कमलेश तिवारी : उत्तर प्रदेशात हिंदू महासभेच्या नेत्याच्या हत्येचा संबंध चार वर्षांपूर्वीच्या वादग्रस्त विधानांशी

कमलेश तिवारी Image copyright Kamlesh Tiwari FB

कमलेश तवारी यांच्या हत्येप्रकरणी संशयित सय्यद असीम अली हा इतर संशयितांच्या नियमित संपर्कात होता. तसंच त्यानं कमलेश तिवारी यांच्या हत्येत महत्त्वाची भूमिका निभावली. संशयिताला महाराष्ट्र एटीएसनं ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

Image copyright TWITTER

लखनौमध्ये शुक्रवारी (18 ऑक्टोबर) हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी या हत्येचे धागेदोरे कमलेश तिवारी यांनी चार वर्षांपूर्वी केलेल्या एका विधानाशी जोडले आहेत.

दुसरीकडे कमलेश यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या एका स्थानिक नेत्यावर आरोप करत सरकार आणि प्रशासनालाही संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पोलिसांच्या दाव्यांवरही कमलेश यांच्या कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

शनिवारी (19 ऑक्टोबर) राज्याचे पोलिस महासंचालक ओपी सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणाचा गुंता आम्ही जवळपास सोडवला आहे, असं ओपी सिंह यांनी म्हटलं.

गुजरात एटीएसनं तीन लोकांना गुजरातमधल्या सुरत इथून आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी बिजनौर इथून दोन लोकांना ताब्यात घेतलं आहे.

ओपी सिंह यांचं म्हणणं आहे, "या हत्येमागे कमलेश तिवारी यांनी 2015 मध्ये केलेलं एक वक्तव्य आहे. पोलिसांनी गुजरातमधून ज्या लोकांना ताब्यात घेतलं आहे, त्यामध्ये मौलाना मोहसीन शेख, फैजान आणि राशिद अहमद पठाण यांचा समावेश आहे. बिजनौरमधून अनवारूल हक आणि नईम काजमी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिस या सर्वांची चौकशी करत आहेत."

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ शहरातलं वर्दळीचं ठिकाण असलेल्या चौक परिसरात शुक्रवारी हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांचा त्यांच्या कार्यालयातच गोळ्या झाडून खून करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुर्शीदाबाद कॉलनीमध्ये असलेल्या कमलेश तिवारी यांच्या कार्यालयात दोन हल्लेखोरांनी मिठाईच्या डब्यात पिस्तूल आणि चाकू लपवून आणले होते आणि कार्यालयात पोचताच त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. कमलेश तिवारी यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर चाकूने त्यांच्या गळ्यावर अनेक वारही करण्यात आले.

काही वर्षांपूर्वी कमलेश तिवारी यांना मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर होते. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच रासुका अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अलाहबाद उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच रासुका कलम हटवण्याचे आदेश दिले होते.

घटनास्थळी पोचल्यानंतर लखनौचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी सांगितलं होतं, की प्रथमदर्शनी हे प्रकरण परस्पर वादाचं असल्याचं वाटतं.

Image copyright Samiratmaj mishra/bbc
प्रतिमा मथळा कमलेश यांचं कार्यालय

एसएसपींनी म्हटलं, "प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथकं तयार करण्यात आली आहेत. घटनास्थळी सापडलेल्या हत्यारांची तपासणी सुरू आहे. परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून काही पुरावे हाती लागतात का, याचीही पडताळणी सुरू आहे."

दरम्यान, दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत आणि संताप व्यक्त होत आहे. कमलेश तिवारी यांच्या समर्थकांनी निदर्शनं केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातली दुकानं बंद करण्यात आली. तसंच मोठ्या संख्येने पोलीस आणि पीएसीचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

घटनेविषयी राज्याचे डीजीपी ओ. पी. सिंह यांनी सांगितलं, "हल्लेखोरांनी जवळपास 36 मिनिटं थांबल्यानंतर तिवारी यांच्यावर गोळ्या झाडल्या. ओळखीतल्याच कुणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. लवकरच पोलीस या घटनेचा पर्दाफाश करतील."

Image copyright ANI

योगींच्या राजीनाम्याची मागणी

राज्य सरकारने वारंवार आश्वासन देऊनही उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारलेली नाही. एकापाठोपाठ एक सुरू असलेल्या पोलीस चकमकींवरून विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत. तर दुसरीकडे खून, दरोडे आणि बलात्कारांच्या वाढत्या घटना, गुन्हेगारी कमी होत असल्याच्या राज्य सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्हं उभं करत आहेत.

कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या राज्य सरकारला एक दिवसाआधीच सर्वोच्च न्यायालयानेही खडे बोल सुनावले होते. एका खटल्याच्या सुनावणीवेळी 'युपीत जंगलराज आहे का?' असा संतप्त सवाल न्यायालयाने केला होता.

2 आठवड्यात 3 भाजप नेत्यांच्या हत्या

राजधानीचं शहर असलेल्या लखनौमध्ये गेल्या काही दिवसांत खून आणि गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. इतकंच नाही तर गेल्या दोन आठवड्यात भाजपच्याच तीन नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत.

उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भाजपचे एक सभासद धारा सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 46 वर्षांचे भाजप नगरसेवक धारा सिंह देवबंदहून सहारनपूरला जात असताना रस्त्यात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

त्यापूर्वी 8 ऑक्टोबर रोजी देवबंदमध्येच भाजपचे आणखी एक नेते चौधरी यशपाल सिंह यांनाही अशाच प्रकारे बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून ठार केलं. या दोन्ही प्रकरणानंतर संपूर्ण सहारनपूरमध्ये पोलीस आणि प्रशासनाविरोधात निदर्शनं करण्यात आली.

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी वस्तीतल्या कबीर तिवारी नावाच्या आणखी एका भाजप नेत्याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. कबीर तिवारी विद्यार्थी नेते होते. त्यांच्या खुनानंतर शहरभर मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. इतकंच नाही तर एक पोलीस चौकीही पेटवण्यात आली.

या घटनेनंतर स्थानिक पोलीस निरीक्षक पंकज कुमार यांची बदली करण्यात आली आणि त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अविनाश अवस्थी म्हणाले, "प्राथमिक तपासात आढळलं की पंकज कुमार यांनी प्रकरण हाताळण्यात निष्काळजीपणा केला. त्यांची कार्यपद्धती बेजबाबदार होती. तसंच त्यांनी वरिष्ठांच्या अहवालावरही गांभीर्य दाखवलं नाही."

दुसरीकडे ताज्या घटनेनंतर काँग्रेस पक्षाने राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू म्हणाले, "योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला माननीय सर्वोच्च न्यायालयानेदेखील जंगलराज म्हटलं आहे. आता नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन गोखरपूरला निघून गेलं पाहिजे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)