Exit Poll: महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेनेची सत्ता येणार, असा सर्व पोल्सचा अंदाज

उद्धव, फडणवीस Image copyright Hindustan Times

सर्व एक्झिट पोल्सचे निकाल आले आहेत. सर्व पोल्सनुसार राज्यात पुन्हा शिवसेना भाजपचीच सत्ता येणार, असा अंदाज सर्व पोल्सनी व्यक्त केला आहे. या सर्व पोल्समध्ये एक गोष्ट समान आहे.

ती म्हणजे महायुतीला पुन्हा लोकांनी कौल दिलाय, असा अंदाज सर्वांनी व्यक्त केलाय. 145 हा बहुमताचा आकडा आहे. सर्व पोल्सनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळू शकतं.

बीबीसी एक्झिट पोल करत नाही. पण इतर संस्थांनी एक्झिट पोल्स केले आहेत त्याचं वृत्तांकन बीबीसीने केलं आहे.

महायुती आघाडी इतर
आज तक - अॅक्सिस 166-194 72-90 22-34
News18-इपसोस 243 41 4
TV9-सिसेरो 197 75 16
झी- पोल डायरी 176-192 74-88 3-27
ABP- C व्होटर 192-216 55-81 4-21
रिपब्लिक-जनता की बात 216-230 50-59 8-12

युतीचा विजय होईल का?

दुपारी तीननंतर मतदान संपेपर्यंत आकडेवारीत फार फरक पडलेला नाही. आताच्या स्थितीवरून भाजपा-शिवसेनेला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील. आता फक्त भाजप मेजॉरिटीमध्ये येईल का ते पाहायचं आहे, असं मत राजकीय विश्लेषक यशवंत देशमुख यांनी मांडलं आहे.

काँग्रेस आणि एनसीपी आघाडी आणि महायुती यांच्यात 10 टक्क्यांपेक्षा जास्त मतांचा गॅप आहे. आणि हा गॅप फारच मोठा आहे.

टर्नआउट कितीही असलं तरीही मुंबई, कोकणात युती नक्की येणार आहे. ज्यांनी अधिक प्रयत्न केलेत त्यांच्या पारड्यात अधिक मतं पडली आहेत, असं मत राजकीय विश्लेषक यशवंत देशमुख यांनी एबीपी माझावर सुरू असलेल्या चर्चेवर मांडलं.

'मुंबईत वन साइडेड मॅच होणार नाही'

सत्ता कुणाची येईल हे ठरवण्यामध्ये मुंबईचा वाटा निर्णायक असेल असं मत ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर यांनी व्यक्त केलं.

"मुंबई शहराचा विचार केला तर राष्ट्रवादीनं मुंबईत अस्तित्व वाढवलं नाही. आघाडीला मुंबई कधीच कम्फर्टेबल झोन नव्हता. मुख्य स्पर्धा भाजप आणि शिवसेनेमध्येच दिसते. भाजपने मुंबईमध्ये बऱ्यापैकी प्रगती केलीय. मुंबई, कोकण पट्टा भाजपानं आपल्याकडे वळवला. साम दाम दंड भेद वापरून त्यांनी आघाडीच्या अनेक नेत्यांना आपल्या पक्षाकडे वळवलं, याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होईल," असं चंदावरकरांना वाटतं.

मध्य मुंबईत सचिन अहिर हा मोठा मोहरासुद्धा शिवसेनेनी गळाला लावला. हा सगळा पट्टा सेना-भाजपाने कॅप्चर केला. नारायण राणेसुद्धा एका दबावाखाली भाजपमध्ये आहेत. कोकण, पालघर, ठाण्यात छोट्या मार्जिनमध्ये खेळ फिरेल याबद्दल काही सांगू शकत नाही. मुंबई, पुण्यात शहरी भागात मतदान कमी झालंय.

स्वीप इतका वन साइडेड होईल असं मला वाटत नाही. वरचष्मा राहीलच पण इतक्या मोठ्या प्रमाणावर राहील असं मला वाटतं, असं रोहित चंदावरकर यांना वाटतं.

आघाडीने प्रचाराचा जोर उशिरा लावला का?

काँग्रेस राष्ट्रवादीने सुरुवातीला प्रभावी प्रचार केला नाही पण नंतर त्यांनी मुसंडी मारल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी बीबीसीवर झालेल्या चर्चेत मांडलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरूवातीला प्रचाराची आघाडी घेतली नाही. पण नंतर त्यांनी जोर धरला होता. मोदी लाटेतली मागच्या वेळी भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नव्हती असं त्या म्हणाल्या.

