पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे : भावनिक आवाहनांचा निवडणुकीवर परिणाम होतो का?

पंकजा मुंडे, धनंजय मुंडे Image copyright Getty Images

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. गेल्या जवळपास महिन्याहून अधिक प्रचाराचा धुरळा उडाला. या दरम्यान प्रत्येक पक्षानं, नेत्यानं, उमेदवारानं आपापल्या परीनं मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यात एक महत्त्वाचा मुद्दा ठरला तो भावनिक आवाहनांचा.

परळीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावंडांमधील टीका-प्रतिटीकेमुळं भावनिक आवाहनांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. याआधी लोकसभा निवडणुकांवेळी सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही, 'ही माझी शेवटची निवडणूक आहे', असं म्हणत भावनिक आवाहन केलं होतं.

एकूणच भावनिक आवाहन करून मतदारांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न बहुतांश राजकीय पक्षांकडून होताना दिसतो. हे भावनिक आवाहन कुठल्याही प्रकारे असू शकतं, कधी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा दाखल देत, कधी वयाचा दाखल देत, तर कधी आणखी कुठला.

बीडमधील मुंडे भावंडांच्या अनुषंगानं, एकूणच भावनिक आवाहनांचा निवडणुकीत आणि त्यातही मतदानावर काही फरक पडतो का? खरंच मतदार या आवाहनांमुळं आपलं मत बदलतात का? की ही आवाहनं केवळ एका सभेपुरतेच मर्यादित राहतात, या प्रश्नांचा धांडोळाही बीबीसी मराठीनं घेण्याचा प्रयत्न केलाय.

धनंजय मुंडेंच्या कथित टीकेचा काय परिणाम होईल?

वरिष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "बीडमधील गेल्या दोन-तीन दिवसांमधील राजकीय घडामोडी पाहता, भावनिक वातावरण नक्कीच वाढलंय. कारण स्त्रियांशी संबंधित एखाद्या वाक्याचा आपल्या समाजात तातडीनं परिणाम होतो. धनंजय मुंडे यांच्या कथित टीकेवरून बीडमध्ये महिला आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं."

"परळीत अटीतटीची लढाई होती. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर सुद्धा इथली निवडणूक रंगतदार होईल, अशीच स्थिती होती. मात्र, गेल्या दोन दिवसातल्या घटनाक्रमानं परिस्थिती बदलताना दिसतेय," असं संजीव उन्हाळे सांगतात.

Image copyright PANKAJA MUNDE/FACEBOOK

तर बीडमधील वरिष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी म्हणतात, "धनंजय मुंडेंच्या कथित टीकेचा परिणाम होईल. ग्रामीण भागात महिलांची मानसिकता धनंजय मुंडेंच्या विरोधात गेलीय."

कुलकर्णी पुढे सांगतात, "सोशल मीडियावरही धनंजय मुंडेंच्या बातम्यांचं निरीक्षण केल्यास लक्षात येईल, महिलांच्या कमेंट्स वाढल्यात. कालच्या घटनेनंतर महिलांनी धनंजय मुंडेंवर टीकात्मक कमेंट केल्याचे दिसून येतंय. शिवाय, या घटनेमुळं कुंपणावरचे जे लोक होते, ते पंकजा मुंडेंच्या बाजूनं झुकण्यास मदत होईल."

निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना घडल्यानंतर डॅमेज कंट्रोल करायला वेळ नसतो आणि नेमकी हीच स्थिती सध्या धनंजय मुंडेंवर ओढवलीय, असं संजीव उन्हाळे म्हणतात.

भावनिक आवाहनांनी खरंच मतं फिरतात?

बीडमधील घटनेबाबत जाणकारांनी व्यक्त केलेल्या मतांचा अधिक उहापोह करायचा झाल्यास, खरंच भावनिक आवाहनांनी मतं फिरतात का, हा प्रश्न समोर येतो.

यावर ज्येष्ठ पत्रकार आणि माध्यम तज्ज्ञ डॉ. जयदेव डोळे म्हणतात, "भारतीय मतदारांचा स्वभाव पाहिल्यास भावनिक मुद्द्यांचा प्रभाव पडतोच. म्हणूनच नेहमी भाविक वातावरण निर्माण केलं जातं, भावनिक आवाहनं केली जातात."

पुणे विद्यापीठातील पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला बर्वे या म्हणतात, "भावनिक आवाहनं जर शेवटच्या टप्प्यात केली गेली, तर त्यांचा प्रभाव खूपच तात्कालिक असतो. पण तोपर्यंत लोकांचं ठाम असं एक मत तयार झालेलं असतं. तेच महत्वाचं ठरतं"

Image copyright Twitter/@dhananjay_munde
प्रतिमा मथळा धनंजय मुंडे

मात्र, "संपूर्ण प्रचार मोहिमेत सशक्त असे काही भावनिक बाजू असेल, तर थोडाफार फरक दिसून येऊ शकतो. मात्र, तेही पक्षीय पातळीवर. उमेदवाराच्या पातळीवर भावनिक मुद्द्यांचा प्रभाव मर्यादित ठरतो," असंही निरीक्षण डॉ. बर्वे मांडतात.

