वंध्यत्व फक्त महिलांचीच समस्या असते का? : BBC 100 Women

डॉ. सारा मार्टिन्स डा सिल्व्हा Image copyright Twitter/@dundeeuni

वंध्यत्व ही काही फक्त महिलांची अडचण नाही, असं सारा मार्टिन्स डा सिल्व्हा यांचं म्हणणं आहे.

डॉ. सारा मार्टिन्स डा सिल्व्हा या स्कॉटलंडमधील आघाडीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ असून त्या वंध्यत्त्वावरील उपचारांमध्ये तज्ज्ञ आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ डंडीमध्ये त्या 'रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन' (Reproductive Medicine)च्या प्राध्यापक आहेत.

पुरुषांमधल्या वंध्यत्त्वावर संशोधन करून एकूणच असमानता आणि अन्यायाविषयी काम करण्याचं सारा यांचं ध्येय आहे.

सारा मार्टिन्स डा सिल्व्हा - पुरुषांमधल्या वंध्यत्वावर उपचार शक्य आहेत का?

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या BBC 100 Women कार्यक्रमात बोलताना डॉ. सारा मार्टिन्स डा सिल्व्हा यांनी महिला केंद्रीत भविष्यकाळातील 'फर्टिलिटी'विषयीची आपली मतं मांडली.

त्या म्हणाल्या, "सध्या जगभरात असणारी असमानता आणि प्रजननासाठी महिलांवर असणारं दडपण कमी करण्यासाठी आपण विज्ञान, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नाविन्य याच्या आधारे आपण पुरुषांच्या प्रजननविषयक आरोग्याबाबत संशोधन करू शकतो अशी मला आशा आहे."

म्हणजे पुरुषांच्या अंतवर्स्त्रांद्वारे त्यांच्या आरोग्याविषयीची माहिती मिळू शकणारी यंत्रणा विकसित झाली तर? पुरुषांच्या वंध्यत्त्वाविषयीच्या अशा अत्यंत वेगळ्या कल्पना सारा यांनी या व्यासपीठावर मांडल्या.

2030मधल्या भविष्याविषयीच्या आपल्या कल्पना मांडताना सारा म्हणतात, तोपर्यंत पुरुषांच्या वंध्यत्त्वावरील उपचार हे फक्त महिलांमधील वंध्यत्त्वाच्या उपचारांशी निगडीत राहणार नाहीत. फक्त महिलांनीच या अनावश्यक आणि खासगी हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या उपचारांना का सामोरं जावं, असा सवाल त्या करतात.

पुरुषांमधला 'स्पर्म काऊंट' म्हणजेच शुक्राणुंचं प्रमाण कमी होत असून मूल जन्माला घालणं त्यांच्यासाठी कठीण होत जातंय. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा असल्याचं सारा म्हणतात.

गेल्या काही वर्षांमध्ये या विषयीचे पुरावे अत्यंत सढळपणे आढळत असल्याचं त्या म्हणतात. पुरुषांमधली शुक्राणूंची संख्या का कमी होत आहे आणि हे कसं रोखता येईल यावर संशोधन करण्याचं आवाहन त्यांनी जगभरातल्या संशोधकांना केलंय.

सारा म्हणतात, "वंध्यत्व ही काही फक्त महिलांची अडचण नाही." पुरुषांमधल्या वंध्यत्त्वावर संशोधन करून एकूणच असमानता आणि अन्यायाविषयी काम करण्याचं सारा यांचं ध्येय आहे.

अरण्या जोहर : 'कविता, समानता आणि भविष्य'

कवयित्री आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या अरण्या जोहर यांनी BBC 100 Women मध्ये बोलताना, महिला कशाप्रकारे भविष्याचं नेतृत्त्व करू शकतात, याबद्दल उपस्थितांशी संवाद साधला.

BBC 100 Women मधील प्रमुख वक्त्या म्हणून अरण्या जोहर यांनी 2030 पर्यंत जग कसं असावं, याबाबतची कल्पना मांडली.

"एक असं जग, जिथं सगळ्या महिलांना शिक्षणाची समान संधी दिली जाते, स्वत:वर स्वत:चंच नियंत्रण आहे आणि आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या आणि सामाजिक बदलामध्ये नेतृत्त्व दिले जाते."

'द लँग्वेज ऑफ इक्वॅलिटी' या आपल्या प्रसिद्ध कवितेबद्दल बोलताना अरण्या जोहर म्हणाल्या, शिक्षण ही सर्वात मोठी समानता आहे.

शिक्षण आणि समानता या गोष्टींचा सर्वात मोठा प्रभाव महिलांवरच होत असतो, यात काहीच आश्चर्याची बाब नाही.

एखादी मुलगी जेव्हा शाळेत जाते, तेव्हा तिचा फायदा अवघ्या जगाला होत असतो, असंही जोहर म्हणतात.