Image copyright Getty Images

पण विरोधासाठी उशीर झाल्याचं त्यांना वाटतं. "विरोधक प्रश्न मांडत होते, त्यांच्याकडे जनतेने लक्ष दिलं नाही असं या सर्व्हेतून वाटत आहे. कलम 370 आणि राष्ट्रवादासारख्या मुद्द्यांवर भाजपने त्यांना मागे टाकलं असं या सर्व्हेंमधून दिसत आहे.

महाराष्ट्राचा काहीही संबंध नसताना मोदी-शाहा यांनी कलम 370 चा वापर केला. पण शरद पवारांना नंतर प्रतिसाद मिळत होता. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही असं आकडे दाखवत आहेत, असं राही भिडे सांगतात.

युतीचा शिवसेनाला फायदा झाला का?

शिवसेना आणि भाजपमध्ये युतीवरून बराच खल झाल्याचं आपल्याला दिसलं. महाराष्ट्रात शिवसेनेकडून विधानसभेला नेहमीच जास्त जागा लढवल्या जात होत्या आणि भाजप कमी जागा लढवत असे पण यावेळी हे चित्र बदलेलं दिसलं. शिवसेनेनी 124 जागा लढवल्या आणि भाजप व मित्रपक्षांनी 164 जागा लढवल्या.

याचा कुणाला अधिक फायदा होईल? या प्रश्नाचं ज्येष्ठ पत्रकार किरण तारे यांनी असं उत्तर दिलं की "जागा वाटपाच्या वेळी निवडून येणाऱ्या जागा भाजपने स्वतःकडे जास्त ठेवल्या आहेत. तरीदेखील सेनेच्या जागा वाढताना दिसत आहेत. युती असल्यामुळे त्यांना फायदा होईल."

Image copyright Twitter @aditya

जे अपेक्षित होतं तीच आकडेवारी आहे. पण जवळपास 16 आमदारांचा खड्डा पडलेला आहे. इतके आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपा-शिवसेनेकडे गेले आहेत. तो खड्डा भरून काढायचा आहे, हा त्याच्यानंतरचा पोल आहे. आताची आकडेवारी शिवसेनेच्या फायद्याची आहे, असं ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांना वाटतं.

शिवसेना काही तोट्यात गेलेली नाही. पण प्रत्यक्षात शिवसेना या आकड्यांपर्यंत पोचेल का? असं वाटत नाही. कारण भाजपा आणि शिवसेनेच्या आपसातल्या भांडणातच 40 जागा अडकल्या आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या जागा वाढल्यात निश्चित, असं परब सांगतात.

दुसरी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या काँग्रेसच्या जागाही राष्ट्रवादीपेक्षा वाढलेल्या आहेत. काँग्रेस खरं तर पक्ष म्हणून कुठेच लढली नाही. पण मग त्यांनी जागांवर लक्ष दिलंय का आणि त्यांना जागा मिळाल्यात का? असं चित्र आहे.

पवारांचा करिश्मा चालला नाही का?

शरद पवार यांनी शेवटी प्रचारात खूप जोर लावला. साताऱ्यात झालेल्या सभेनं वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं गेलं पण याचा प्रत्यक्ष फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो का?

या प्रश्नाचं उत्तर ज्येष्ठ पत्रकार किरण तारेंनी दिलं बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात ते सांगतात, "200च्या खाली जागा आल्या तर सेना-भाजपला रोखलं असं म्हणता येईल. पण सारखं जे पवारांचा करिश्मा वगैरे म्हटलं जातंय ते काही खरं नाही, असं या एक्झिट पोल्सच्या आकडेवारीवरून दिसतं."

Image copyright Twitter@pawarspeaks

"ईडीच्या प्रकरणात पवारांचा दोष नव्हता हे सिद्ध झालं. पण दोष नसतानाही आपण गुन्हा दाखल करू शकतो हे भाजपाच्या कोअर व्होटरला अपील होऊ शकतं, त्याचा परिणाम यात दिसलं. याचा मतांवर नक्की परिणाम झालेला आहे. विरोधी पक्ष भाजपाला कोंडीत पकडण्यात अपयशी ठरवल्यामुळे लोकांनी पुन्हा भाजपालाच मत दिल्याचं दिसतंय," असं तारे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)