इन्फोसिस: नफा फुगवून सांगितल्याच्या अधिकाऱ्यांच्या आरोपांनंतर IT कंपनीचे शेअर्स गडगडले

नारायण मूर्ती Image copyright Getty Images

भारतातल्या सर्वात मोठ्या IT कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इन्फोसिसमध्ये सध्या खळबळ उडालेली आहे.

कंपनीच्याच कर्मचाऱ्यांच्या एका गटाने 20 सप्टेंबरला इन्फोसिसच्या बोर्डाला आणि अमेरिकेच्या 'सिक्युरिटीज अॅण्ड कमिशन एक्स्चेंज'ला पत्र पाठवून काही गंभीर दावे केले आहेत. यानंतर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

इन्फोसिसचे CEO सलील पारेख आणि CFO निलांजन रॉय यांनी अनैतिक मार्गाचा वापर केल्याचा आरोप या गटाने केलाय. 'एथिकल एम्प्लॉईज' नावाच्या या गटाने एका पत्राद्वारे या गोष्टी समोर मांडल्या आहेत.

गेल्या अनेक तिमाहींपासून पारेख आणि रॉय यांनी डील मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धती अवलंबल्या असून याविषयीचे इमेल्स आणि फोन कॉल्सचं संभाषण आपल्याकडे असल्याचं या गटाने म्हटलंय.

व्यवहारांमध्ये 'मार्जिन्स' दाखवण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही चुकीच्या गोष्टी दाखवायला भाग पाडण्यात आल्याचं या तक्रारीत म्हटल्याचं 'द हिंदू बिझनेस लाईन'ने म्हटलंय.

तर मोठ्या डील मिळवण्यासाठी पारेख यांनी आढावे आणि परवानग्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केल्याचं इकॉनॉमिक टाईम्सने म्हटलंय.

Image copyright Getty Images

कंपनीतल्या व्यवहारांमध्ये नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याच्या सोबतच या 'एथिकल एम्प्लॉईज' गटाने इतरही काही आरोप केले आहेत. कंपनीचे CEO पारेख यांनी अमेरिका आणि भारतादरम्यानच्या वैयक्तिक प्रवासांसाठी कंपनीचा निधी वापरल्याचं या गटाचं म्हणणं आहे. यासोबतच पारेख यांनी संचालक मंडळातले दोन सदस्य डी एन प्रल्हाद आणि डी सुंदरम यांचा 'ते दोन मद्रासी' असा अपमानजनक उल्लेख केल्याचं या पत्रात म्हटलेलं आहे.

बिझनेस टुडेने याविषयीचं वृत्त दिलंय. "संचालक मंडळातल्या कोणालाही या गोष्टींविषयी काही कळत नाही. शेअरच्या किंमती वाढलेल्या पाहून ते खुश होतात. फक्त ते दोन मद्रासी (सुंदरम आणि प्रल्हाद) आणि दिवा (किरण) काहीतरी मुद्दे काढतात. त्यावर माना डोलावून त्याकडे दुर्लक्ष करा," असं पारेख यांनी म्हटल्याचं या तक्रार पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे.

सलील पारेख आणि निलांजन रॉय यांनी याविषयी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Image copyright Getty Images

इन्फोसिसची प्रतिक्रिया

अशा प्रकारची तक्रार आपल्याकडे आली असून त्याविषयी इन्फोसिस ऑडिट कमिटी अधिक तपास करत असल्याचं इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी म्हटलंय. नंदन निलेकणी यांनी याविषयीचं एक निवेदन आज देशातल्या दोन्ही शेअरबाजारांना पाठवलं. "योग्य वेळी या तपासाचा अहवाल कंपनी देईल आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि शेअरधारकांचे हक्क यांची काळजी घेण्यास इन्फोसिस कंपनीचं संचालक मंडळ बांधील" असल्याचं निलेकणींनी म्हटलंय.

या प्रकरणाची स्वतंत्रपणे आणि निःपक्षपणे चौकशी करता यावी, यासाठी CEO आणि CFOना या चौकशीपासून दूर ठेवण्यात येणार असल्याचंही निलेकणींनी म्हटलंय. यासोबतच या तपासातून जे निष्पन्न होईल त्यानुसार ऑडिट कमिटीचा सल्ला घेऊन संचालक मंडळ पुढची पावलं उचलणार असल्याचंही नंदन निलेकणींनी या शेअर बाजारांना लिहिलेल्या या पत्रात म्हटलंय.

पण 'एथिकल एम्प्लॉईज'ने पत्रात उल्लेख केलेले इमेल्स आणि व्हॉईस रेकॉर्डिंग्स आपल्याला मिळाली नसल्याचंही इन्फोसिसने म्हटलंय.

Image copyright Getty Images

शेअरबाजाराची प्रतिक्रिया

मंगळवारी ट्रेडिंग सुरू झाल्याबरोबर इन्फोसिसच्या शेअरमध्ये घसरण झाली. मुंबई शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअर ट्रेडिंग सुरू झाल्याबरोबर 10% खाली कोसळला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्येही इन्फोसिसचा शेअर ट्रेडिंगच्या सुरुवातीलाच 16 टक्के घसरलेला होता. इन्फोसिसच्या 'अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट्स' (ADR) मध्येही 12 टक्क्यांची घसरण झाली. अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट्मधली ही 2013नंतरची एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. यापूर्वी 2013मध्ये अशाप्रकारे शेअर्सची एकाच दिवसात इतकी मोठी घसरण झाली होती.

21 ऑक्टोबर पर्यंतची या शेअरची 2019 वर्षभरातली कामगिरी पाहिल्यास शेअरच्या किंमतीत 15 टक्क्यांपर्यंतची वाढ झालेली होती.

सामान्य गुंतवणूकदारांनी काय करायचं?

इन्फोसिसच्या शेअर्समधली गुंतवणूक ही सामान्य गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणूक मानतात. अशावेळी या सामान्य गुंतवणूकदाराने काय करायला हवं, याविषयी शेअर मार्केट तज्ज्ञ एस. पी. तुलसीयान म्हणतात, "मॅनेमेंट या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन देईल. कंपनीने सॉलिसिटर, ऑडिटर नेमलेले आहेत. या प्रकरणाचा तपास होईल. म्हणून सामान्य गुंतवणूकदाराने इतक्यात आपली गुंतवणूक काढून घेऊ नये. या आरोपांमध्ये तथ्य असलं तरी यामुळे आजपेक्षा जास्त नुकसान होण्याची शक्यता नाही. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदाराने गुंतवणूक काढून घेऊ नये. जेवढी घसरण व्हायची होती, ती झालेली आहे. यापुढे मोठी घसरण होईल असं मला वाटत नाही."

(शेअर बाजारातली गुंतवणूक ही बाजारमूल्यांच्या चढउतारांवर अवलंबून असते, त्यामुळे ती पूर्णतः गुंतवणूकदारांची जबाबदारी आहे. बीबीसी कुठल्याही शेअर बाजार गुंतवणुकीविषयीच्या सल्लयाची जबाबदारी घेत नाही.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)