डॉ. बर्वे पुढे म्हणतात, "भावनिक आवाहनांमुळं चर्चा होते. मात्र, चर्चा आणि मतांमध्ये रुपांतर याबद्दल खात्रीशीर अटकळ नाही बांधता येणार. लोक दखल घेतात, मात्र मतात रूपांतर होईलच असे नाही."

त्याचवेळी राजकीय रणनितीकार आनंद मंगनाळे सांगतात, "भावनिक आवाहनांचा निवडणुकीवर परिणाम होतो. मात्र, एखाद्या भावनिक वाक्याचा होत नाही. पूर्ण प्रचार मोहीमच भावनिक पातळीवर केली असेल, तर फरक नक्कीच पडतो."

भारतातल्या भावनात्मक राजकारणाचं महत्त्व सांगताना डॉ. जयदेव डोळे म्हणतात, "आपल्या देशात भावनेला इतकं महत्त्व आहे की, भावनिक मुद्द्यांवर पक्षच्या पक्ष स्थापन केले जातात. त्यामुळं आपल्याकडे भावनिक राजकारण नवीन नाहीय."

सोशल मीडियामुळं भावनेच्या राजकारणाला बळ मिळतं का?

ज्या गोष्टीमुळं भावनेच्या राजकारणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला, त्या मुंडे भावंडांच्या सध्याच्या वादानंही सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झालेल्या व्हीडिओ क्लिपमुळं मोठं रूप धारण केलं.

मुंडे भावंडांच्या वाद आणि सोशल मीडियाचा त्यातला सहभाग, याबाबत संजीव उन्हाळे म्हणतात, "शेवटचं शस्त्र म्हणून भावनिक आवाहनांचा वापर केला जातो. मात्र, परळीतल्या घटनेकडं पाहिल्यास, ते काही ठरवून झाल्याचं दिसत नाही. कारण दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंचं भाषण झालं होतं. त्यातलं कथित वाक्य नंतर व्हायरल झालं आणि पुढे सगळा वाद उभा राहिला. पण नुकसान नक्कीच मोठा झालाय."

Image copyright Facebook

याच घटनेला अनुसरून डॉ. जयदेव डोळे म्हणतात, "एखादं वादग्रस्त वाक्य सापडलं की, तेवढंच सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवलं जातं. लोकांच्याही मनात मग तेवढंच राहतं. ही नव्या माध्यमाची खुबी आहे."

तर डॉ. उज्वला बर्वे सांगतात, "सोशल मीडियामुळं एखादं भावनिक वाक्यही जास्त पसरतं. मात्र, सोशल मीडियावर जास्त चर्चा झाली म्हणजे ते निवडणुकीत प्रभावी आणि मोठं ठरेल, अशातला भाग नाही."

भावनिक आवाहनं पराभवाची चाहूल असते की आणखी काही?

अनेकदा मतदानाच्या तोंडावरच भावनिक आवाहनं केली जातात. त्यामुळं मतदारांचा कल पाहून अशी विधानं केली जातात की यामागे काही ठराविक रणनिती असते, याचाही धांडोळा बीबीसी मराठीनं घेतला.

डॉ. उज्वला बर्वे याबाबत म्हणतात, "भावनिक आवाहनं ही पराभवाची चाहूल नसून, ती एक रणनिती असते. आणि तसेही ती पराभवाची चाहूल असेल तर ते आपल्याला सिद्धही करता येत नाही. त्यामुळं अशी आवाहनं केवळ प्रचार रणनितीतला भाग असतो."

Image copyright Twitter/@PawarSpeaks

त्या पुढे म्हणतात, "भावनिक आवाहनांमुळं चर्चा होते. मात्र, चर्चा आणि मतांमध्ये रुपांतर याबद्दल खात्रीशीर अटकळ नाही बांधता येणार. लोक दखल घेतात, मात्र मतात रूपांतर होईलच असे नाही."

मात्र, राजकीय रणनितीकार आनंद मगनाळे म्हणतात, "शेवटच्या क्षणी एखादं भावनिक आवाहन हे पराभवाची चाहूल म्हणता येईल. मात्र, संपूर्ण प्रचारच भावनिक मुद्द्यांवर असेल, तर मतदारांना आकर्षित करणं आणि असलेल्या मतदारांना ठाम करणं हा हेतू असतो."

वरिष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे म्हणतात, "भावनिक आवाहनं करणं हा भारतातील निवडणुकांच्या सर्कसचा भाग बनलाय."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)