महिलांच्या शिक्षण आणि करिअरमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता जोहर यांनी व्यक्त केली.

"एखादा 'अँग्री यंग मॅन' असेल तरच एखादी लढाई का मान्य केली जाते? असा प्रश्न विचारत अरण्या जोहर म्हणतात, कणखर, सशक्त आणि तरूण स्त्रिया जगाला पुन्हा एकदा सुंदर बनवण्यासाठी अपरिहार्य करतील.

राया बिदशहरी : भविष्यातील शाळा: कोणताच विषय नसलेली, चार भिंतीपलीकडची

आर्टिफिशियल इंटेलिजिन्स हेच भविष्य आहे, असं रिया बिदशहरी म्हणतात.

रिया या इराणीयन शिक्षिका आहेत. तसेच, बिदशहरी या Awecademy या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी BBC 100 Women च्या व्यासपीठावरून 'कोणताच विषय नसलेली, चार भिंतीपलीकडची' या विषयावर संवाद साधला.

मार्क आणि ज्ञान या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. केवळ अकॅडेमिक किंवा तांत्रिक पातळीवर नव्हे, तर बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक पातळीवर शिकत असाल, तर ते अर्थपूर्ण आहे.

जे जग अस्तित्त्वातच नसेल, त्यासाठी आजच्या शाळा आणि विद्यापीठं विद्यार्थ्यांना कसं तयार करू शकतात? असा प्रश्न त्यांनी विचारला.

"वेगानं बदलणाऱ्या जगात आता आपण राहतोय आणि मला आश्चर्य वाटतं की, या वेगाशी आपल्याकडील शिक्षण जुळवून घेण्यात तत्परता दिसत नाही."

"ऑटोमेशन क्षेत्रात 2030 पर्यंत 800 मिलियन जॉब कमी होतील. आज असलेल्या नोकऱ्यांपैकी 65 टक्के नोकऱ्या भविष्यात अस्तित्वातच नसतील," असं बिदशहरी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा दाखला देत सांगतिलं.

भविष्यातील शाळांमध्ये आपल्याला या गोष्टी दिसतील : आर्टिफिशियल इंटेलिजियन्सवर आधारित शिक्षण, शिकण्यासाठी एकाचवेळी अनेक मार्ग, लहान लहान कोर्स, व्हीआर आणि एआरवर आधारित वातावरण, नूट्रॉपिक्सचा वापर, व्यक्तिकेंद्रित शिक्षण इत्यादी.

BBC 100 Women काय आहे?

भविष्याची दिशा बदलू पाहणाऱ्या जगातल्या 100 महिलांची यादी बीबीसीनं प्रसिद्ध केली आहे. BBC 100 Women अशा महिला आहेत, ज्यांनी भविष्य पाहिलं आहे. या अशा महिला, ज्या जगाचं भविष्य बदलू शकतात, ज्या जगाला नवीन आणि उत्तम भविष्य देऊ शकतात.

यावर्षीचा #100Women सीरिजचा प्रश्न आहे - तुमच्या अवतीभवतीच्या महिलांसाठी येणारा काळ कसा असेल? 2013 पासून सुरू झालेली बीबीसीच्या 100 वुमन मालिकेची ही मोहीम तुमच्यापर्यंत दरवर्षी वेगवेगळ्या महिलांच्या गोष्टी घेऊन येते. या महिला जगभरातील इतर महिलांना प्रेरणा देण्याचं काम करत आल्या आहेत.

कोण-कोण आहे यंदाच्या 100 वुमेनमध्ये?

मागच्या सहा वर्षांमध्ये 100 वुमन मालिकेअंतर्गत आम्ही विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना सन्मानित केलं आहे. मेक-अप उद्योजक बॉबी ब्राऊन, संयुक्त राष्ट्रांच्या सहसरचिटणीस अमीना मोहम्मद, सामाजिक कार्यकर्ती मलाला युसुफजाई, जिम्नॅस्ट सिमॉन बाइल्स, सुपरमॉडेल अॅलेक वेक, संगीतकार अलिशिया कीज आणि ऑलिंपिक चँपियन बॉक्सर निकोला अॅडम्स यांचा त्यात समावेश आहे.

2019 मध्ये बीबीसी 100 वुमेन सीरीजमध्ये 'द फिमेल फ्यूचर' म्हणजेच महिलांच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. फ्यूचरिझम म्हणजेच भविष्य पाहणं आणि सांभाळण्याची प्रक्रिया. पितृसत्ताक समाजात आजपर्यंत भविष्य बनवणं आणि सांभाळण्याची जबाबदारी फक्त पुरुषच गेत आले आहेत. पण महिलांचं भविष्य त्यांच्याच हातात असलं तर आयुष्य कसं असेल, हे यावर्षीच्या 100 वुमेन या बीबीसीच्या विशेष सिरीजमध्ये सांगण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)