख आमच्या कामाच्या गरजेनुसार तयार करण्यात आलाय. साडी नेसून हे काम करणं खूप कठीण आहे."

वैशाली जयस्वाल म्हणते, "जरी आम्ही साड्या नेसल्या असत्या, तरीही लोकांनी इतर कोणत्यातरी गोष्टीवर टीका केलीच असती. प्रोब्लेम आमच्या कपड्यांत नाही तर लोकांच्या विचारांमध्ये आहे."

फोटो स्रोत, POONAM KAUSHAL/BBC

प्रवाशांकडून होणारा त्रास

तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रत्येक सीटवर एक 'कॉल' बटण आहे. हे दाबून होस्टेसला बोलवता येतं.

पण अनेकदा प्रवासी गरज नसताना बटण दाबतात. संध्या म्हणते, "अनेकदा लोकांना आम्हाला पहायचं असतं."

कारण नसताना बटण दाबून होस्टेसना बोलवण्यात येतं आणि त्या तिथे पोहचल्यानंतर सांगण्यात येतं, की बटण काम करतं की नाही, हे पाहण्यासाठी दाबलं होतं.

मॅनेजर शिवांगी म्हणतात, "एका डब्यात 70 प्रवासी असतात आणि दोन क्रू मेंबर. विनाकारण बेल दाबल्याने ज्या इतरांना खरंच गरज आहे त्यांना सेवा देण्यात अडथळा येतो."

अनेक प्रवासी या होस्टेसकडे वाईट नजरेने पाहतात, शेरेबाजी करतात. "अशा परिस्थितीत आम्हाला संयम बाळगावा लागतो. आम्ही मुलग्यांपेक्षा कमी नाही हे दरवेळी आम्हाला सिद्ध करावं लागतं."

न विचारता फोटो वा व्हिडिओ काढणाऱ्यांनाही या ट्रेन होस्टेसना सामोरं जावं लागतं.

सुंबुल म्हणते, "अनेक प्रवासी बटण दाबून आम्हाला बोलवतात आणि आधीच कॅमेरा सुरू करतात. आम्ही त्यांना सर्व्ह करत असताना ते आमचा व्हीडिओ काढत असतात. आम्हाला हे आवडत नसलं तरी काही करता येत नाही."

फोटो स्रोत, POONAM KAUSHAL/BBC

सिमरन म्हणते, "न विचारता व्हीडिओ काढला जातो. तो व्हायरल होण्याची भीती असते. असं झालं तर कुटुंबात आम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं."

संध्या यांनाही असे व्हिडिओ करणाऱ्यांवर आक्षेप आहे. त्या म्हणतात, "लोक फेसबुक लाईव्ह करतात, टिकटॉक व्हिडिओ करतात. आमच्या मर्जीशिवाय युट्यूबवर पोस्ट करतात."

ट्रेन मॅनेजर शुभांगी म्हणतात, "ही गाडी नवीन आहे. लोकांना ट्रेनमध्ये आणि आमच्यासोबत फोटो काढायचे असतात. हे आमच्या होस्टेसना अवघडवणारं असतं. या होस्टेस त्यांचं काम करत असतात. त्यांच्या प्रायव्हसीची काळजी घेण्यात यायला हवी."

लोकांनी आम्हाला नाही तर आमचं काम पहावं असं सुंबुल म्हणते.

संध्या यादव सांगतात, "अनेकदा नाही सांगितल्यानंतरही प्रवासी व्हिडिओ काढत राहतात. असे वागतात जणू त्यांनी आम्हाला विकत घेतलंय. आमचा फोटो काढण्याआधी आमची मर्जी विचारात घ्यायला हवी. केबिन क्रूमध्ये मुलगे असोत वा मुली. त्यांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी."

अनेक प्रवाशांनी आपल्याला टिप देण्याचा प्रयत्नही केल्याचं होस्टेस सांगतात. टिप नाकारली तर ती जबरदस्तीने हातात ठेवली जाते.

तर अनेकदा प्रवासी स्वतःचा नंबर देत मैत्री करायची असल्याचं सांगत असल्याचंही काही होस्टेसनी सांगितलं.

क्रू मेंबर शैला मिश्रा सांगतात, "अनेकदा लोक स्वतःचा नंबर देत मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावरही आम्हाला स्टॉक करतात. हा आमच्या कामाचा भाग नाही, हे प्रवाशांनी लक्षात घ्यायला हवं."

शुभांगी सांगतात, "क्रू मेंबर आणि प्रवासी यांचा संबंध फक्त प्रवास संपेपर्यंतच असतो. अनेकदा प्रवासी नंबर मागतात. कर्मचाऱ्यांना स्वतःचा नंबर देण्याची परवानगी नाही. प्रवाशांचा अपमान न करता अशी परिस्थिती हाताळण्याचं प्रशिक्षण आमच्या क्रू मेंबर्सना देण्यात आलेलं आहे."

या तरुणी दिवसाला 18 तास काम करतात आणि मग दुसऱ्या दिवशी आराम करतात. या सगळ्या सध्या 6 महिन्यांच्या प्रोबेशनवर असून त्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात येईल.

सध्या फार पगार मिळत नसला तरी गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा असल्याचं त्या सांगतात.

फोटो स्रोत, POONAM KAUSHAL/BBC

नवी दिल्ली - लखनौदरम्यान धावणारी ही तेजस एक्स्प्रेस हा IRCTCचा प्रयोग आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर मार्गांवरही अशाच ट्रेन्स सुरू करण्यात येतील.

मुंबई-अहमदाबाददरम्यान अशीच गाडी सुरू करण्याची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)