बारामती निवडणूक: 'अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या’ बसपा उमेदवाराची कार्यकर्त्यांनीच काढली धिंड #5मोठ्याबातम्या

Image copyright Twitter / AjitPawarSpeaks

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. 'अजित पवारांना मदत केल्या'चा आरोप बसप उमेदवारावर आरोप

आपल्याच पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप करत बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवाराला मारहाण करत त्याची गावातून धिंड काढली. पक्षाचं तिकीट मिळूनही निवडणुकीच्या आखाड्यात जोमाने न लढता राष्ट्रवादीचे स्थानिक उमेदवार अजित पवारांना मदत केली, असा त्यांच्यावर आरोप कार्यकर्त्यांनी केला.

ही बातमी न्यूज18 लोकमतने दिली आहे.

अशोक अजिनाथ माने बारामती मतदारसंघातून बसपाची उमेदवारी मिळाली होती. माने यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पैसे घेऊन पाठिंबा दिला होता, असा आरोप बसपा कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र उमेदवारी पक्की झाल्यामुळे त्यांचं नाव कायम राहिलं.

मात्र आता पुढे आलेल्या एका व्हीडिओत माने यांच्यावर राग काढत कार्यकर्त्यांनी त्यांचे कपडे फाडले, त्यांच्यावर शाई फेकली आणि परिसरातून धिंड काढली, असं दिसत आहे.

2. बँकांची स्थिती चिंताजनक: नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी

"देशातील बँकिंग क्षेत्रावरील संकट चिंताजनक आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी धडाडीने निर्णय घ्यायला हवेत," असं मत नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

गेल्या जवळपास पाच वर्षांपासून बँकिंग व्यवस्था ही उच्च अनुत्पादित मालमत्तेच्या (NPA) समस्येने ग्रासली आहे. त्यातून अनेक बँकांच्या नक्त मालमत्तेचा ऱ्हास आणि नवनव्या प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता उजेडात येऊ लागल्या आहेत. पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेतील (PMC) घोटाळा ही त्यातील नवी भर आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अभिजीत बॅनर्जी

पण, देशासमोरील आर्थिक संकटासंदर्भातील प्रश्नावर मत व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.

पाहा त्यांची बीबीसी प्रतिनिधी अरुणोदय मुखर्जी यांनी घेतलेली संपूर्ण मुलाखत -

3. रामलीलेची तुलना पॉर्नशी? प्रकाश राज अडचणीत

अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेले प्रकाश राज रामलीलेसंद्रभात केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकत्याच एका व्हायरल झालेल्या व्हीडिओत ते रामलीलेची तुलना पॉर्नशी करताना दिसत आहेत.

ही बातमी झी 24 तासने दिली आहे. हा व्हीडिओ 2018 सालचा आहे.

योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना प्रकाश राज यांनी आपलं मत मांडलं होतं. योगींकडून ज्याप्रमाणे रामलीलाचा प्रचार करण्यात येत आहे, हे पाहता काही सामाजिक घटकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

यावर उत्तर प्रदेश सरकारने रामलीला या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन का करू नये, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याच प्रश्नाचं उत्तर देत, लहान मुलं पॉर्न पाहत असल्यास तुम्ही त्यांना अडवणार नाही का?" असा प्रतिप्रश्नच त्यांनी मुलाखतकारांपुढे उपस्थित केला.

4. जैशच्या 18 दहशतवाद्यांचा खात्मा: भारतीय सैन्याचा दावा

पाकिस्तान प्रशासित काश्मिरमधल्या नीलम व्हॅली आणि आणखी तीन ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून भारतीय सैन्य कारवाई करत असून, या कारवाईत आतापर्यंत 18 कट्टरतावाद्यांचा मृत्यू तसंच जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा भारतीय सैन्याने केला आहे. ही बातमी हिंदुस्थान टाइम्सने दिली आहे.

या कट्टरतावाद्यांबरोबरच 16 पाकिस्तानी सैनिकांचाही मृत्यू झाल्याचं सैन्याने म्हटलं आहे.

जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करणं तसंच त्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी तिथे तोफगोळ्यांचा मारा चालू असल्याचं भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचा भंग केल्यामुळे भारत ही कारवाई करत असल्याचंही सैन्याने स्षष्ट केलं आहे.

5. हिंदू महासभा नेत्याच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्याप्रकरणी गुजरात एटीएसने दोन आरोपींना अटक केली आहे. ही बातमी NDTV ने दिली आहे.

गुजरातमधल्या गांधीनगर इथले हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची तीन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लखनौ नाका भागात कमलेश तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

तिवारी यांची हत्या करणारे हल्लेखोर लगेच तिथून फरार झाले. याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्याची महिती मिळाली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)