मतदान : ‘कुठलंही बटण दाबा, मत कमळालाच’ - भाजप उमेदवाराचं EVMबद्दल वक्तव्य

कमळ

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. 'कुठलंही बटण दाबा, मत कमळालाच'

महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. हरयाणातील एका भाजपा उमेदवाराने EVMचं कोणतंही बटण दाबा, मत कमळालाच जाणार आहे असं खळबळजनक विधान केलं आहे.

असांध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बख्शीशसिंह याचां एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मतदारसंघातील एका सभेच्या भाषणावेळी बख्शीशसिंग यांनी EVM सेट केल्याचं सूचवलं आहे. तुम्हीही कुठलंही बटन दाबा, मत कमळाचा पडणार असा दावा विर्क यांनी केला आहे.

जर तुम्ही आज चूक केली, तर त्याची सजा तुम्हाला 5 वर्षे भोगावी लागेल. कोणी कुठं मतदान केलं, याची आम्हाला माहिती मिळेलच. जर तुम्ही म्हणाल तर तेही सांगू. मोदी आणि मनोहरलाल यांच्या नजरा तीक्ष्ण असून तुम्ही कुठेही मत द्या, ते जाणार तर कमळालाच. तुम्ही कुठलेही बटन दाबा, मत तर कमळाच पडणार, आम्ही मशिन सेट केल्या आहेत, असे खळबळजनक विधान विर्क यांनी केलं आहे. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

2. मतदानावर पावसाचे सावट

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मात्र मतदानावर पावसाचं सावट असल्याचं चित्र आहे. कोल्हापूर, सातारा सांगली, पुण्यासह कोकण आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये रविवारपासून (20 ऑक्टोबर)मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मतदानाच्या पूर्वतयारीला फटका बसला आहे.

Image copyright Getty Images

साताऱ्यातील पालमधील मतदान केंद्र 31 मध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

3. भारतात 9 लोकांना 100 कोटींपेक्षा अधिक पगार

आयकर विभागाने 2017-18 या आर्थिक वर्षात उपलब्ध झालेल्या आयकर परतावा माहितीचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून देशात 100 कोटी इतका पगार घेणारे लोक असल्याची माहिती मिळाली आहे. लोकमत न्यूज 18ने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

देशातील 9 लोकांना 100 कोटी रुपये इतका पगार मिळतो. तसेच 50 हजार लोकांना वर्षाला 1 कोटी इतका पगार मिळतो. देशातील 2.9 कोटी करदात्यांपैकी 81.5 लाख लोकांचा पगार 5.5 लाख ते 9.5 लाख इतका आहे.

10-15 लाख पगार घेणारे 22 लाखांहून अधिक लोक आहेत. 15 ते 20 लाख पगार असणाऱ्यांची संख्या 7 लाखांहून अधिक आहे. तर 20 ते 25 लाख पगार घेणाऱ्यांची संख्या 3.8 लाख इतकी आहे.

25 ते 50 लाख पगार घेण्याऱ्यांची संख्या 5 लाखांच्या आसपास आहे. तर 50 लाख ते 1 कोटी दरम्यान पगार घेणाऱ्यांची संख्या 1.2 लाख इतकी आहे. एक कोटीपेक्षा जास्त पगार घेणाऱ्यांची संख्या 49 हजार 128 इतकी आहे.

4. कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन 9 नोव्हेंबरला

कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन 9 नोव्हेंबर होणार असून शीख भाविकांसाठी ती खुली केली जाईल, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी (20 ऑक्टोबर) सांगितलं.

ही मार्गिका पाकिस्तानातील कर्तारपूरच्या दरबार साहिब या धार्मिक ठिकाणाला पंजाबमधील गुरुदासपूर डेरा बाबा नानक या धर्मस्थळाशी जोडणार आहे. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

पाकिस्तानातील कर्तारपूरच्या दरबार साहिब येथे व्हिसा नसतानाही भेट देण्याची भेट देण्याची सुविधा शीख भाविकांना उपलब्ध झाली आहे. कर्तारपूर या स्थानाची स्थापना 1522 साली गुरु नानक देव यांनी केली होती. गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीच्या निमित्तानं 9 नोव्हेंबर रोजी ही मार्गिका सुरू होईल.

हा जगातील सर्वात मोठा गुरुद्वारा असून त्याला भारतासह जगातील शीख भाविक भेट देऊ शकतील असं इम्रान यांनी ट्वीट केलं आहे. लोकसत्ता

5. काश्मिरमध्ये महाराष्ट्राच्या जवानाचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे कट्टरतावाद्यांशी लढताना नाशिक जिल्ह्यातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज यांनी प्राण गमावले. चांदवड तालुक्यातील भरवीर येथील ते रहिवासी होते. उद्या मंगळवारी (22 ऑक्टोबर) त्यांच्यावर भरवीर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

रविवारी (20 ऑक्टोबर) पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मू काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला त्याला भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर देण्यात आलं.

या चकमकीत दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं आणि एका नागरिकाचाही मृत्यू झाला. भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानच्या चार-पाच सैनिकांसह 20 ते 22 कट्टरवादी ठार झाले आहेत. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)