मतदानानंतर औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात झटापट

इम्तियाज जलील Image copyright Ganesh Pol

महाराष्ट्रातल्या 288 जागांसाठी आज मतदान झालं. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झालं आहे. संध्याकाळी 6 वाजता मतदान थांबलं.

औरंगाबादचे MIMचे खासदार इम्तियाज जलील आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात कटगेट भागातील बुथजवळ हाणामारी झाली आहे.

यामुळे या भागात तणावाचं वातावरण असून पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

या हाणामारीत इम्तियाज जलील यांचे कपडे फाटले. कदीर मौलाना यांच्यावर कारवाई करा, अशी जलील यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे.

मी सुरक्षित आहे असं त्यांनी सांगितलं. तुम्हाला जखम झाली का असं विचारलं असता जलील म्हणाले मी सुरक्षित आहे. मैदानात युद्धाला उतरल्यावर हा विचार करायचा नसतो की कमी लागलं की जास्त लागलं, एएनआयला त्यांनी सांगितलं.

विरोधी पक्षाचा हा डाव होता की शहरात तणावाचं वातावरण निर्माण करायचं ज्यामुळे महिला घराबाहेर पडणार नाहीत. पण आम्ही मोठ्या संख्येनी बाहेर पडल्यामुळे विरोधी पक्षाचा पारा चढल्याचं त्यांनी सांगितलं.

याशिवाय खालील घटना घडल्या.

1. मोर्शीमध्ये स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर हल्ला

अमरावती जिल्ह्यातील मोर्शीमध्ये कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला झाला आहे. वरुड गावापासून 6 किमी अंतरावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. यात देवेंद्र भुयार बचावले असले तरी त्यांची चारचाकी गाडी जळून राख झाली आहे. या घटनेनंतर रक्तदाब कमी झाल्याने भुयार यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, "संवेदनशील मतदारसंघ असताना पोलीस इतके बेफिकीर का राहिले? महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का?" असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

या घटनेवर प्रतिक्रिया देणारा सदाभाऊ खोत यांनी म्हटलं, "स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोक स्टंटबाजी करणारे लोक आहेत."

2. बीडमध्ये बोगस मतदानावरून गोंधळ

बाहेरच्या मतदारसंघातील रहिवाशी असलेले मतदार बीडमध्ये मतदानासाठी आणल्याचा आक्षेप उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी घेतला आहे. त्यामुळे काहीवेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

बीडमध्ये काका-पुतण्याची लढाई असून शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर, तर राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर निवडणुकीच्या मैदानात आहेत.

3. गडचिरोलीत कर्तव्य बजावत असताना शिक्षकाचा भोवळ येऊन मृत्यू

शिक्षक बापू पांडू गावडे (45) हे काल गडचिरोलीच्या एटापल्ली बेस कॅम्पवरून मतदान केंद्राकडे जाताना फिट येऊन खाली कोसळले. त्यानंतर त्यांना एटापल्ली येथे रुग्णालयात भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्‍यांना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आलं. पण, आज सकाळी त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.

Image copyright Getty Images

4. काँग्रेस उमेदवाराची 'बूथ कॅप्चरिंगची तक्रार

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बूथ प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून कॅप्चर करण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेस आघाडीच्या उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी स्थानिक शहर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. या तक्रारीमुळे ऐन निवडणुकीच्या दिवशी खामगावात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.

5. भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

जालना शहरात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हीडिओ लोकमतनं प्रसिद्ध केला आहे.

कोणत्या कारणावरून हाणामारी झाली, त्याचा बातमीत उल्लेख करण्यात आलेला नाही.

6. वंचितच्या उमेदवारांवर हल्ले

नांदेड जिल्ह्यातील देगलुर विधानसभा मतदारसंघात,अंतापुर चैनपुर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.रामचंद्र भरांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला.

त्यांच्या गाडीच्या काचा फोडून नासधूस करण्यात आली आणि प्रा.रामचंद्र भरांडे यांच्यासह कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला.

प्रतिमा मथळा प्रा.रामचंद्र भरांडे

भरांडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासह जालना आणि सोलापूरमधील करमाळा या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर हल्ले झाले आहेत.

7. राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; दोन जण गंभीर

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गटात हाणामारी झाली. राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू असवानी तर शिवसेनेचे तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

पिंपरीत मतदान कमी व्हावे यासाठी दहशत माजवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचा आरोप डब्बू असवानी यांनी केला आहे. तर शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी राष्ट्रवादीला पराभव दिसत असल्याने त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)