विधानसभा मतदान: धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचं काय म्हणणं आहे त्या वादग्रस्त फुटेजबाबत

धनंजय मुंडे - पंकजा मुंडे Image copyright Facebook

मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष मतदानाच्या दिवशी शिगेला पोहचला. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या कथित टीकेमुळं नवा वाद उभा राहिलेला वाद शमताना दिसत नाही.

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एका सभेत पंकजा मुंडेवर टीका केली. त्यात त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप सोशल मीडियावरून केला जातोय. धनंजय मुंडे यांच्या भाषणाची व्हीडिओ क्लिपही सोशल मीडियावरून पसरवली जातेय.

मात्र, धनंजय मुंडे यांचं हे भाषण नेमकं कुठं झालं आणि त्यातल्या आक्षेपार्ह विधानांबाबत किती तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

दुसरीकडे, परळीत धनंजय मुंडे यांच्या या भाषणाचा दाखल देत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीकेची तोफ डागली.

याच भाषणाच्या शेवटी पंकजा मुंडे व्यासपीठावरच भोवळ येऊन कोसळल्या. त्यामुळं सभेच्या ठिकाणीही मोठा गोंधळ उडाला.

कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं. धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती.

आज दोन्ही नेते याबाबत पत्रकारांशी बोलताना भावनिक झाले होते.

मला लोकांना भेटायची लाज वाटत होती

पंकजा मुंडे यांनी आज या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "माझ्याविषयी इतकं घाणेरडं बोललं गेलं, हे थांबवलं पाहिजे कोणीतरी. मी खोटं बोलत नाही म्हणून मला राजकारणात त्रास झाला. विरोधकांशीही मोठ्या मनाने वागलं पाहिजे असं मला वाटतं, मी तसंच करते, पण माझ्या बाबतीत कोणी तसं करेल की नाही मला माहीत नाही.

Image copyright Getty Images

"मी जेव्हा ते व्हीडिओ पाहिला, ते फुटेज माझ्या डोळ्यासमोरून दोन-तीनदा गेलं. त्यातला राग, तिरस्कार, ते एक्स्प्रेशन्स पाहून मला खूप हर्ट झालं. मला दोन दिवस लागले यातून बाहेर पडायला. माझा आत्मविश्वास कमी झाला होता. मला लाज वाटतं होती लोकांसमोर यायची, त्यांच्यासमोर हा विषय बोलायची, पण काही महिला मला भेटायला आल्या.

"त्यांनी मला धीर दिला, त्यातल्या एक म्हाताऱ्या बाई म्हणाल्या की आपला शत्रू आपल्याला गुळ-खोबरं देतं नसतो, तो डंखच करतो. तुमचं खच्चीकरण करण्याच्या हेतूने हे केलं आहे. मग मला वाटलं, मी इतकी फिरुनही, जग पाहूनही असं का वागते? उलट मी तर कितीतरी मुलींना शक्ती देणारी नेता आहे. मी असं वागून कसं चालेल? त्यामुळे मला अजूनही त्रास होत असला तरीही मी आता मी पाऊल टाकते भक्कम," पंकजा मुंडे म्हणाल्या.

दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आपण असं काही बोललो असल्याचा इन्कार केला आहे. "खरं काय खोटं काय हे मायबाप जनतेला माहीत आहे आणि ते जाणून घेऊनच ते मतदान करत आहेत. राजकारणात-समाजकारणात मोठा झालेला धनंजय मुंडे त्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांना माहितेय की मी अशी चूक कधीच करणार नाही. आणि माझ्या भाषणातही मी कोणत्याही असंसदीय भाषेचा प्रयोग केलेला नाही."

याआधीही धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भाषणाच्या क्लिपबद्दल फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरणं दिलं होतं. त्यांनी लिहिलं, "शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी."

Image copyright Twitter

"अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे," असंही धनंजय मुंडे म्हणाले.

या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही घेतली आहे आणि धनंजय मुंडेंना नोटीस पाठवली आहे.

या प्रकरणावर अनेक मोठ्या नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

"मला बहिणाबाई या शब्दामध्ये आदर वाटतो, बहिणाबाई चौधरी यांच्या कविता मी लहानपणापासून घोकल्या आहेत. बहिणाबाई या नावातच आदर आहे. बहिणाबाई असा उल्लेख केल्यानंतर यातना का होतात आणि चक्कर काय येते हे मला माहिती नाही. तीसचाळीस मिनीटं भाषण करताना काही होत नाही आणि शेवटी अशी चक्कर येते. याच्यामागे काय कारण आहे की मतदानात काही वेगळं चित्र दिसू शकेल अशी अस्वस्थता आहे हे मला माहीत नाही. पण यात आक्षेप घेण्यासारखं गंभीर काही आहे असं मला वाटत नाही," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

Image copyright Getty Images

"धनंजय मुंडेंच्या क्लिपमध्ये मोडतोड केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. महिला आयोगानं त्याची दखल घेतली. त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले. हे स्वतंत्र आयोग आहे, तिथं बसून आपण भाजपचे प्रतिनिधी आहोत असं दाखवलंच पाहिजे असं नाही," असंही ते पुढे म्हणाले.

अजित पवारांनी याविषयी बोलताना म्हणाले की, "या विषयावर दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे. या प्रकाराची चौकशी करावी आणि चौकशीमध्ये सगळी वस्तुस्थिती समोर येईलच. पण मी जेव्हा धनंजय यांना काल फोन केला तेव्हा म्हणालो की निवडणुकीच्या निमित्ताने बोलत असताना कळत-नकळत काही गोष्टी कोणाकडून चुकतात. पण या काळात आपण आपल्या हातून काही चूक होऊ द्यायची नसते. यावर धनंजय म्हणाले की कोणाचाही अपमान होईल अशाप्रकारचं मी काहीही वक्तव्यं केलेलं नाही."

या घटनेचा राजकीय फायदा मिळवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असंही ते म्हणाले.

परळीबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "माझी तब्येत बरी नसल्याने मी त्या भागात प्रचाराला गेले नाही, आणि मी अभ्यास केल्या शिवाय बोलत नाही, म्हणून त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही."

पृथ्वीराज चव्हाण यांचीही काहीशी अशीच प्रतिक्रिया होती. ते म्हणाले, "याबाबत मी पूर्ण माहिती घेतलेली नाही, त्यामुळे यावर मी टिप्पणी करणं योग्य होणार नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)