पंकजा मुंडे : परळीत भाजपचा पराभव, धनंजय मुंडे विजयी - विधानसभा निवडणूक निकाल

पंकजा मुंडे, धनंजय मुंडे Image copyright Getty Images

बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. राज्यातील अत्यंत चुरशीची आणि सर्वांत लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडे पाहिलं जातंय. याचं कारण इथून मुंडे भावंडं आमने-सामने उभे ठाकलेत.

या ठिकाणी पंकजा मुंडेंचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. निकालानंतर पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेत आपला पराभव मान्य केला.

"मतदारांनी दिलेला कल नम्रपणे स्वीकारते. हा माझ्यासाठी अनाकलनीय निर्णय आहे. मी ही निवडणूक जिंकू शकले नाही, हे सत्य आहे. लोकांचा कल स्वीकारणं क्रमपाप्त आहे. कदाचित मी स्वत:ला निवडून आणण्यासाठी सक्षम नव्हते. कार्यकर्त्यांनी शांत राहावं, पराभव जड जाईल. पण शांत राहावं. आता कोणत्याही गरीब माणसाच्या कामासाठी मी आहे. मी पराभव स्वीकारलाय, कार्यकर्त्यांनीही स्वीकारावा," असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.

पाहा या लढतीचे ताजे अपडेट्स इथे

(ही बातमी अपडेट होत आहे)

धनंजय मुंडे हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि पंकजा मुंडे या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री होते . दोघेही चुलत भाऊ-बहीण असल्यानं निवडणुकीला वेगळं महत्त्वं आहे.

परळी विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई आणि परळी या दोन तालुक्यांचा ग्रामीण भागही येतो.

Image copyright FACEBOOK/DHNANJAY MUNDE

"अंबाजोगाईच्या ग्रामीण भागात मुंदडा यांचा प्रभाव आहे. ते आधी राष्ट्रवादीत होते, आता भाजपमध्ये आलेत. त्यामुळं तोही फायदा पंकजा मुंडे यांना मिळेल," असं सुशील कुलकर्णी सांगतात.

परळी शहर हे गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून भाजपसाठी मारक ठरलंय. गोपीनाथ मुंडे हयात असतानाही परळी शहरानं त्यांना फारशी मदत केल्याची आकडेवारी सांगत नाही. गोपीनाथ मुंडेंना परळी शहरानं लोकसभा किंवा विधानसभेला लीड दिली नव्हती.

कुणाचं पारडं जड?

राही भिडे सांगतात, "पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघंही गोपीनाथ मुंडेंचं नाव घेऊन राजकारण करतायत. पण गोपीनाथ मुंडेंनी असलं भावनांचं राजकारण कधीही केलं नाही. व्हिडिओ क्लिपचं प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या दोघांनी लोकांसमोर भावनांचा उद्रेक केला. लोक त्याकडे ड्रामा म्हणून बघतायत. पंकजांना याचा सर्वस्वी फायदा होईल, असं वाटत नाही. धनंजय यांनीसुद्धा त्याचा खुलासा दिल्यामुळे त्यांनाही सहानुभूती मिळालेली आहे. त्यामुळे एकतर्फी निकाल असणार नाही."

संजय जोग यांच्या मते, "पंकजा आणि धनंजय या दोघांनी जे भावनांचं राजकारण केलं, त्यातून किती मतं मिळवता येतील हा चर्चेचा मुद्दा आहे. पण त्या दोघांच्या कामाकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही."

Image copyright Getty Images

जिथे लढत असते, तिथे ज्याचं ग्राउंडवरचं काम चांगलं असतं, तो सीट काढतो हे आपल्याला माहिती आहे, असं सचिन परब यांनी सांगितलं. "तिथे गेल्यावर धनंजय मुंडेंचं ग्राउंडवर, प्रत्यक्ष मतदारसंघात काम जास्त होतं असं चित्र आहे. धनंजय मुंडे वंजारी मतांमध्ये फूट टाकण्यात काही प्रमाणात यशस्वी झालेत. त्यामुळे मला वाटतं, की धनंजय मुंडे काही प्रमाणात प्लसमध्ये आहेत."

किरण तारे यांच्या मते, धनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेता म्हणून अतिशय चांगली इमेज तयार केली आहे. "परंतु तिथला मतदार फारच संवेदनशील आहे. आणि इथं नेमक्या शेवटच्या टप्प्यात भावनेच्या आधारवर निवडणूक वळली होती. त्याचा फायदा महिलांना नेहमीच होतो. तो पंकजांना होईल असं वाटतं."

'पंकजा-धनंजय मुंडेंमधील संघर्षाचा इतिहास'

एकमेकांसाठी पंकुताई आणि धनुभाऊ असलेले हे भाऊ-बहीण राजकारणाच्या आखाड्यात परस्परांचे कट्टर विरोधक बनले आहेत. गोपीनाथ मुंडे हयात असतानाच दोघांमधील संघर्षाची ठिणगी पडली होती.

गोपीनाथ मुंडे जेव्हा देशाच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हा बीडमधला त्यांचा वारसदार म्हणून त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते.

2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती.

Image copyright DHANANJAY MUNDE/ FACEBOOK

जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला. जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला.

2013 मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय विजयी झाले. मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजांनी बाजी मारली.

डिसेंबर 2016 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. मुंडे कुटुंबीयांसाठी ही नगरपालिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. यावेळेस पंकजा विरुद्ध धनंजय असं पुन्हा चित्र होतं.

तेव्हा धनंजय मुंडे यांनी 33 पैकी तब्बल 27 उमेदवार निवडून आणत त्यांनी नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा-बहिणीतली चुरस वाढली.

2017च्या सुरुवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा सर्वाधिक जागा मिळवल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला.

Image copyright TWITTER/DHANANJAY_MUNDE
प्रतिमा मथळा लोकमतच्या कार्यक्रमात दोघेही एका मंचावर आले होते.

दरम्यान, यावेळेस पंकजा यांनी राजकीय खेळी खेळत जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता खेचून आणली. मे 2017 मध्ये परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते.

अनेक वर्षं गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात बाजार समिती होती. या बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय पुन्हा एकदा समोरासमोर उभे होते. दोघांनी आपापल्या दिवंगत वडिलांच्या नावांवर पॅनल उभे केले होते. त्यावेळी पंकजा यांच्या बहीण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी प्रचार केला होता.

मात्र पंकजा मुंडे यांच्या पॅनलला बाजार समिती निवडणूक पराभवाला सामोरं जावं लागलं. धनंजय मुंडे यांच्या पॅनलने समितीवर मोठा विजय मिळवला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)