भारत-पाकिस्तान LOC वर चकमक: भाजपच्या 'सर्जिकल स्ट्राईक'वर काँग्रेसचा आक्षेप

भारतीय सैन्य Image copyright Getty Images

शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराकडून काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये लष्करी कारवाई करण्यात आली.

भारतानं पाकव्याप्त काश्मिरातल्या नीलम व्हॅलीमधील कट्टरतावाद्यांच्या तळावर हल्ला करत त्यांचे लाँचपॅड तसंच शस्त्रास्त्रांच्या साठ्यावर हल्ले केले, असा दावा भारतीय लष्कराने केला आहे. या हल्ल्यात 4-5 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेनं केलं आहे.

Image copyright ANI

या कारवाईसंदर्भात भारतीय लष्करानं एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. 19 आणि 20 ऑक्टोबरदरम्यान पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं भारतीय लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

पाकिस्तानकडून सामान्य नागरिकांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले.

मोहम्मद सादिक (55 वर्षं) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मोहम्मद मकबूल (70 वर्षं), मोहम्मद शफी (50 वर्षं) आणि युसूफ हामिद (22 वर्षं) हे तिघेजण जखमी झाले आहेत.

दरम्यान पाकिस्तानी लष्करानं जुरा, शाहकोट आणि नौशेरी भागांमध्ये भारताकडून गोळीबार करून सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा पाक लष्कराचं ट्वीट

भारताच्या हल्ल्याला दिल्या गेलेल्या प्रत्युत्तरात 9 भारतीय जवान ठार झाल्याचा दावा पाकिस्तानी लष्करानं केला आहे. भारताचे दोन बंकर्स उद्ध्वस्त केल्याचंही पाकिस्तानकडून सांगण्यात आलं आहे.

Image copyright Twitter

बीबीसीचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील प्रतिनिधी सिकंदर किरमाणी यांनी या हल्ल्यासंबंधी ट्वीट केलं आहे की "सीमापार केलेल्या कारवाईमध्ये किती जण गेले यासंबंधी भारत आणि पाकिस्तानकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. या हल्ल्यांमध्ये किमान 7 लोक ठार झाले आहेत. मृतांमध्ये सैनिक आणि सामान्य नागरिक दोघांचाही समावेश आहे."

'काश्मिरमधील शांतता भंग करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न'

जम्मू-काश्मिरमधील शांतता भंग करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक केले जात आहेत, असा आरोप लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

Image copyright Getty Images

"कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानमध्ये शांतता आहे. तिथल्या जनतेलाही हेच हवं आहे. काश्मिरमधील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शाळाही आता सुरू झाल्या आहेत. मात्र कट्टरतावाद्यांच्या भीतीमुळे मुलं अजूनही शाळेत येत नाहीयेत. कट्टरतावादी सफरचंदांच्या कॉन्ट्रॅक्टर्सना धमकावत आहेत. तिथे शांतता प्रस्थापित होऊ नये, असेच प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून आंतरराष्ट्रीय समुदायाला हे दाखवता येईल, की 370 विरोधात जम्मू-काश्मिरमधील जनता खूश नाहीये," असं बिपीन रावत यांनी म्हटलं.

रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या चकमकीबद्दल बोलताना रावत यांनी सांगितलं, "परिस्थिती अधिक चिघळावी यासाठी सीमेपलिकडून आणखी कट्टरतावादी कसे पाठवता येतील याचा प्रयत्न होत आहे. याची माहिती आम्हाला मिळाली होती. फॉरवर्ड एरियातील काही कॅम्प त्यांनी अॅक्टिव्हेट केले होते. विशेषतः केरेन, कंधार, नौगाव सेक्टरमध्ये हे कॅम्प होते. आम्ही त्यांना लक्ष्य केलं. यामध्ये पाकिस्तानी लष्कर आणि कट्टरतावाद्यांचं नुकसान झालं आहे. 6-10 पाकिस्तानी सैनिक या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तेवढेच कट्टरतावादीही ठार झाले आहेत. कट्टरतावाद्यांचे किमान तीन कॅम्पही नष्ट झाले आहेत."

पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक?

दरम्यान, भाजपकडून या कारवाईचा उल्लेख 'सर्जिकल स्ट्राईक' म्हणून करण्यात आला आहे. मुंबई भाजपचे प्रवक्ते सुरेश नाखुआ यांनी 'भारतीय लष्कराचा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक' असा या कारवाईबद्दल ट्वीट करून म्हटलं आहे.

Image copyright Twitter / @SureshNakhua
प्रतिमा मथळा सुरेश नाखुवा यांचं ट्वीट

"भारतीय लष्करानं प्रत्युत्तरादाखल ही कारवाई केली आहे. पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून कारवाई, पाकिस्तानी जवानांसहित 10 आतंकवादी ठार, उखळी तोफांचा मारा," असं या ट्वीटमध्ये नाखुआ यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसनेही यावर भारतीय सैन्याचं अभिनंदन केलं आहे. "सीमेपार दहशतवादी तळ दहशतवादी उद्ध्वस्त करण्याच्या दिशेत पराक्रमी #IndianArmyची अजून एक अभियान. आम्हाला तुमच्या शौर्याचा आणि धाडसाचा अभिमान आहे," असं काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा अभिषेक मनू सिंघवी यांचं ट्वीट

मात्र लष्कराच्या कामगिरीचा वापर राजकारणासाठी होऊ नये, असं मत काँग्रेसनं व्यक्त केलं आहे. बीबीसी मराठीशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, "भारताच्या जवानांचा आणि सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे. मात्र मोदींनी हे सगळं केलं आहे, असं भाजप सांगत राहतं. आर्मीच्या कामांचा देशाच्या राजकारणासाठी वापर करणं चुकीचं आहे. हे होता कामा नये. याचा विधानसभा निवडणुकांशी काहीही संबंध नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)